* ‘सेन्सेक्स’ सात महिन्यांपूर्वीच्या तळाला;
* निफ्टीची सलग पाचवी घसरण
प्रारंभ ५० अंशांच्या बहारदार तेजीसह तर दिवसाची अखेर ५० अंशांच्या घसरणीने अशी एकंदर १०० अंशांच्या घसरण मंगळवारी निफ्टीने दाखविली. निफ्टी निर्देशांकाची या सलग पाचव्या सत्रातील घसरणीने ५५००ची सीमाही ओलांडली असल्याने बाजारात धोक्याची घंटेची ही घणघण असल्याचे विश्लेषकांचे प्रतिपादन आहे.
आशियाई बाजारांमधील सकारात्मकता पाहता, आपल्या भांडवली बाजारात सेन्सेक्स आणि निफ्टीचा प्रारंभ हिरवाईच्या धडाक्याने झाला. पण मध्यान्ह सरेपर्यंत बाजारात विक्रीचा जोर वाढला आणि बाजार बंद होईपर्यंत सेन्सेक्स कालच्या २११ अंशांनी तर निफ्टी निर्देशांक ४८ अंशांच्या घसरणीवर स्थिरावला. सेन्सेक्समधील सातत्याच्या घसरणीने त्याने पुन्हा सप्टेंबर २०१२ चा स्तरापर्यंत लोळण घेतली आहे. सलग पाचव्या घसरणीतून सेन्सेक्सने तब्बल ८१४.४७ अंश अर्थात ४.२८ टक्के गमावले आहेत.
देशातील तिसऱ्या क्रमांकाची सॉफ्टवेअर निर्यातदार कंपनी विप्रोची आजच्या घसरणीत आघाडी राहिली. कंपनीने व्यवसायांचे विभाजन स्वतंत्र कंपन्यांमध्ये करण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या माहिती-तंत्रज्ञान सेवा व्यवसायाची अन्य बिगर आयटी व्यवसायांपासून फारकत करीत ते स्वतंत्र कंपनीत वर्ग केले जाणार आहेत. याचा परिणाम म्हणून ही घसरून दिसून आल्याचे विश्लेषक सांगतात. पण दीर्घ मुदतीत कंपनीला यातून सुयोग्य मूल्यांकन प्राप्त होऊन चांगला भाव मिळेल असेही स्पष्ट करण्यात आले.
दुचाकींच्या क्षेत्रातील देशातील तिसऱ्या क्रमांकाची कंपनी टीव्हीएस मोटर्सचीही बाजारात आज विप्रोसारखीच गत झाली. या कंपनीने दुचाकी बाजारपेठेतील आपले तिसरे स्थान हे जपानच्या होंडाला गमावले असून, विक्रीचा घटता आकडा याचे प्रत्यंतर आहे. बाजार बंद होताना टीव्हीएस मोटर्सचा समभाग ११.५ टक्के घसरणीसह ३५.१५ रुपयांवर स्थिरावला.
संग्रहित लेख, दिनांक 10th Apr 2013 रोजी प्रकाशित
गाळ-उपसा सुरूच
* ‘सेन्सेक्स’ सात महिन्यांपूर्वीच्या तळाला; * निफ्टीची सलग पाचवी घसरण प्रारंभ ५० अंशांच्या बहारदार तेजीसह तर दिवसाची अखेर ५० अंशांच्या घसरणीने अशी एकंदर १०० अंशांच्या घसरण मंगळवारी निफ्टीने दाखविली.

First published on: 10-04-2013 at 03:24 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sensex down