|| तृप्ती राणे

गुंतवणूकदारांनी काही प्रश्न स्वत:ला विचारायला हवेत.. शेअर बाजार वर जात असताना आपण खरंच आपल्या क्षमतेपेक्षा जास्त जोखीम तर नाही ना घेतली? आपला पोर्टफोलिओ हा आपल्या जोखीम क्षमतेला साजेसा आहे का? आणि इथे प्रश्न फक्त आर्थिक क्षमतेचा नसून, तो मानसिक क्षमतेचा आहे..!

कोकणात गणपतीचं विसर्जन झाल्यावर नुकतीच मुंबईत परत आले होते. आमच्याकडे गौरी-गणपती असल्यामुळे साधारणपणे १० दिवस आम्ही कोकणात असतो. आणि सुदैव म्हणावे की दुर्दैव, पण आमच्या गावी फोन आणि मोबाइल दोन्ही सहजासहजी लागत नाहीत. एखादा फोन लागलाच तर गणपती पावला असं म्हणतो आम्ही! तर, असे १० दिवस पूर्णपणे मुंबईतील दैनंदिन कारभारापासून लांब राहिल्यानंतर परत आल्या आल्या सर्वात पहिला मला जो फोन आला तो माझ्या एका क्लायंटचा. जरा चिंतित स्वरात ते गृहस्थ म्हणाले, ‘अहो, मॅडम! तुम्ही गावाला गेलात काय आणि इकडे फार मोठा गोंधळ झाला!’

क्षणभर वाटलं की, माझ्या कामात कसली तरी मोठी चूक झाली. मी त्यांना काही विचारायच्या आधीच ते सुरू झाले – ‘‘अहो, शेअर बाजार आला दिवस पडतोय की! गेल्या महिन्यात कुठे जरा वर आला होता. डेट म्युचुअल फंडातसुद्धा नुकसान होतंय. आता तुम्ही सांगा, मी काय करू? काढू का सगळे पैसे? ‘एसआयपी’ पण थांबवू का? परिस्थिती जरा सुधारली की मग तुम्ही सांगाल तिथे गुंतवणूक करू या.’’

दोन मिनिटं शांत राहून मग मी त्यांना विचारलं, ‘‘अहो सर, हे मार्केट असंच असतं. वर-खाली जाणारच. त्यामुळे लगेच गुंतवणूक थांबवायचा निर्णय घेणं चुकीचं आहे. त्यात तुमच्या आर्थिक नियोजनानुसार तुम्हाला पुढच्या पाच वर्षांत पैसे लागणार नाहीत. तर मग ‘एसआयपी’ बंद करायचा विचार का तुमच्या मनात आला? तुमचं आर्थिक नियोजन करताना मी तुमची जोखीम क्षमता तपासली होती. तेव्हा मला पटत नसतानासुद्धा तुम्ही मला अगदी ठासून सांगितलं होतं की, तुम्हाला तीन वर्षांतून एका वर्षी नुकसान चालेल आणि सर्वात जास्त फायदा तर सर्वात जास्त जोखीम असणारी गुंतवणूक चालेल. तुमच्या पोर्टफोलिओची जोखीम तुमच्या क्षमतेपेक्षा जास्त आहे हे वेळोवेळी मी तुम्हाला सांगितलं होतं आणि त्यानुसार बदलसुद्धा सुचवले होते. पण ते तुम्ही केले नाहीत आणि मला सांगत राहिलात की, एवढी वाढ होतेय तर मग पोर्टफोलिओ का बदला? आता तरी कळलं का तुमचं कुठे चुकत होतं?’’

हे सगळं ऐकल्यावर ते थोडा वेळ निरुत्तर झाले. थोडं थांबून मग म्हणाले, ‘‘बरोबर आहे तुमचं. मी गेल्या वर्षीच तुमचं ऐकलं असतं तर नक्कीच आज इतका घाबरलो नसतो. पण आता मला काही सुचत नाहीये.’’

