दिवाळी सरली आता वाढीव व्याजदराला सामोरे जा, असा संदेश वाणिज्य बँका देऊ लागल्या आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील अग्रणी स्टेट बँक आणि खासगी क्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकाच्या एचडीएफसी बँक यांनी दिवाळी संपताच त्यांचे आधार दर प्रत्येकी ०.२० टक्क्य़ांनी वाढविल्याचे जाहीर केले आहे. हाच कित्ता अन्य बँकाही गिरविण्याची शक्यता असून यामुळे गृह, वाहन आदी कर्ज व्याजदरात वाढीची ती नांदी ठरेल.
दिवाळी तोंडावर असताना दुसऱ्या तिमाही पतधोरणात रिझव्र्ह बँकेने रेपो दरात सलग दुसऱ्यांदा पाव टक्का वाढ केली होती. यामुळे मध्यवर्ती बँकेकडून वाणिज्य बँकांना अल्पावधीसाठी उचलावी लागणारी रक्कम महागडी बनली आहे. त्याचा परिणाम आता थेट सामान्य कर्जदारांवर होणार आहे. सण-समारंभाच्या कालावधीनंतर कर्जदारांना मासिक हप्त्यापोटी अधिक रक्कम मोजावी लागेल, असा इशाराच दोन बडय़ा बँकांच्या बुधवारच्या निर्णयाने दिला आहे.
सार्वजनिक क्षेत्रातील स्टेट बँकेने कर्जाचे व्याजदर निश्चित करणारा आधार दर (बेस रेट) ०.२० टक्के वाढविले आहेत. बँकेचा किमान आधार दर आता ९.८० टक्क्यांऐवजी १० टक्के झाला आहे. खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बँकेने तिचा किमान आधार दर याच प्रमाणात वाढवत तोदेखील १० टक्के केला आहे. ‘बेस रेट’ हा बँकांचा किमान व्याजदर असतो, म्हणजे त्यापेक्षा कमी दराने बँका कर्ज वितरीत करीत नाहीत.
स्टेट बँकेने गेल्याच महिन्यात म्हणजे रिझव्र्ह बँकेच्या पतधोरण आढाव्याच्या एक दिवस आधी ठेवींवरील व्याजदर वाढविले होते. तर किमान आधार दर बँकेने यापूर्वी सप्टेंबरमध्ये ०.१० टक्क्यांनी वाढविले होते.
रिझव्र्ह बँकेच्या रेपो दर वाढीनंतर आता अन्य बँकाही त्यांचा किमान आधार दर वाढविण्याची शक्यता आहे. यामुळे बँकांची गृह, वाहन आदी कर्जेही काही प्रमाणात महाग होतील. रिझव्र्ह बँक तिच्या आगामी मध्य तिमाही पतधोरण पुन्हा पाव टक्का रेपो दर वाढविण्याची शक्यता आहे. वाढती महागाई अद्याप कमी होण्याची चिन्हे नसल्याने अधिक रेपो दराचा अंदाज आहे.
गृह, वाहनादी कर्जाच्या हप्त्यांमध्ये वाढीची नांदीच..
बँकेने आपले लक्षावधी छोटे कर्जदार पाहता, सध्या केलेली व्याजदर वाढ ही अल्पतम आहे.
आर. के. सराफ, स्टेट बँकेचे मुख्य वित्तीय अधिकारी
संग्रहित लेख, दिनांक 7th Nov 2013 रोजी प्रकाशित
सण साजरा झाला; आता चढय़ा दराने ऋणफेडीचे सामान्यांवर सावट!
दिवाळी सरली आता वाढीव व्याजदराला सामोरे जा, असा संदेश वाणिज्य बँका देऊ लागल्या आहेत.
First published on: 07-11-2013 at 02:02 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sbi hdfc raises lending rates by 0 20 pct