तृप्ती राणे

गुंतवणूक हा वेळ घालवण्यासाठी जोपासलेला छंद नसून तो एक व्यवस्थित उद्योग आहे. तेव्हा या उद्योगाचे नियम शिकून त्यात प्रामाणिकपणे प्रयत्न केले तर यश मिळायची शक्यता वाढते.

‘मार्केटमध्ये योग्य वेळ साधण्यापेक्षा जास्त वेळ टिकणं अधिक महत्त्वाचं आहे! तरंच दीर्घकालीन फायदे मिळू शकतात.’ – गुंतवणूकदार साक्षरतेचा कार्यक्रम जर कुणी पहिला असेल तर एखाद्या तरी वक्त्याकडून त्याला हे बाळकडू नक्कीच मिळालं असेल.

प्रत्येक वेळी हेच सांगण्यात येतं की गुंतवणुकीत सातत्य पाहिजे. तुम्ही प्रत्येक महिन्यात गुंतवणुकीसाठी पैसे बाजूला काढा, आणि मग उरलेले खर्चासाठी वापरा. म्हणून रिकरिंग डिपॉझिट, विमा पॉलिसी, म्युच्युअल फंडातील एसआयपी अशा प्रकारातून सामान्य गुंतवणूकदार पैसे बाजूला ठेवत जातो. काही गुंतवणूकदार याच पद्धतीने शेअर बाजारात थेट गुंतवणूकसुद्धा करतात. एका ठरावीक रकमेत काही शेअर्स दरमहा ते घेतात आणि असं करत करत स्वत:चा पोर्टफोलिओ तयार करतात. आणि हे सगळं करून अपेक्षा एकच असते – चांगले परतावे मिळायला हवे! करोना सुरू झाल्यापासून अनेक जणांनी मला हा प्रश्न विचारला की, गेली चार-पाच वर्षे गुंतवणूक करून सुद्धा जर रास्त परतावे मिळाले नाही, तर आपलं कुठेतरी काहीतरी चुकतंय का? गुंतवणुकीत इतकं सातत्य राखूनसुद्धा जर परतावे मिळाले नाही तर मग उपयोग काय? त्यावर मी त्यांच्या पोर्टफोलिओचा आणि मानसिकतेचा आढावा घेतला. मला, प्रकर्षांने जाणवलेल्या काही गोष्टी ज्यामुळे अशा गुंतवणूकदारांचा अपेक्षाभंग होतो त्या खालीलप्रमाणे आहेत.

चुकतंय काय?

१. अनेक म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक.

२. म्युच्युअल फंडाच्या एकसारख्या प्रकारामध्ये वेगवेगळ्या फंड घराण्याचे फंड.

३. समभाग गुंतवणूक करताना स्वस्त समजून कमी किमतीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक.

४. पोर्टफोलिओमध्ये शेअर्सची भेळ! म्हणजेच थोडय़ा थोडय़ा प्रमाणात अनेक शेअर्स.

५. गुंतवणूक होत आहे, परंतु कशासाठी, कधी – या गोष्टींबद्दल विचार केलेला नसल्याने, त्यातून कधी बाहेर पडायचं, किंवा कधी अजून वाढीव गुंतवणूक करायची याबाबत काही प्लॅन नाही.

६. गुंतवणूक केल्यानंतर तिचा योग्य आढावा घेतला गेला नसल्याने अपेक्षित परतावे न मिळता नुकसान झालेलं होतं.

७. जोखीम क्षमतेच्या पलीकडे जाऊन केलेल्या गुंतवणुकीतून आधी फायदा झाला. परंतु मार्केट पालटल्यावर त्याच गुंतवणुकीत नुकसान झालेलं आहे.

८. कोणताही अभ्यास न करता ‘टिप्स’च्या आधारे केलेल्या गुंतवणुका!

९. परताव्याची तुलना करताना चुकीचे मापदंड वापरणे.

१०. ‘स्टॉप लॉस’ म्हणजेच नुकसानाची मर्यादा न ठरवता, पुढे कधीतरी फायदा होईल या आशेने गुतंवणुकीतून बाहेर न पडणं.

