News Flash

करावे कर-समाधान :  ‘फॉर्म २६ एएस’ ही काय भानगड?

करदात्याने मोठय़ा रकमेचे व्यवहार केले असल्यास याची माहितीसुद्धा ‘फॉर्म २६ एएस’मध्ये दिसते.

प्रवीण देशपांडे pravin3966@rediffmail.com

करदात्याला विवरणपत्र भरण्यापूर्वी ‘फॉर्म २६ एएस’ तपासण्यास सांगण्यात येते. ‘फॉर्म २६ एएस’ हा प्राप्तिकर खात्याच्या संकेतस्थळावर उपलब्ध असतो. या फॉर्ममध्ये प्राप्तिकर खात्याकडे करदात्याच्या व्यवहारांविषयी माहिती दर्शविलेली असते. विविध संस्थांकडून (बँक, पोस्ट ऑफिस, सरकारी खाते, सहनिबंधकांचे कार्यालय, वगैरे) उद्गम कर (टीडीएस), गोळा केलेला कर (टीसीएस), मोठय़ा रकमेचे व्यवहार वेळोवेळी प्राप्तिकर खात्याकडे कळविले जातात. अशा व्यवहारांची माहिती करदात्याच्या ‘पॅन’नुसार प्राप्तिकर खात्याच्या संकेतस्थळावर करदात्याला दिसू शकते. या संकेतस्थळावर ‘पॅन’च्या आधारे लॉग-इन करून ही माहिती करदात्याला तपासता येते किंवा काही ठरावीक बँकांच्या नेट बँकिंगद्वारेसुद्धा ‘फॉर्म २६ एएस’मधील माहिती पाहता येते.

‘फॉर्म २६ एएस’मध्ये  कोणती माहिती असते :

१. पगार, व्याज, लाभांश, भाडे, व्यावसायिक उत्पन्न वगैरे उत्पन्नावर कापलेल्या उद्गम कराची माहिती असते.

२. स्थावर मालमत्तेच्या विक्रीवर खरेदीदाराने कापलेला उद्गम कर (विक्रेता म्हणून)

३. काही व्यवहारांवर गोळा केलेला कर (टीसीएस) – उदाहरणार्थ, १० लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीची गाडी खरेदी, भारताबाहेर सात लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम पाठविल्यास, परदेश सहल, वगैरे.

४. करदात्याने भरलेला कर (उद्गम कराव्यतिरिक्त) जसे अग्रिम कर, स्व:निर्धारण कर,

५. करदात्याला त्या वर्षी कर-परतावा (रिफंड) मिळाला असल्यास त्याची आणि त्यावर मिळणाऱ्या व्याजाची  माहिती (हे व्याज करपात्र आहे आणि हे करपात्र उत्पन्नात दाखवून त्यावर कर भरावा लागतो हे करदात्याने लक्षात ठेवले पाहिजे.)

६. करदात्याने मोठय़ा रकमेचे व्यवहार केले असल्यास याची माहितीसुद्धा ‘फॉर्म २६ एएस’मध्ये दिसते.

७. स्थावर मालमत्तेच्या खरेदीदाराने कापलेला कर (खरेदीदार म्हणून).

करदात्याने ही माहिती वेळोवेळी तपासली पाहिजे आणि त्यामध्ये काही तफावत असेल तर ती वेळेत दुरुस्त करून घेतली पाहिजे. जसे, करदात्याचा उद्गम कर कोणत्या व्यक्तीने कापला असेल आणि तो या फॉर्ममध्ये दिसत नसेल तर त्वरित कर कापणाऱ्या व्यक्तीशी संपर्क साधून ते का दिसत नाही हे समजून दुरुस्त करून घेतले पाहिजे. जोपर्यंत या फॉर्ममध्ये उद्गम कर किंवा भरलेला कर दिसत नाही तोपर्यंत त्याचा दावा करदाता करू शकत नाही. विवरणपत्र भरताना या फॉर्मचा उपयोग करदात्याने करून घेतला पाहिजे.

’ प्रश्न : मी एक व्यावसायिक आहे मला माझ्या क्लायंटने जून २०२० मध्ये पैसे देताना उद्गम कर कापला होता. हा उद्गम कर अद्याप माझ्या ‘फॉर्म २६ एएस’मध्ये दिसत नाही. यासाठी मला काय करावे लागेल?

प्रशांत मोरे

उत्तर : कापलेला उद्गम कर (टीडीएस) ‘फॉर्म २६ एएस’मध्ये दिसत नसेल तर करदात्याने कर कापणाऱ्याकडे संपर्क करून त्यामागील कारण काय आहे हे तपासले पाहिजे. कर कापणाऱ्याने तो कापलेला कर सरकारकडे जमा न केल्यास किंवा त्याने उद्गम कराचे विवरणपत्र न भरल्यास किंवा उद्गम कराच्या विवरणपत्रात आपला ‘पॅन’ चुकीचा दर्शविण्याच्या त्रुटी आढळल्यास तो उद्गम कर ‘फॉर्म २६ एएस’मध्ये दिसणार नाही. या त्रुटी दुरुस्त केल्यानंतर ते आपल्या ‘फॉर्म २६ एएस’मध्ये आपल्याला दिसेल.

