गेल्या सलग सहा व्यवहारांपासून तेजीत असलेल्या सेन्सेक्सला नव्या सप्ताहरंभाला सोमवारी खीळ बसली. लागोपाठच्या चार व्यवहारातील विश्रामानंतर मुंबई निर्देशांकाने आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी २५ हजाराखालील प्रवास नोंदविला. ३७१ अंशांच्या रूपाने मुंबई शेअर बाजाराने गेल्या पाच आठवडय़ातील सर्वात मोठी घसरण नोंदविली.
चालू महिन्यासह एकूण २०१५-१६ आर्थिक वर्षांतील वायदापूर्तीची अखेर येत्या गुरुवारी, ३० मार्च रोजी आहे. तत्पूर्वी वरच्या टप्प्यावर असलेल्या भांडवली बाजारातील प्रमुख निर्देशांकाचा लाभ उठविण्याच्या हेतूने गुंतवणूकदारांनी सोमवारी नफेखोरीचे धोरण अवलंबिले.
यामुळे राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत शतकाहूनही अधिक घसरण राखली जाऊन निर्देशांक ७,६०० वर येऊन ठेपला. आठवडय़ाच्या प्रारंभाला आशियाई तसेच युरोपीय निर्देशांकांमध्ये संमिश्र वातावरण होते. येथे, मुंबई शेअर बाजाराची सोमवारची सुरुवात तेजीने झाली. व्यवहाराच्या सुरुवातीलाच सेन्सेक्स यावेळी २५,५०० नजीक होता. दुपारच्या व्यवहारानंतर मात्र बाजारात नफेखोरीचे वातावरण निर्माण झाले. परिणामी त्याचा यानंतरचा २४,८९५.४९ हा सत्राचा तळ राहिला.
गेल्या आठवडय़ात केवळ सोमवार, मंगळवार व बुधवारीच बाजारात व्यवहार झाले होते. गुरुवार व शुक्रवारी अनुक्रमे धूलिवंदन व गुड फ्रायडेनिमित्त सुटी होती. तर शनिवार व रविवारी बाजारात नेहमीप्रमाणे व्यवहार झाले नाहीत. यापूर्वीच्या सलग सहा व्यवहारात निर्देशांकाने वाढ राखली होती.
नव्या आठवडय़ाच्या पहिल्याच दिवशीच्या सत्रअखेर सेन्सेक्समधील केवळ बजाज ऑटो, गेल व एनटीपीसी यांच्या समभागांना मागणी राहिली. इतर सर्व २७ समभागांचे मूल्य घसरले. यामध्ये टाटा स्टील, स्टेट बँक, सन फार्मा हे आघाडीवर होते.
क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये स्थावर मालमत्ता सर्वाधिक ४.३५ टक्क्य़ांनी घसरला. मुंबई शेअर बाजारातील स्मॉल व मिड कॅप निर्देशांकांमध्ये दीड ते दोन टक्क्य़ांपर्यंतची आपटी नोंदली गेली.
राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीचा सोमवारचा प्रवास ७,७४९.४० ते ७,५८७.७० असा नोंदला गेला.
१.२४ लाख कोटींची ओहोटी
एकाच व्यवहारात जवळपास ३७५ अंश आपटी नोंदविणाऱ्या मुंबई शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची मालमत्ता सोमवारी १.२४ लाख कोटी रुपयांनी कमी झाली. बाजारात सूचिबद्ध असलेल्या कंपन्यांचे मूल्य आठवडय़ाच्या पहिल्याच दिवशी १,२४,९६७ कोटी रुपयांनी कमी होत ते ९३,०४,३७५ कोटी रुपयांवर आले. सेन्सेक्सने २५ हजाराखालील तळ राखताना गेल्या सहा व्यवहारातील तेजीही सोमवारी संपुष्टात आणली. तर एकाच व्यवहारातील त्याची आपटी ही गेल्या सव्वा महिन्यातील सर्वाधिक राहिली. गेल्या सहा व्यवहारात सेन्सेक्समध्ये ६६०.१९ अंश वाढ राखली गेली होती. तर निफ्टीने या दरम्यान २५५.९० अंशवाढीची कामगिरी बजाविली होती.