तीस हजाराकडे सेन्सेक्सचे कूच!

केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यास महिन्याभराचा अवधी असताना भांडवली बाजाराची घोडदौड अनोख्या टप्प्याचे शिखर गाठण्याकडे सुरू आहे.

केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यास महिन्याभराचा अवधी असताना भांडवली बाजाराची घोडदौड अनोख्या टप्प्याचे शिखर गाठण्याकडे सुरू आहे. सेन्सेक्सने जवळपास तीनशे अंश झेप घेत आठवडय़ाच्या पहिल्याच दिवशी २९,५०० पुढील प्रवास नोंदविला. तर पाऊणशे अंश वाढीने निफ्टीनेही ८,९०० ला पार केले.
दोन्ही प्रमुख निर्देशांकांचा त्या – त्या भांडवली बाजारातील हा ऐतिहासिक टप्पा आहे. प्रमुख निर्देशांकांनी सलग आठवडय़ात व्यवहारात तेजी तर सहाव्या सत्रात विक्रम नोंदविला आहे. २९२.२० अंश वाढीने सेन्सेक्स २९,५७१.०४ वर तर ७४.९० अंश भर घातल निफ्टी ८,९१०.५० पर्यंत पोहोचला.
अमेरिकेच्या अध्यक्षांच्या भारतभेटीने भारतातील अर्थव्यवस्थेच्या निर्दशकाने कमालीचा उत्साह नोंदविला आहे. उभय देशांमधील अणुऊर्जा करारामुळे देशात समभागांच्या रुपात विदेशी निधीचा ओघ वाढला आहे. गेल्या आठवडय़ाची अखेर करताना मुंबई शेअर बाजारात शुक्रवारीही २,०१९.९८ कोटी रुपये विदेशी गुंतवणूकदारांकडून ओतले गेले. युरोपीयन मध्यवर्ती बँकेच्या आगामी दीड वर्षे रोखे खरेदीच्या निर्णयानेही देशात विदेशी गुंतवणुकीचा ओघ कायम राहिल, याच आशेवर भांडवली बाजारात तेजीचे व्यवहार सलग नोंदले जात आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारात आशियाईतील सिंगापूर, तैवान, जपान, दक्षिण कोरियातील प्रमुख निर्देशांकही १.७२ टक्क्य़ांपर्यंत वधारले. चीन व हाँग काँगमधील निर्देशांकांमध्ये एक टक्केपर्यंत उतार अनुभवला गेला. तर युरोपीय बाजारातील सुरुवातीचे वातावरणही काहीसे नरम होते. तेथे फ्रान्स, जर्मनी, ब्रिटनमधील निर्देशांक अध्र्या टक्क्य़ांची घसरण नोंदवित होते.
सकाळच्या व्यवहारातच ८,८७१.३५ वर सुरू झालेल्या निफ्टीचा प्रवास लगेचच ८,९०० ला पार करता झाला. सत्रात राष्ट्रीय शेअर बाजाराचा हा प्रमुख निर्देशांक ८,९२५.०५ पर्यंत गेला. तर २९,४५१.६५ ने सुरुवात करणाऱ्या मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने सत्रात २९,६१८.५९ पर्यंत झेप घेतली.
भांडवली वस्तू, बँक, वाहन, स्थावर मालमत्ता, ऊर्जा क्षेत्रातील समभागांना मागणी राहिली. २.३० टक्क्य़ांसह बँक निर्देशांक सर्वाधिक आघाडीवर राहिला. तर भांडवली वस्तू निर्देशांक १.८४ टक्क्य़ांनी उंचावला. एकूण निर्देशांकातील तेजीत गेल्या काही सत्रांपासून नरम असलेले स्मॉल व मिड कॅपही एक टक्क्य़ांच्या आत वधारले.
सेन्सेक्समध्ये अ‍ॅक्सिस बँक, सिप्ला, आयसीआयसीआय बँक, टाटा मोटर्स, आयटीसी, एचडीएफसी बँक, भारती एअरटेल, लार्सन अ‍ॅन्ड टुब्रो, एचडीएफसी लिमिटेड, स्टेट बँक यांच्या समभागांचे मूल्य वाढले. मुंबई शेअर बाजारातील या प्रमुख निर्देशांकातील एकूण १९ समभाग वधारले. तर तेजीतही डॉ. रेड्डीज, इन्फोसिस, महिंद्र अ‍ॅन्ड महिंद्र, कोल इंडिया, हिंदुस्थान यूनिलिव्हरला कमी मागणीअभावी नुकसान सोसावे लागले.
सेन्सेक्समधील गेल्या आठ सत्रातील झेप २,२२४.२२ अंश राहिली आहे. टक्केवारीत ती ८ इतकी आहे. तर त्यापैकी पाच व्यवहारात त्याने नवा विक्रम राखला आहे. मुंबई शेअर बाजारातील सोमवारची एकूण उलाढाल ३,९९०.८६ कोटी रुपये नोंदली गेली आहे.