ही सर्व कारणं बघितल्यावर मग सहजपणे लक्षात येतं की सर्वसाधारणपणे गुंतवणुकीतील सातत्य म्हणजे फक्त नियमित गुंतवणूक करणं हेच समजलं जातं. पण गुंतवणूक कशात केली आहे, ती अपेक्षेनुसार काम करतेय का, तिच्याकडून किती कालावधीत किती परतावे अपेक्षित आहेत, आपली गुंतवणूक जोखीम क्षमतेनुसार आहे का, तिच्यातून बाहेर कधी पडायला पाहिजे, कधी खाली आलेल्या शेअर बाजाराचा गुंतवणूक करण्यासाठी फायदा करून घ्यावा – या सर्व महत्त्वाच्या बाबतीत गुंतवणूकदार कधी कधी जागरूक नसतात आणि अनेकदा वेळ नसल्याचं कारण पुढे करतात. तेव्हा आजच्या लेखातून आपण गुंतवणुकीतील सातत्याच्या इतर बाजू जाणून घेऊया!

काय करायला हवं?

१. गुंतवणुकीसाठी पैसे नित्यनेमाने बाजूला काढणं हे सर्वात पहिलं काम आहे. परंतु त्याच बरोबर या गोष्टीची सुद्धा खबरदारी घ्यायला हवी की, पुढे या रकमेत सहजासहजी कपात होता काम नये. जिथे नोकरी जाते किंवा पगार कमी होतो तिथे असं नाही ठरवता येत. परंतु वर्षांतील काही महिन्यांमध्ये खर्च जास्त होतो, किंवा कधी कधी आपत्कालीन निधी पुरेसा किंवा अजिबात नसल्याने गुंतवणूक मधेच थांबवावी लागते. तेव्हा मग गुंतवणुकीच्या रकमेत सातत्य ठेवता येत नाही. म्हणून मासिक मिळकत आणि खर्चाचं व्यवस्थित नियोजन करून मग गुंतवणुकीची रक्कम ठरवावी.

२. गुंतवणूक करताना पर्यायांची सांगड घालण सुद्धा एक कौशल्य असतं. अ‍ॅसेट अलोकेशन म्हणजेच कुठल्या पर्यायात किती प्रमाणात पैसा टाकायचा याबद्दल जागरूकपणे निर्णय घ्यायला हवा. नुसता बाजार वर जातोय म्हणून फक्त इक्विटी आणि तो खाली आला की डेट अर्थात रोखे गुंतवणूक फायद्याची कशी होईल? तेव्हा मासिक गुंतवणूकसुद्धा इक्विटी, डेट, सोने, मालमत्ता यामध्ये विभागली गेली पाहिजे.

३. ठरावीक पर्याय निवडून त्यात सातत्याने केलेल्या गुंतवणुकीतून जास्त फायदा होतो. म्हणजेच १००० रुपयाच्या १०  ठिकाणी एसआयपी न करता पाच फंडात २००० रुपयांची मासिक गुंतवणूक हे समीकरण जास्त योग्य आहे.

४. आपण वेगवेगळे गुंतवणूक पर्याय का निवडतो? जोखीम कमी करण्यासाठी. पण एकाच प्रकारचा पोर्टफोलिओ असणारे तीन-चार म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीतून जोखीम कमी होत नाही! म्हणून पोर्टफोलिओ तपासून मग त्यातून कोणता म्युच्युअल फंड योग्य आहे ते बघा आणि गुंतवणूक करा.

५.  गुंतवणुकीचा आढावा हा घ्यायलाच हवा. अपेक्षेनुसार कामगिरी नसल्यास त्यातून पैसे काढून दुसऱ्या पर्यायात घातले तर पुढील नुकसान टाळता येऊ शकते. याचा अर्थ असा नाही की प्रत्येक महिन्यात बघायला हवं, पण तुम्ही गुंतवणूक केलेल्या म्युच्युअल फंडाचा फंड मॅनेजर बदलत असेल तर मात्र जास्त लक्ष ठेवणे गरजेचे आहे. कारण त्यानंतर येणाऱ्या फंड मॅनेजरची पद्धत जर आधीच्या फंड मॅनेजरसारखी नसेल तर फंडाच्या कामगिरीमध्ये फरक पडू शकतो. तसेच एखाद्या कंपनीचा मालक किंवा कार्यकारी मंडळ किंवा मुख्याधिकारी बदलले तरी कंपनीच्या पुढील कामकाजावर फरक पडू शकतो.