त्यावर मी त्यांना उत्तर दिलं, ‘‘जरा थांबा. मार्केटमध्ये सध्या अनेक कारणांमुळे असं होतंय – वाढती महागाई आणि तेलाचे दर, रुपयाची घसरण, आयएल अ‍ॅण्ड एफएसचा घोटाळा या सगळ्यामुळे एक निराशावादी वातावरण आहे. आणि प्रत्येक ८-१० वर्षांच्या गुंतवणूक काळात कधी ना कधी असे अनुभव आपल्याला येतात. हर्षद मेहता घोटाळा, केतन पारीख घोटाळा, डॉट कॉम बुडबुडा, सत्यम घोटाळा, २००८ सालचं आर्थिक संकट ही सगळी उदाहरणं आपल्याला ठाऊक आहेत. आणि या सगळ्यानंतर बाजार कुठे गेला हेसुद्धा ठाऊक आहे. तेव्हा थोडा संयम ठेवा. आणि या पुढे गुंतवणूक करताना तुमच्या खऱ्या जोखीम क्षमतेनुसार गुंतवणूक पर्याय निवडा. आपण भेटू तेव्हा सविस्तर बोलूच, पण तोवर जमल्यास थोडी काळजी कमी करा.’’

गेल्या एक महिन्यापासून शेअर बाजारात जे चालू आहे त्याने बरेच गुंतवणूकदार साशंक झाले आहेत. २०१६ नंतर ज्या गुंतवणूकदारांनी पहिल्यांदा शेअर बाजारात थेट किंवा म्युच्युअल फंडांमार्फत गुंतवणूक केली ते जरा जास्तच हैराण असतील. तर अशा निराश झालेल्या गुंतवणूकदारांनी हे प्रश्न स्वत:ला विचारायला हवे – शेअर बाजार वर जात असताना आपण खरंच आपल्या क्षमतेपेक्षा जास्त जोखीम तर नाही ना घेतली? आपला पोर्टफोलिओ हा आपल्या जोखीम क्षमतेला साजेसा आहे का? आणि इथे प्रश्न फक्त आर्थिक क्षमतेचा नसून, तो मानसिक क्षमतेचा आहे. किंवा माझ्या मते तर तो प्रामुख्याने मानसिक क्षमतेचाच आहे. तेव्हा कृपया आपली क्षमता नीट तपासा. आणि वेळीच समजून घ्या की तुमची गुंतवणूक नजीकच्या खडतर काळात कशी टिकणार आहे. कदाचित पुढची दोन-तीन र्वष शेअर बाजारासाठी चांगली नसतीलसुद्धा! आणि हे लक्षात ठेवा की, योग्य गुंतवणुकीला योग्य वेळ दिला तरच ती योग्य पद्धतीने वाढून तुम्हाला दीर्घकाळ आनंद देऊ शकते. तेव्हा काळजी करण्यापेक्षा तुमचे आर्थिक नियोजन करा, आणि केलेले असेल तर पुन्हा एकदा तपासा!

trupti_vrane@yahoo.com

(लेखिका सेबी नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार)

सूचना :  

  • जोखीम क्षमता तपासून, सल्लागाराची मदत घेऊन आणि संपूर्ण माहिती मिळवून मग गुंतवणूक करा. तुमच्या फायद्या किंवा तोटय़ाची जबाबदारी ही तुमचीच असेल.
  • या सदरामध्ये गुंतवणुकीसाठी वापरलेले म्युचुअल फंड आणि शेअर्स हे उदाहरण म्हणून आहेत. कोणत्याही म्युचुअल फंडाची किंवा शेअरची शिफारस इथे नाहीये.
  • यातील काही म्युचुअल फंड आणि शेअर्स हे माझ्याकडे असतील किंवा घेतले/विकले जातील. परंतु माझ्या पोर्टफोलिओचा या सदरांमधील पोर्टफोलिओंच्या कामगिरीबरोबर काहीही संबंध नाही.