स्वप्नातले घर खरेदी करणे हा तुमच्या कुटुंबाने घेतलेला एक महत्त्वाचा निर्णय असतो. घराचे स्वप्न साकार करण्यातील एक महतत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे गृहकर्ज. गृहकर्ज घेत असताना अर्जदारांनी गृहकर्जाशी संबंधित मुख्य संकल्पना/निकष समजून घेणे आवश्यक आहे, म्हणजे कर्जाची रक्कम (प्रिन्सिपल), परतफेडीचा कालावधी, व्याजदर, इक्वेटेड मंथली इन्स्टॉलमेंट (ईएमआय) व (लागू असल्यास) प्री-पेमेंट चार्ज. हे निकष कर्जदाते कर्जमंजुरीच्या वेळी नोंदवून ठेवतात आणि मंजुरी पत्रामार्फत कर्ज घेणाऱ्यांना कळवतात. 

गृहकर्ज घेण्यापूर्वी अर्जदार तपासून पाहत असलेल्या घटकांपकी एक मुख्य घटक म्हणजे कर्जदात्याकडून आकारला जाणारा व्याजदर. अर्जदाराच्या गरजेला अनुसरून असे तीन प्रकारचे व्याजदर कर्जदाते देऊ करतात – स्थिर दर, बदलता व्याजदर व काही भाग स्थिर – काही भाग बदलता व्याजदर. स्थिर व्याजदर गृहकर्जाच्या कालावधीमध्ये बदलत नाही. बेसरेट आणि मार्जनि यांचा विचार करून ग्राहकांना किती व्याजदर आकारायचा, यानुसार व्याजदर ठरवला जातो.
काही कर्जदाते नव्या प्रकारचे गृहकर्ज देऊ करतात. हा नवा प्रकार म्हणजे, स्थिर व बदलत्या व्याजदराचे मिश्रण. यामध्ये सुरुवातीच्या काही वर्षांत व्याज स्थिर दराने आकारले जाते आणि ते बदलत्या व्याजदरापेक्षा लक्षणीय अधिक नसते. आधी निश्चित केलेल्या कालावधीच्या अखेरीस, कर्जदाराला स्थिर व्याजदरचे नूतनीकरण करण्याचा किंवा लागू असलेला बदलता व्याजदर स्वीकारण्याचा पर्याय दिला जातो.
ग्राहकांना त्यांच्या मूल्यमापनानुसार त्यांच्या गृहकर्जासाठी व्याजदराचा प्रकार निवडण्याची मुभा असते. काही कर्जदाते कन्व्हर्जन फी आकारून स्थिर आणि बदलता व्याजदर यामध्ये गृहकर्ज परिवíतत करण्याची सुविधा देतात. दीर्घकाळात हे फायद्याचे वाटल्यास ग्राहकांना ही सुविधा स्वीकारता येते. प्रश्न असा निर्माण होतो की, आपल्या गरजांसाठी कोणत्या व्याजदर साजेसा आहे हे कसे ठरवायचे? आपल्या गरजांना कोणते गृहकर्ज एकदम साजेसे ठरेल, याचा निर्णय घेण्यापूर्वी अर्जदारांनी विविध कर्जदात्यांकडे उपलब्ध असलेल्या पर्यायांची तुलना करून पाहावी. दीर्घकाळासाठी कर्ज घेणार असलेल्या आणि काही काळाने कर्जावरील व्याजदरात झालेला बदल स्वीकारण्यास तयार असलेल्या ग्राहकांनी बदलत्या व्याजदराचा विचार करायला हरकत नाही. कर्जाच्या संपूर्ण कालावधीत निश्चित ईएमआय भरायची इच्छा असलेल्या आणि थोडासा अधिक व्याजदर भरायची तयारी असलेल्यांनी स्थिर व्याजदराचा विचार करावा.
व्याजदर कमी झालेले असताना मोठय़ा काळाच्या कर्जाला पसंती देणाऱ्यासाठी काही स्थिर – काही बदलता व्याजदर साजेसा आहे. सुरुवातीच्या काही वर्षांत स्पर्धात्मक स्थिर व्याजदराचा लाभ घेण्याबरोबर, दीर्घकाळात बदलत्या व्याजदरामुळे बचतीचा लाभ घेण्याची इच्छा असलेल्या ग्राहकांसाठी हा पर्याय सोयीचा आहे.

लेखक आयसीआयसीआय बँकेच्या ‘सिक्युअर्ड एॅसेट्स’ विभागाचे व्यवस्थापक आहेत.