मुंबई : देशांतर्गत पातळीवर महागाईच्या आकडेवारीच्या प्रतीक्षेत भांडवली बाजारातील प्रमुख निर्देशांकांची शुक्रवारच्या सत्रात नकारात्मकतेने सुरुवात झाली. मात्र दिवसअखेर प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स १३० अंशांच्या वाढीसह स्थिरावला. निर्देशांकात सर्वाधिक योगदान राखणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बँक आणि टाटा स्टीलच्या समभागांवर गुंतवणूकदारांनी लक्ष केंद्रित केल्याने आठवडय़ाची सांगताही सकारात्मक पातळीवर झाली.

शुक्रवारच्या सत्रात दिवसअखेर  सेन्सेक्स १३०.१८ अंशांनी वधारून ५९,४६२.७८ पातळीवर बंद झाला. दुसरीकडे निफ्टीमध्ये ३९.१५ अंशांची किरकोळ वाढ झाली आणि तो १७,६९८.१५ पातळीवर विसावला.

जागतिक पातळीवरील भांडवली बाजारांमधील सकारात्मक कल, परदेशी गुंतवणूकदारांचा देशांतर्गत भांडवली बाजाराकडे पुन्हा वाढलेल्या ओढय़ामुळे बाजारात उत्साह टिकून होता. मात्र माहिती-तंत्रज्ञान आणि औषधी निर्माण कंपन्यांच्या समभागांमधील घसरणीने निर्देशांकांच्या दौडीला काहीसा लगाम घातला. बाजारातील व्यवहार समाप्तीनंतर जाहीर होणाऱ्या महागाई दराच्या आकडेवारीकडे शुक्रवारच्या सत्रात गुंतवणूकदार नजर लावून होते.   परिणामी गुंतवणूकदारांनी आर्थिक कामगिरी मजबूत असणाऱ्या निवडक कंपन्यांच्या समभाग खरेदीला प्राधान्य दिले. परदेशी गुंतवणूकदारांनी पुन्हा वळविलेला मोर्चा आणि डॉलर निर्देशांकात घसरण झाल्याने बाजारातील तेजीला चालना मिळाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गुंतवणूकदारांनी तेल-वायू आणि धातू कंपन्यांच्या समभाग खरेदीस प्राधान्य दिले. दुसरीकडे माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांच्या समभागात गुंतवणूकदारांनी नफा वसूल करण्यासाठी विक्रीचा मारा केला. देशातील सीएनजीच्या किमती कमी करण्यासाठी नैसर्गिक वायूचा पुरवठा उद्योगांकडून शहरातील किरकोळ विक्री करणाऱ्या वितरकांकडे वळविण्याचे निर्देश सरकारने दिल्याने तेल-वायू कंपन्यांचे समभाग तेजीत होते, असे मत जिओजित फायनान्शियल सव्‍‌र्हिसेसचे विनोद नायर यांनी नोंदविले.