बँकांच्या पारंपरिक एटीएमप्रमाणेच सुविधा देण्यात अग्रेसर असणाऱ्या टाटा कम्युनिकेशन्स पेमेंट सोल्युशन कंपनीने या क्षेत्रातील पहिल्या पाच खेळाडूंमध्ये स्थान राखण्याचा निश्चय केला आहे. याअंतर्गत कंपनी तीन वर्षांत २०,००० व्हाइट लेबल एटीएमचा टप्पा गाठेल.
नव्या बँक परवाना स्पर्धेतून माघार घेणाऱ्या टाटा समूहातील बँक व्यवस्थेशी निगडित सेवा देणारी कंपनी म्हणून टाटा कम्युनिकेशन्स ओळखली जाते. ‘इंडिकॅश’ नाममुद्रेखाली तिची देशस्तरावर ९०० व्हाइट लेबल एटीएम होण्याच्या मार्गावर आहेत. ‘टाटा कम्युनिकेशन्स पेमेंट सोल्युशन’चे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव पटेल यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले की, एटीएम उभारणी क्षेत्रात सध्या सार्वजनिक व जुन्या खासगी बँका अग्रेसर आहेत. त्यातही ४० हजारांहून अधिक एटीएमसह सार्वजनिक स्टेट बँक आघाडीवर आहे.
नव्या ध्येयानुसार तीन वर्षांत १५ हजार ते २० हजार एटीएम उभारून या क्षेत्रातील पहिल्या पाचमध्ये स्थान पटकाविण्याच्या तयारीत कंपनी आहे. चांगला प्रतिसाद मिळणाऱ्या महाराष्ट्रात कंपनीची २०३ एटीएम आहेत. राज्याच्या १३ जिल्ह्यांमध्ये ‘इंडिकॅश’ एटीएम आहेत. कंपनीने जून २०१३ मध्ये ठाणे जिल्ह्य़ातील चंद्रपाडा या दुर्गम भागात पहिले एटीएम उभारून या व्यवसायास प्रारंभ केला होता. या वेळी महाराष्ट्रात १४ हजार एटीएम होते. पहिल्या तीन महिन्यांतच १०० एटीएम पार करणाऱ्या या कंपनीचे महाराष्ट्रातील २०० सह देशभरातील ९०० व्हाइट लेबल एटीएमचे उद्दिष्ट मार्च २०१४ अखेर समीप आहे. स्वत: एटीएम सेवा पुरविणाऱ्या बँकांव्यतिरिक्त इतरांमार्फत हीच सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या यंत्रणेला ‘व्हाइट लेबल एटीएम’ म्हटले जाते. ही यंत्रणा बँकांच्या एटीएमप्रमाणेच असते; मात्र याबाबतची रोकड भरणे, एटीएमची देखभाल, त्यासाठीची जागा निश्चिती, तंत्रज्ञान आदी उपाययोजना हे एटीएम उभारणाऱ्या खासगी कंपन्यांनाच करावे लागतात.
असे एटीएम पुरविण्यासाठी रिझव्र्ह बँकेने मुथूट फायनान्स, प्रिझम पेमेन्ट्स यांनाही परवानगी दिली आहे. पैकी मुथूट येत्या तीन वर्षांत ६,००० तर प्रिझम पहिल्या टप्प्यात १०,००० व्हाइट लेबल एटीएम उभारणार आहे. याबाबत रिझव्र्ह बँकेने जुलै २०१२ मध्ये मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. यानंतर टाटा समूह परवाना मिळविलेली पहिली कंपनी ठरली.