स्थानिक पातळीवर अर्थव्यवस्थेबाबतचे आशादायक वातावरण भांडवली बाजाराला नव्या टप्प्यावर घेऊन गेले आहे. देशाच्या अणुऊर्जा तसेच संरक्षण क्षेत्रातील अमेरिकेबरोबरच्या सहकार्याने बाजारातील संबंधित समभाग, निर्देशांकांमध्येही वाढ नोंदली गेली आहे.
– जयंत मांगलिक, अध्यक्ष (किरकोळ वितरण), रेलिगेयर सिक्युरिटीज.

भारतात अमेरिकेतील कंपन्यांना अणुऊर्जेशी संबंधित उपकरणे तयार करण्यासाठी झालेल्या करारामुळे येथील भांडवली बाजारातील तेजी आहे. अब्जावधी डॉलरच्या या गुंतवणुकीमुळे भांडवली बाजारातील प्रमुख निर्देशांकांनी आठवडय़ाच्या सुरुवातीलाही सकारात्मक प्रवास नोंदविला आहे.
– जिग्नेश चौधरी, प्रमुख (संशोधन), व्हेरासिटी ब्रोकिंग सव्‍‌र्हिसेस.
प्रामुख्याने बँक समभागांच्या मूल्य वाढीने सेन्सेक्समधील तेजी अधिक दिसून येते. जागतिक बाजारातील निर्देशांक वाढही गुंतवणूकदारांचे मनोबल उंचावणारी ठरली आहे. देशाच्या वित्तीय तूट नियंत्रणात राखण्याबाबत व्यक्त केला गेलेला विश्वासही बाजाराच्या विक्रमी स्तरावर प्रतिबिंबित झाला आहे.
संजीव झारबडे, उपाध्यक्ष (खासगी ग्राहक समूह संशोधक), कोटक सिक्युरिटीज.

सोने-चांदीची मोठी माघार
मुंबई : सराफा बाजारातील दरांमध्ये मंगळवारी मोठी घसरण नोंदली गेली. यामुळे सोन्याचा तोळ्याचा भाव २८ हजारांखाली आला. तर किलोच्या चांदीचा दरही ४० हजार रुपयांपासून माघारी फिरला आहे. स्टॅण्डर्ड प्रकारच्या सोन्याचा १० ग्रॅमसाठीचा दर मंगळवारी २६० रुपयांनी कमी होती २८ हजार रुपयांच्या आत, २७,७८५ रुपयांपर्यंत स्थिरावला. शुद्ध सोन्याच्या दरातही हाच उतरता क्रम राहिला.
   तोळ्यासाठी शुद्ध सोने २८ हजाराच्या काठावर, २७,९३५ रुपयांवर राहिले. तर चांदीच्या किलोच्या दरांमध्ये तब्बल ७३० रुपयांची घसरण झाल्याने पांढरा धातू ४० हजार रुपयांच्या खाली, ३९,८५० रुपयांवर आला.
दरम्यान, परकी चलन व्यासपीठावर अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया अवघ्या एका पैशांनी वाढला. चलन ६१.४१ पर्यंत पोहोचले. सुरुवातीच्या व्यवहारातील घसरण मोडून काढताना रुपया फार पुढे जाऊ शकला नाही. शुक्रवारच्या तुलनेत त्यात केवळ ०.०२ टक्क्य़ांची भर पडली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sensex rises to all time high touch 29500 point