वृत्तसंस्था, मुंबई : भांडवली बाजारात देशांतर्गत गुंतवणूकदारांनी चालू वर्षांत (कॅलेंडर वर्ष २०२२) आतापर्यंत दोन लाख कोटींची विक्रमी गुंतवणूक केली असल्याचे मंगळवारी समोर आले आहे. चालू वर्षांतील पहिल्या सहा महिन्यांत झालेली ही आतापर्यंत देशांतर्गत गुंतवणूकदारांकडून करण्यात आलेली सर्वोच्च गुंतवणूक आहे.
रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक पातळीवर पुरवठय़ाच्या बाजूने बिघडलेला समतोल आणि त्यापरिणामी वाढलेल्या महागाईवर नियंत्रण मिळविण्यासाठी जगभरातील मध्यवर्ती बँकांकडून व्याजदरात वाढ केली जात असल्याने चालू वर्षांत परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफआयआय) भांडवली बाजारात नफावसुलीला प्राधान्य देत मोठा निधी काढून घेतला आहे. मात्र एकीकडे परदेशी गुंतवणूकदारांकडून समभाग विक्रीचा मारा सुरू असल्यामुळे स्वस्त झालेले समभाग देशांतर्गत गुंतवणूकदारांनी खरेदी करून भारतीय शेअर बाजाराच्या निर्देशांकांना भरघोस इंधन पुरवले आहे.
सर्वसामान्य गुंतवणूकदारांमध्ये दरमहा ठरावीक रकमेची गुंतवणूक करण्याच्या ‘सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन’बाबत वाढती जागरूकता आणि करोनाच्या काळात बहुतांश लोकांचे ‘वर्क फ्रॉम होम’ सुरू असल्याने आणि उत्पन्नाचे आणखी एक साधन म्हणून लोक भांडवली बाजाराकडे वळल्याने बाजाराकडे विक्रमी ओघ आला आहे. या दोन कारणांमुळे देशांतर्गत गुंतवणूकदारांच्या उत्साहाची ही दौड कायम आहे.
जेफरीज इंडियाच्या अहवालानुसार, भारतीय दरवर्षी सुमारे ५३ लाख कोटी रुपयांची बचत करतात. यापैकी, एकटय़ा म्युच्युअल फंडांमध्ये एसआयपीच्या माध्यमातून १.४४ लाख कोटींचे वार्षिक योगदान आहे. तसेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओकडून भांडवली बाजारात नियमितपणे २५,०००-३०,००० कोटी रुपये गुंतवले जात आहेत. त्यात आणखी वाढ करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असून त्यास मंजुरी मिळाल्यास भांडवली बाजारातील पैशाचा ओघ आणखी वाढेल.
देशांतर्गत गुंतवणूकदारांनी केलेली गुंतवणूक
वर्ष गुंतवणूक (कोटी रु.)
२०२२ २,००,०२४.१६
२०२१ ९८,२७५.२८
२०२० -४१,४९५.८७
२०१९ ४२,०४३.१२
२०१८ १,०७,३१९. ५४
