स्वयंपाकघरातील विविध मसाले म्हणजे, गृहिणींचा जीव की प्राण. या मसाल्यांचा आधार घेऊनच गृहिणी नवनवीन आणि चटकदार पदार्थ बनवत असतात. ही बाब या ध्येयवादी तरुणाने अचूक हेरली आणि आपले अवघे आयुष्य ‘चवदार’ बनवण्याचा मार्ग हाच असा संकल्प केला; परंतु मसाले हे तर किरकोळ बाजार वस्तू. उत्पादन आणि उत्पन्न दोन्ही मर्यादित. त्यातून कोटय़वधींच्या व्यवसायाचे स्वप्न पाहणे म्हणजे अचाट धाडसच होते; पण त्या तरुणाने हे धाडस केले आणि आपल्या कल्पकतेने या व्यवसायाला पंचतारांकित ओळखही मिळवून दिली. तेव्हाचा तो स्वप्नाळू तरुण आज प्रसिद्ध ‘घरकुल’ मसाल्याचा मालक आहे. अरुण वरणगांवकर यांनी निव्वळ वीस रुपयांच्या गुंतवणुकीतून सुरू केलेला व्यवसाय आज कोटय़वधींच्या घरात पोहोचला आहे.
एक यशस्वी उद्योजक होईन आणि केवळ राज्यातच नाही तर राज्याबाहेरही आपल्या उत्पादनाला मागणी असेल, असा वरणगांवकर यांनी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता. १९८५ साली अमरावतीसारख्या छोटय़ा शहरात घरीच मसाला तयार करून तो केवळ पंचवीस पशांत दारोदारी विकून त्यांनी उद्योग क्षेत्रात आपले पहिले पाऊल टाकले. कठोर मेहनत, चिकाटी आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर त्यांनी आज गृहिणींचा विश्वास जिंकला आहे. घरकुल मसाल्याचे व्यवस्थापकीय संचालक अरुण वरणगांवकर यांची ही यशोगाथा नव्या उद्योजकांसाठी एक आदर्श असा वस्तुपाठ ठरला आहे.
विदर्भाच्या मातीत जन्मलेले अरुण वरणगांवकर सर्वसामान्य कुटुंबातील. अमरावतीमध्ये १९८५ पूर्वी ते औषध विक्री प्रतिनिधी म्हणून काम करायचे. मात्र आपल्यात एक यशस्वी उद्योजक लपलेला आहे हे त्यांना अनेकदा जाणवत होते. त्यामुळे त्यांनी नोकरी सोडून सुरुवातीला घरी पापडाचा व्यवसाय केला. मात्र त्यात हवे तसे यश मिळाले नाही. पहिला प्रयत्न अयशस्वी झाला; पण ते खचले नाहीत. अनेक चढ-उतार येतीलच याची जाणीव ठेवूनच ते या क्षेत्रात आले होते. त्यानंतर पत्नी मृणाल यांच्या मदतीने त्यांनी मसाल्याच्या उद्योगात पाऊल टाकायचे ठरवले. मात्र सर्वात मोठा प्रश्न भांडवलाचा येतो. त्यामुळे आधी घरातच व्यवसाय सुरू करून मग पुढे भांडवल उभारायचे, असे दोघांनीही ठरविले. पूर्वी नोकरीला असल्याने हाताशी फारसा पसा नव्हता. त्यामुळे बाजारातून केवळ वीस रुपयांचा खडा मसाला आणायचा आणि त्यातून घरीच विविध मसाल्यांचे प्रयोग करायचे. काही वेळा मसाल्यात कलमी जास्त झाली तर काही वेळा तेजपत्ता कमी झाले. असे विविध प्रयोग केल्यावर अखेर त्यांना अस्सल घरचा वाटेल, असा स्वाद गवसला. मात्र केवळ आपल्याला आवडून काही साध्य होणार नाही हे त्यांना ठाऊक होते. त्यामुळे