एक दिवसाची घसरण नोंदविल्यानंतर भांडवली बाजार पुन्हा एकदा तेजीच्या प्रवासाला निघाला. गृहनिर्माण क्षेत्राला मिळत असलेल्या सरकारच्या योजनारूपी चालनेमुळे गुंतवणूकदारांनी सेन्सेक्सला गुरुवारी १६६.३० अंश वाढ नोंदविण्यास भाग पाडले. मुंबई निर्देशांक त्यामुळे २७,८९५.९७ पर्यंत पोहोचला. तर ३७.१५ अंश वाढीमुळे निफ्टी ८,४०० च्या काठावर, ८,३९८ वर गेला.
प्रमुख निर्देशांकांनी गेल्या १० सत्रांतील नववी वाढ गुरुवारी नोंदविली. महिन्यातील वायदापूर्तीच्या व्यवहाराचा हा अखरेचा दिवस होता. या वेळी ग्रीसमधील आर्थिक बिकट स्थितीकडे गुंतवणूकदारांनी दुर्लक्ष केले. तर भांडवली बाजारात कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटनेची रक्कम येत्या महिन्यापासून गुंतवली जाण्याच्या स्पष्टतेनेही गुंतवणूकदारांचा खरेदीचा उत्साह दिसून आला.
याचबरोबर गृहनिर्माण क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी शुभारंभ झालेल्या केंद्र सरकारच्या तीन योजनांचेही बाजारात स्वागत होताना दिसले. परिणामी संबंधित क्षेत्रातील, विशेषत: स्थावर मालमत्ता कंपन्यांचे समभाग बाजाराच्या व्यासपीठावर उंचावले. याला जोड गृह वित्त कंपन्यांच्या समभागांचीही मिळाली.
बुधवारच्या घसरणीनंतर सेन्सेक्सच्या गुरुवारच्या सत्राची सुरुवातही २६,६६०.२२ अशी नरमच राहिली. सत्रात २७,६३५.७६ हा तळ अनुभवल्यानंतर बाजारात तेजीचे वातावरण निर्माण झाले. यावेळी मुंबई निर्देशांक २७,९६८.७५ पर्यंत झेपावला. यापूर्वीच्या व्यवहारात सेन्सेक्स ७४.७० अंशांनी घसरला होता. तर आधीच्या सलग नऊ व्यवहारांतील त्याची वाढ १,००० हून अधिक अंशांची राहिली आहे.
व्यवहारातील तेजीदरम्यान राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने गुरुवारी ८,४००चा स्तर अनुभवला. मात्र तेजी नोंदवूनही तो अखेपर्यंत या टप्प्यापुढे राहू शकला नाही. सेन्सेक्समधील ३० पैकी १७ समभागांचे मूल्य वाढले.
दिवसभर अस्थिर राहिलेल्या बाजारात स्थावर मालमत्तासह भांडवली वस्तू, बँक क्षेत्रातील समभागांनाही मागणी राहिली. सेन्सेक्समध्ये बजाज ऑटो, गेल, लार्सन अॅन्ड टुब्रो, एचडीएफसी बँक यांचे मूल्य ४.६५ टक्क्यांपर्यंत वाढले. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये भांडवली वस्तू २.१२ टक्के अशा सर्वाधिक मात्रेने वाढला.
संग्रहित लेख, दिनांक 26th Jun 2015 रोजी प्रकाशित
पुन्हा तेजीच्या मार्गावर
एक दिवसाची घसरण नोंदविल्यानंतर भांडवली बाजार पुन्हा एकदा तेजीच्या प्रवासाला निघाला.

First published on: 26-06-2015 at 08:27 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sensex up over 200 points nifty above