लेख – तिसरा
eco04 फ्युचर्स आणि ऑप्शन्सचे व्यवहार प्रकार अलीकडे फारच लोकप्रिय झाले  आहेत हे नि:संशय. पारंपरिक रोखीच्या बाजाराच्या तुलनेत व्यवहारात अनेकांगाने असलेला फरक जाणून घेण्यापूर्वी या बाजाराच्या लोकप्रियतेच्या कारणांकडे एकवार पाहू या.
१)    फ्युचर्स बाजाराचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे जवळ शेअर्स नसताना किंवा कमी पसे असताना सुद्धा केवळ १० ते १५ टक्के मार्जिन रक्कम भरून १००% किमतीवर नियंत्रण ठेवता येत असल्याने या बाजारामध्ये खरेदी किंवा विक्रीची ‘पोझिशन’ ठेवता येते. खरेदीच्या क्रियेला ‘लाँग पोझिशन’ म्हणतात व विक्रीला ‘शॉर्ट सेलिंग’ असे म्हणतात.
 २) सदर व्यवहारावर लागणाऱ्या करांमध्ये फार मोठी तफावत असून, अत्यंत कमी खर्चामध्ये हे व्यवहार होतात.
फ्युचर्स आणि ऑप्शन्समध्ये स्वतंत्र शेअर्स उदा. एसबीआय, रिलायन्स, तसेच निर्देशांक जसे निफ्टी किवा सेन्सेक्स मध्ये व्यवहार करता येतो. अतिशय जास्त भागभांडवल असणाऱ्या कंपन्या व ज्यांच्या शेअर्समध्ये मोठय़ा प्रमाणात खरेदी विक्री होते व ज्यांनी निर्माण केलेल्या वस्तुंमुळे देशाची आíथक स्थिती मोजता येऊ शकते, अशा ५० कंपन्यांच्या शेअर्सचा गुच्छ म्हणजे निफ्टी व ३० शेअर्सचा गुच्छ म्हणजे सेन्सेक्स.   
eco03उपलब्धी बाजारामध्ये मुख्यत्वे दोन प्रकारचे व्यक्ती सहभागी असतात
 १) हेजर्स (Hedgers): जवळ असलेले शेअर्स न विकता नजीकच्या काळात भाव खाली येण्याची भीती वाटत असल्याने १० ते १५% मार्जिन भरून फ्युचर्स मार्केटमध्ये त्या शेअर्सची विक्री करतात किवा कमी किमतीचे पुट ऑप्शन खरेदी करतात. भाव उतरले की शेअर्समध्ये होणारा तोटा फ्युचर्स किवा ऑप्शन्समध्ये होणाऱ्या फायद्याने भरून निघतो.
२) सटटा करणारे (Contract): बाजारावर सतत लक्ष ठेऊन शेअर्सचे भाव वर जाणार असे वाटत असल्यास फ्युचर्स खरेदी करणार व कालांतराने नफा मिळून विकणार किंवा खाली जाणार असे वाटत असल्यास ते फ्युचर्स विकणार व कालांतराने नफा मिळाल्यास बाजारामधून विकत घेणार.
हे व्यवहार ‘सेबी’ मान्यताप्राप्त बीएसई आणि एनएसई या बाजारांमार्फत (एक्स्चेंज) होतात. खरेदीदार आणि विक्रेते यांच्यामधील व्यवहाराची संपूर्ण जबाबदारी एक्स्चेंजच घेत असते.
फ्युचर्स बाजारामधील काही संकल्पना करारामध्ये शेअर्सची संख्या: प्रत्येक व्यवहार हा करारानुसार (Contract) असून करारामध्ये शेअर्सची संख्या (लॉट) निश्चित केलेली असते. जसे एसबीआयचा एक लॉट १२५० शेअर्सचा आणि निफ्टीसाठी हेच प्रमाण २५ असे आहे. त्यामुळे कमीत कमी एक लॉट म्हणजे निफ्टीचे २५ शेअर्स किवा एसबीआयचे १२५० शेअर्सचे व्यवहार करावे लागतात.
कॅश भाव: कॅश मार्केटमध्ये असलेला भाव हा शेअर्सचा खरा बाजारभाव असतो व त्या भावाला स्पॉट / कॅश भाव असे म्हटले जाते.
उपलब्धी भाव: उपलब्धी भाव म्हणजेच डेरिव्हेटिव्ह मार्केटचा भाव व स्पॉट भाव यामध्ये थोडा फरक असतो.
करार चक्र (कॉन्ट्रॅक्ट सायकल): सदर करार एक दोन अथवा तीन महिन्यांसाठीचे असतात व  एकाच वेळी सर्व करारामध्ये व्यवहार सुरू असतो. या विविध करारांना करार सायकल म्हणतात.
समाप्ती (एक्सपायरी) तारीख: ज्या तारखेला हे करार संपुष्टात येतात त्या तारखांना एक्सपायरी तारीख म्हणतात व एक्सपायरी तारखेला खरेदीदार व विक्रेते यांचे व्यवहार त्यांच्या खात्यामध्ये वजा-जमा करण्यात येऊन व्यवहार पूर्ण करण्यात येतात.  (क्रमश:)
नरेश यावलकर -aprimeaocm@yahoo.com
(लेख क्र. ४ मध्ये आपण फ्युचर्स खरेदीदार आणि विक्रेते यांचा नफ्या-तोटय़ाचे गणित समजून घेऊ)