मसाल्याची छोटी पाकिटे तयार करून त्यांनी आपल्या नातेवाईकांसह मित्रमंडळींना चाखायला दिली आणि त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. काहींनी सकारात्मक प्रतिसाद दिला, तर काहींनी त्यांना वेगळे काही सुचवले. या सूचनांचा आधार घेत त्यांनी अधिक दमदार उत्पादन कसे तयार होईल याकडे लक्ष दिले. सर्वाच्या सूचना व प्रतिक्रिया ध्यानीमनी ठेवून सर्वसामान्यांना आवडेल असा मसाला तयार करण्यावर भर दिला. अनेक प्रयोगांनंतर अखेर तो प्रसिद्ध मसाला तयार झाला. आता वेळ आली मसाल्याला नाव द्यायची. घरात तयार झालेला आणि घरगुती मसाला असल्याने त्याला अखेर ‘घरकुल’ असे नाव देण्यात आले. बाजारात प्रत्येक दुकानात हा मसाला पोहोचवण्यासाठी वरणगांवकर यांनी अख्ख्या अमरावतीमधील किराणा दुकाने पिंजून काढली. काहींनी प्रतिसाद दिला तर काही ठिकाणी निराशा पदरी आली. मात्र वरणगांवकर यांनी हार मानली नाही आणि बाजारपेठांत आपले उत्पादन घेऊन ते चिकाटीने फिरत राहिले. परिश्रमाची पराकाष्ठा केल्यावर १९९० साली घरकुल मसाला शहरात प्रसिद्ध झाला. केवळ प्रसिद्धच झाला नाही तर प्रत्येक गृहिणींची पहिली पसंतीही ठरला. उत्पन्न बऱ्यापैकी येत असल्याने मार्केटिंगसाठी एक चमूही त्यांनी तयार केला. बाजारात जायचे आणि मसाल्याच्या ऑर्डरची नोंदणी करायची. बघता बघता मोठय़ा प्रमाणात मागणी वाढली आणि घरची जागा कमी पडू लागली. अशात त्यांनी अमरावती औद्योगिक वसाहतीमध्ये जागा घेतली आणि तेथे उद्योग स्थापन केला. मसाल्याच्या मशीन खरेदी केल्या. त्यामुळे काही लोकांना रोजगारही मिळाला. छोटे २० ग्रॅमचे मटण मसाल्याचे पाकीट आता २०० ग्रॅमचे झाले. शिवाय दर्जा कायम ठेवण्यासाठी उच्च दर्जाच्या पॅकेजिंगचा उपयोग केला.
प्रथम पिढीचे उद्योजक वरणगांवकर यांनी बाजारात ठसा उमटवला. त्यासरशी १९९५ साली त्यांनी हळद, लाल मिरची पावडर आणि धणे पावडर ही उत्पादनेही सुरू केली. अधिक क्षमतेच्या नव्या मशीन्स आणल्या. व्यवसायाने वेग धरला असतानाच १९९६ च्या दरम्यान अचानक कारखान्याला आग लागली आणि सर्व काही जळून खाक झाले. क्षणातच होत्याचे नव्हते झाले. त्यामुळे वरणगांवकर यांच्यावर संकट कोसळले. मात्र ते खचले नाहीत. त्यांनी स्वत:सोबतच कर्मचाऱ्यांना धीर दिला. नातेवाईक आणि मित्रमंडळींची मदत त्यांना लाभली आणि पुन्हा उद्योग उभा राहिला. व्याप वाढतच गेला. २००७ मध्ये त्यांनी देशस्तरावर व्याप वाढविला. मात्र त्याच वर्षी, घरकुल मसाल्याचे बनावट उत्पादन घेतले जात असल्याचे वरणगांवकर यांच्या लक्षात आले. वरणगांवकर व्यथित झाले; पण खचले नाहीत. आयएसओ २००० प्रमाणन असल्याने कायद्याची लढाई ते जिंकले.
