मुंबई: सोमवारची भांडवली बाजारातील जागतिक पडझड ही बाजारात नव्याने पदार्पण करणाऱ्या नव्या पिढीच्या तंत्रज्ञानाधारित नवउद्यमी कंपन्यांसाठी खूपच मारक ठरली. पेटीएम, पॉलिसीबझार, नायका, झोमॅटो, कारट्रेड टेक या कंपन्यांचे समभाग दणदणीत आपटले.

गेल्या काही महिन्यांत अतिभव्य प्रारंभिक भागविक्री आणि  त्याला गुंतवणूकदारांकडून दणकेबाज प्रतिसाद मिळवीत अनेक नवीन पिढीच्या कंपन्यांचे समभाग बाजारात सूचिबद्ध झाले. परंतु ताज्या पडझडीत या कंपन्यांच्या समभागांना आता वाली उरला नाही, अशी मोठी घसरण त्यात सुरू आहे. अनेक पश्चातापदग्ध गुंतवणूकदारांचे सांत्वन म्हणून समाजमाध्यमांमध्ये मीम्स आणि कोटय़ांचा पाऊस पडत असल्याचेही चित्र दिसून येत आहे. अगदी कोटक मिहद्र बँकेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक उदय कोटक यांनाही ट्विटरवर याचा उपहासात्मक समाचार घेणारी ट्विपण्णी करण्याचा मोह आवरता आला नाही.

फस्र्ट ग्लोबलचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शंकर शर्मा यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले की, माझ्या मते या नव्या पिढीच्या या समभागांत आणखीही ५० टक्क्यांपर्यंत मूल्य घसरण शक्य आहे आणि तरीही हे समभाग स्वस्त आहेत, असे मानता येणार नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जानेवारीच्या सुरुवातीला तीन लाख कोटी डॉलरचे बाजार मूल्य मिळविणारी अ‍ॅपल ही अमेरिकी भांडवली बाजारातील पहिली कंपनी ठरली. मात्र वाढत्या जागतिक चलनवाढीच्या चिंतेमुळे आणि व्याजदरात वाढ होण्याची शक्यता यामुळे गुंतवणूकदारांनी समभागांपासून फारकत गेल्याने, गेल्या आठवडय़ापासून अमेरिकी बाजारातही तंत्रज्ञान कंपन्यांच्या समभागात तीव्र घसरण दिसून आली आहे.