मुंबई : युरोपीय बाजारातील कमकुवत संकेत आणि देशांतर्गत पातळीवर तेल व वायू, बँकिंग आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात सुरू असलेल्या समभाग विक्रीच्या माऱ्यामुळे बुधवारी सलग तिसऱ्या सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांकांमध्ये अर्ध्या टक्क्यांहून अधिक घसरण झाली. सलग तीन सत्रात सेन्सेक्सने ९६७ अंश गमावले, तर निफ्टीमध्ये २५४ अंशांची घसरण होऊन तिने १६,००० अंशांची महत्त्वपूर्ण पातळीही गमावली आहे.
दिवसअखेर, सेन्सेक्स ३७२.४० अंशांच्या घसरणीसह ५३,५१४.१५ पातळीवर बंद झाला. सकाळच्या सत्रात सेन्सेक्सची सकारात्मक सुरुवात झाली होती. त्याने ५४,२११.२२ अंशाच्या दिवसभरातील उच्चांकी पातळीला गवसणीही घातली होती. मात्र दुपारच्या सत्रात गुंतवणूकदारांनी नफावसुलीला प्राधान्य दिल्याने सेन्सेक्स ५४ हजार अंशांच्या पातळीवर टिकाव धरू शकला नाही. तर निफ्टीमध्ये ९१.६५ अंशांची घसरण झाली आणि तो १६,००० अंशांखाली १५,९६६.६५ पातळीवर स्थिरावला.
देशांतर्गत अर्थव्यवस्थेच्या प्रगतीच्या अंगाने औद्योगिक उत्पादन दराची दिलादायक आकडेवारी आणि जागतिक पातळीवर खनिज तेलाच्या किमतीतील घसरणीने दिलेला दिलासा यामुळे देशांतर्गत भांडवली बाजाराची सकारात्मक सुरुवात झाली. मात्र युरोपीय बाजारातील नकारात्मक कल आणि अमेरिकेतील महागाईची आकडेवारी प्रसिद्ध होण्याआधी बाजाराचा ताबा मंदीवाल्यांनी घेतला होता, असे निरीक्षण जिओजित फायनान्शिअल सव्र्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.
सेन्सेक्समध्ये इंडसइंड बँकेच्या समभागात सर्वाधिक ३.४२ टक्क्यांनी घसरण झाली. त्यापाठोपाठ भारती एअरटेल २.८७ टक्के, एचडीएफसी २.६५ टक्के , एचडीएफसी बँक २.४४ टक्के आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभाग १.७७ टक्क्यांनी खाली आला. दुसरीकडे हिंदुस्थान युनिलिव्हर १.९७ टक्के, एशियन पेंट्स १.७ टक्के आणि सन फार्माचा समभाग १.०९ टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले. ग्राहकपयोगी वस्तू आणि औषधी निर्माण क्षेत्रातील समभागांनी निर्देशांकातील घसरण रोखून धरली.
अमेरिकेत महागाईचा ९.१ टक्क्यांचा उच्चांक
अमेरिकेतील महागाई दर ९.१ टक्क्यांसह ४१ वर्षांतील उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे. १९८१ नंतर प्रथमच महागाई दराने ही पातळी गाठली आहे. अमेरिकेत महागाईचा आगडोंब उसळल्याने मध्यवर्ती बँक- फेडरल रिझव्र्हकडून आक्रमकपणे व्याजदर वाढीची शक्यता आहे. इंधन, निवारा खर्च आणि अन्नधान्य महागल्याने अमेरिकेत महागाईने नवीन उच्चांक गाठला आहे.