वरणगांवकर यांचे चिरंजीव तुषार यांनीही २००७ साली एमबीएची पदवी मिळविल्यानंतर उद्योगाला हातभार लावण्यास सुरुवात केली. मात्र नव्या दमाच्या तुषार यांना सर्व काही सहज मिळाले नाही. आधी स्वत:ला सिद्ध करून दाखव, नंतरच संचालक हो, असा सल्ला वडिलांनी दिला. उद्योगविस्ताराच्या दृष्टीने तुषार यांनी अभ्यास सुरू केला. दर्जेदार बियाणांबाबत थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांनी सर्व इतिहास जाणून घेतला. अनेक तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतले. बाजारपेठेत अन्य उत्पादने कोणती आहेत, त्यांचा दर्जा कसा आहे, शेतकऱ्यांना नेमकी कशाची गरज आहे, हे जाणून घेतले. लोकांचा विश्वास संपादन करताना बाजारात जी उत्पादने पाठवू ती अधिक दर्जेदार असली पाहिजेत. त्याच्या वापरातून शेतकऱ्यांनाही लाभ झाला पाहिजे, हे लक्षात घेऊन उद्योगाला नवी उभारी देण्याचा संकल्प तुषार यांनी केला. २०१० मध्ये त्यांनी घरकुलच्या लाल मिरची तिखटला एक नवी कलाटणी दिली. उच्चशिक्षित असलेले तुषार यांनी सर्वप्रथम व्यवसायात असलेली दलालांची दादागिरी संपुष्टात आणली. २०१२ मध्ये शेतकऱ्यांचा माल थेट कारखान्यात आणला. आज जिल्ह्य़ातील जवळपास ७० शेतकरी हे केवळ घरकुलच्या मसाल्यासाठीच उत्पादन घेत आहेत. हळद, मिरची, मोहरी, जिरे आदींचा अभ्यास करून त्यांनी शेतकऱ्यांना दर्जेदार पिकासाठी भरपूर मदत केली. त्यांना शेतातच यंत्रसामग्रीचा पुरवठा केला. त्यामुळे इतर राज्यांतून येणारे उत्पादन आता जिल्’ात मिळू लागले. २०१५ मध्ये तुषार यांच्या प्रयत्नाने कसुरी मेथी हे नवे उत्पादन बाजारात आले. एरव्ही कसुरी मेथी वाळल्यावर तुटते, त्याचा चुरा होतो. मात्र तुषारने अख्खी कसुरी मेथी आणि त्याचा दर्जेदार स्वाद लक्षात घेत प्लास्टिकच्या भरणीत त्याची विक्री सुरू केली आणि त्यालाही मोठे यश लाभले. त्यासोबत सांबार मसाला, मिक्स गरम मसाला अशी अनेक उत्पादने सुरू केली.
आज घरकुलची तब्बल सात उत्पादने बाजारात आहेत. २०१८ मध्ये पॅन इंडिया विस्ताराचे लक्ष्यदेखील गाठण्यात आले. आज भारतात सर्वदूर घरकुलची उत्पादने जात आहेत. दिवसेंदिवस मागणीत वाढ होत असून वार्षिक उलाढाल ही कोटय़वधींच्या घरात गेली आहे. पन्नास हजार एकरात दोन्ही युनिटमधून हजारो टन मसाले व इतर उत्पादने नियमित तयार होत आहेत.
– आविष्कार देशमुख
टाळेबंदीत कामगारांना ज्यादा पगार
टाळेबंदीच्या काळात आम्ही कर्मचाऱ्यांना नियमित वेतन तर दिलेच. शिवाय जे कर्मचारी निर्जंतुकीकरणासाठी दोन्ही युनिटमध्ये नियमित येत अशा ३० जणांना विशेष वेतन दिले, येण्या-जाण्याची सोय केली, असे अरुण वरणगांवकर यांनी सांगितले. दोन्ही युनिट मिळून १७० प्रत्यक्ष कर्मचारी आहेत. याशिवाय अप्रत्यक्ष हजारो लोकांना वरणगांवकर कुटुंबाने रोजगार दिला आहे.
अरुण वरणगांवकर
घरकुल मसाले, अमरावती
* उत्पादन : तयार मसाले
* कार्यान्वयन : १९८५ साली
* मूळ गुंतवणूक : फक्त २० रुपये
* सध्याची उलाढाल : वार्षिक सुमारे २ कोटी रु.
* रोजगारनिर्मिती : १७०
* लेखक ‘लोकसत्ता’चे प्रतिनिधी
avishkar.deshmukh@expressindia.com
आपणासही या सदरासाठी नवउद्योजकाची शिफारस, सूचना ई-मेल: arthmanas@expressindia.com वर कळविता येईल.