६. आपण निवडलेल्या गुंतवणूक पर्यायांवर आपल्याला विश्वास वाटायला हवा. आणि असं झालं तरच आपल्याला कडेकोट म्हणजेच कमी पर्याय आणि जास्त रक्कम असं करून एक चांगला पोर्टफोलिओ बनवता येईल. कितीही छोटी गुंतवणूक असली तरीसुद्धा नवीन पर्याय स्वीकारायच्या आधी स्वत:ला विचारा की, आपण का हा पर्याय घेतोय, आणि त्याच्या ऐवजी कुठला आधी घेतलेला पर्याय कमी करू शकतो. असे केल्याने गुंतवणुकीचा पसारा कमी होईल.

७. ‘टिप्स’वर भरवसा ठेवून गुंतवणूक करू नका. तुमचं गुंतवणूक उद्दिष्ट, त्यासाठीचा लागणारा कालावधी, तुमची जोखीम क्षमता टीप देणाऱ्याला माहीत नाही, किंवा त्याच्या जोखीम क्षमतेपेक्षा ती वेगळी असेल. तेव्हा जोवर गुंतवणुकीबाबत ठाम विश्वास वाटत नाही तोवर काही करू नका.

८. कमी किमतीचे शेअर्स हे स्वस्त असतात असं अजिबात नाही. ‘फंडामेंटल अ‍ॅनालिसिस’ करून चांगले शेअर निवडा. ‘टेक्निकल अ‍ॅनालिसिस’चा अभ्यास केला तर असे शेअर कधी घ्यायचे हे सुद्धा समजेल. तेव्हा २०/३० पेक्षा जास्त कंपन्या घेऊ नका. कारण पुढे या सर्वाचा योग्य आढावासुद्धा घेता आला पाहिजे.

९. गुंतवणुकीच्या परताव्याबरोबर त्यातील जोखीम आणि पर्यायाने नुकसान होण्याची मर्यादा समजून घ्या. पुढे आढावा घेताना शेअर्सची तुलना मुदत ठेवीबरोबर करू नका.

१०. गुंतवणुकीमध्ये मार्जिन ऑफ सेफ्टी असायला हवी. म्हणजेच स्वस्त असते तेव्हा घेणं आणि महाग झाली की विकणं आणि त्यानंतर पुन्हा स्वस्त झाली की विकत घेणं. हे सर्वच गुंतवणुकीच्या बाबतीत योग्य असतं. म्हणूनच गुंतवणूकदाराला याबाबत सजग राहायला हवं.

११. ‘स्टॉप लॉस’ हा आपल्या फायद्याचा असतो. तेव्हा प्रत्येक गुंतवणूक करण्याआधी आपण किती नुकसान झेलू शकतो आणि त्यापेक्षा अधिक नुकसान होत असल्यास काय करायचं हे ठरवलं आणि त्यानुसार जर वागलो तर आपला पोर्टफोलिओ जास्त सुटसुटीत आणि सशक्त करता येईल.

गुंतवणूक हा वेळ घालवण्यासाठी जोपासलेला छंद नसून तो एक व्यवस्थित उद्योग आहे. तेव्हा या उद्योगाचे नियम शिकून त्यात प्रामाणिकपणे प्रयत्न केले तर यश मिळायची शक्यता वाढते. परंतु तुम्हालाच जर तुमच्या पैशाची काळजी नसेल तर दुसरा कोणी का बरं घेईल? आपण मुलाला शाळेत घालतो आणि विसरतो का? नाही ना? त्याचा अभ्यास घेतो, त्याची कामगिरी तपासतो, गरज असेल तर टय़ुशन लावतो आणि कधी कधी तर शाळासुद्धा बदलतो. मग पैशाच्या बाबतीत आपण इतके बेजबाबदार का राहतो? तेव्हा प्रत्येक गुंतवणुकीचा सारासार संपूर्ण विचार करून मग निर्णय घ्या आणि निश्चिंत आर्थिक आयुष्याचा आनंद घ्या.

tuberculosis marathi news, tuberculosis genetic sequencing marathi news
क्षयरोग उपचारामध्ये जनुकीय क्रमनिर्धारण महत्त्वपूर्ण, औषध प्रतिरोधकातील बदल समजण्यासाठी मदत

china people punished for not paying debt
जीवनावश्यक वस्तू खरेदी करणेही कठीण; कर्ज फेडू न शकणाऱ्यांना चीन कशी शिक्षा करत आहे?

RBI repo rate announcement Shaktikanta Das
आरबीआयकडून रेपो रेट जैसे थे ठेवण्याचे कारण काय? जाणून घ्या

Inheritance of girls and women Two main types of property ownership
मुली आणि महिलांचा वारसाहक्क