प्रश्न : मी नेटबँकिंगद्वारे ऑनलाइन कर भरताना कर निर्धारण वर्ष चुकीचे भरले गेले. बँकेकडे चौकशी केल्यास यात बँक काही करू शकत नाही असे सांगितले. आता हे दुरुस्त करण्यासाठी मी काय करू शकते?

– मुग्धा देसाई

उत्तर : आपल्याला आपल्या प्राप्तिकर अधिकाऱ्याकडे सर्व तपशिलासह पत्र लिहून चलानमधील वर्ष बदलण्यासाठी सात दिवसांत अर्ज करावा लागेल. प्राप्तिकर अधिकारी प्राप्तिकर खात्याच्या चलान प्रणालीमध्ये बदल करू शकतो. आपला अर्ज मिळाल्यानंतर आणि अधिकाऱ्याने योग्य बदल केल्यानंतर आपल्याला ‘फॉर्म २६ एएस’मध्ये आपण भरलेला कर योग्य कर-निर्धारण वर्षांत दिसेल.

प्रश्न : मी माझ्या आणि माझ्या पत्नीच्या संयुक्त नावाने एक सदनिका खरेदी करीत आहे. तिची खरेदी किंमत दीड कोटी रुपये इतकी आहे. जी सदनिका आम्ही विकत आहोत तीसुद्धा दोघांच्या संयुक्त नावावर आहे. या खरेदीवर १ टक्का उद्गम कर कापावयाचा आहे तो कोणी कापावयाचा आणि कोणाकडून कापावयाचा?

एक वाचक

उत्तर : ५० लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीची स्थावर मालमत्ता निवासी भारतीयाकडून खरेदी केल्यास त्यावर १ टक्का उद्गम कर कापण्याची तरतूद आहे. आपण संयुक्त नावावर सदनिका खरेदी करीत असाल तर आपल्याला आपल्या हिश्श्याप्रमाणे उद्गम कर कापावा लागेल. सदनिकेची विक्री करणारेसुद्धा सदनिका संयुक्त नावाने धारण करीत असतील तर त्यांच्या हिश्श्याप्रमाणे उद्गम कर कापावा लागेल. उदाहरणार्थ, खरेदी करणारे ‘अ’ आणि ‘ब’ आहेत, त्यांचा सदनिकेमधील हिस्सा प्रत्येकी ५० टक्के आहे आणि विक्री करणारे ‘क’ आणि ‘ड’ आहेत आणि त्यांचा सदनिकेमधील हिस्सासुद्धा प्रत्येकी ५० टक्के आहे. सदनिकेची किंमत दीड कोटी असेल तर एकूण उद्गम कर १ टक्का म्हणजे दीड लाख रुपये असेल. ‘अ’ला त्याच्या ७५ लाख रुपयांवर (५० टक्के हिश्श्यावर) एक टक्का म्हणजे ७५,००० रुपये इतका उद्गम कर ‘क’कडून ५० टक्के म्हणजे ३७,५०० रुपये आणि ‘ड’कडून ५० टक्के म्हणजे ३७,५०० इतका उद्गम कर कापावा लागेल आणि ‘ब’ला त्याच्या ७५ लाख रुपयांवर (५० टक्के हिश्श्यावर) १ टक्का असा ७५,००० रुपये इतका उद्गम कर ‘क’कडून ५० टक्के म्हणजे ३७,५०० रुपये आणि ‘ड’कडून ५० टक्के म्हणजे ३७,५०० इतका उद्गम कर कापावा लागेल. असा एकूण दीड लाख रुपये उद्गम कर कापावा लागेल. आपल्याला एकूण चार चलनाद्वारे उद्गम कर भरावा लागेल. आपण पैसे वेगवेगळ्या वेळेला दिल्यास प्रत्येक वेळेला चार चलनाद्वारे पैसे भरावे लागतील.

* लेखक सनदी लेखाकार आणि कर सल्लागार आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 10, 2021 12:10 am

Web Title: importance of form 26as in itr filing process zws 70
Next Stories
1 गोष्ट रिझव्‍‌र्ह बँकेची : पायाभरणी आजच्या ‘बँकिंग रेग्युलेशन अ‍ॅक्ट’ची!
2 माझा पोर्टफोलियो : नागरीकरणासाठी आत्मनिर्भर सज्जता
3 विमा..सहज, सुलभ : ‘क्रिटिकल इलनेस’ आणि इतर रायडर्स
Just Now!
X