मुंबई : ऊर्जा, माहिती तंत्रज्ञान आणि बँकेच्या समभागात गुंतवणूकदारांनी समभाग विक्रीचा मारा केल्याने बुधवारच्या सत्रात सेन्सेक्सने ११० अंश गमावले.

जागतिक पातळीवरील संमिश्र संकेतांमुळे गेल्या दोन सत्रांतील तेजीला लगाम लागला. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांचा समभाग विक्रीचा मारा आणि खनिज तेलाच्या वाढत्या दरामुळे डॉलरच्या तुलनेत रुपयाने पुन्हा नवीन नीचांक गाठल्याने गुंतवणूकदार निराश आहेत.

दिवसअखेर सेन्सेक्समध्ये १०९.९४ अंशांची घसरण होत तो ५४,२०८.५३ पातळीवर स्थिरावला. सेन्सेक्सची सकाळच्या सत्रात सुरुवात सकारात्मक होती. दिवसभरातील कामकाजात निर्देशांकाने ५४,७८६ अंशांचा उच्चांकी स्तर गाठला होता. मात्र दुपारच्या सत्रात समभाग विकीचा मारा वाढल्याने त्याने नकारात्मक पातळीत प्रवेश केला. तर निफ्टीमध्ये १९ अंशांची घसरण झाली आणि तो १६,२४०.३० पातळीवर स्थिरावला.

देशांतर्गत भांडवली बाजारात औषधी निर्माण आणि गृहोपयोगी वस्तू क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांमध्ये गुंतवणूकदारांनी खरेदीचा सपाटा लावल्याने प्रमुख निर्देशांक सकारात्मक पातळीवर व्यवहार करत होते. मात्र दुपारच्या सत्रात ब्रिटनमधील महागाई दर ९ टक्क्यांची पातळी गाठत ४० वर्षांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचल्याने मध्यवर्ती बँकांकडून पुन्हा आक्रमकपणे व्याजदर वाढ होण्याच्या शक्यतेने गुंतवणूकदारांच्या चिंतेत अधिक भर घातली आहे, असे मत जिओजित फायनान्शियल सव्‍‌र्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी व्यक्त केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सेन्सेक्समध्ये पॉवर ग्रिडच्या समभागात ४.५५ टक्क्यांची घसरण झाली. त्यापाठोपाठ टेक मिहद्र, स्टेट बँक, लार्सन अँड टुब्रो, बजाज फिनसव्‍‌र्ह, भारती एअरटेल, एनटीपीसी आणि विप्रोच्या समभागात घसरण झाली. दुसरीकडे अल्ट्राटेक सिमेंट, एशियन पेंट्स, सन फार्मा, आयटीसी आणि अ‍ॅक्सिस बँकेचे समभाग वधारले होते.