आशीष ठाकूर
सरलेल्या सप्ताहात निर्देशांकांनी आपले वरचे आणि खालचे लक्ष्य हे एकाच दिवशी -गुरुवारी अचूकपणे साध्य करण्याची किमया केली. कसे ते पाहा..गेल्या लेखात सूचित केलेले निर्देशांकाचे प्रथम वरचे लक्ष्य सेन्सेक्सवर ४१,०७० आणि निफ्टीवर १२,०५० आणि खालचे लक्ष्य हे अनुक्रमे ३९,६०० आणि ११,७०० असे होते. निर्देशांकांनी गुरुवारी सेन्सेक्सवर ४१,०४८ आणि निफ्टीवर १२,०२५ चा उच्चांक नोंदवून वरचे लक्ष्य साध्य केले. मात्र त्याच दिवशी बाजारात अखेरच्या दोन तासांत घसरण सुरू झाली आणि सेन्सेक्सने ३९,६६७ आणि निफ्टीने ११,६६१ अशी खालची लक्ष्ये गाठून, निर्देशांकांनी एकाच दिवसात तेजी व मंदी असा दोन्हींचा अचूक लक्ष्यवेध केला. आता चालू आठवडय़ाचा वेध घेऊ या.
शुक्रवारचा बंद भाव :
सेन्सेक्स : ३९,९८२.९८
निफ्टी : ११,७६२.४५
निर्देशांकांनी, सेन्सेक्सवर ३९,६६७ आणि निफ्टीवर ११,६६१ अंशाचा आधार घेत उसळी मारल्याने आता आपण तेजीच्या अंतिम पर्वात प्रवेश करत आहोत. येणाऱ्या दिवसात अत्यल्प मुदतीच्या गुंतवणूक धारणा असलेल्या गुंतवणूकदारांनी (गुंतवणूक धारणा तीन महिन्यांहून कमी)अतिशय सावध होण्याची गरज आहे. येणाऱ्या दिवसात तेजीची वाटचाल ही निर्देशांकावर तीन टप्प्यांमध्ये असेल.
* पहिला टप्पा सेन्सेक्स ४१,१०० आणि निफ्टी १२,०५०
* दुसरा टप्पा सेन्सेक्स ४१,७०० आणि निफ्टी १२,२५०
* तिसरा टप्पा सेन्सेक्स ४३,००० आणि निफ्टी १२,६००
यात पहिला टप्पा ओलांडण्यास निर्देशांक यशस्वी ठरल्यास बाजारात ‘तेजीच्या उधाण वाऱ्यास’(युफोरियास) सुरुवात होऊन निर्देशांकाचा दुसरा टप्पा दृष्टिपथात येईल. या स्तरावर तर्कसंगत विचारसरणीला तिलांजली देऊन भन्नाट त्रराशिक जन्माला येतील ती म्हणजे.. अर्थव्यवस्था मरगळलेल्या स्थितीत असताना निर्देशांक उच्चांकावर, तर अर्थव्यवस्थेत जरा सुधारणा झाल्यास निर्देशांकाचा नवीन उच्चांक किती? या व अशा आशयाच्या बातम्या दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात यायला सुरुवात झाल्यावर गुंतवणूकदारांनी सावध होऊन समभागांची नफारूपी विक्री करणे श्रेयस्कर.
समभाग विश्लेषण
वाचकांनी विचारणा केलेल्या समभागांच्या निकालपूर्व तिमाही विश्लेषणाकडे वळूया.
एचडीएफसी एएमसी लि.
* तिमाही वित्तीय निकाल – गुरुवार, २२ ऑक्टोबर
* १६ ऑक्टोबरचा बंद भाव – २,२८४.०५ रु
* निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – २,२५० रु.
अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून २,२५० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य २,४५०, द्वितीय लक्ष्य २,६५०.
ब) निराशादायक निकाल : २,२५० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत २,०५० रुपयांपर्यंत घसरण.
(समभागासंदर्भात विचारणा – ध्यानेश कोळेकर, विजय सोनार यांच्याकडून)
येस बँक लिमिटेड
* तिमाही वित्तीय निकाल – शुक्रवार, २३ ऑक्टोबर
* १६ ऑक्टोबरचा बंद भाव – १२.६८ रु.
* निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – १२.५० रु.
अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून १२.५० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य १५, द्वितीय लक्ष्य १७.
ब) निराशादायक निकाल : १२.५० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ११ रुपयांपर्यंत घसरण.
सर्वाधिक विचारणा ही येस बँकेसंदर्भात असल्याने त्यावर विशेष प्रकाशझोत – या व पुढील सर्व तिमाही निकालानंतर येस बँक हा १७ रुपयांवर सतत महिनाभर टिकणे नितांत गरजेचे आहे. तरच २५ ते ३० रुपये हे त्याचे वरचे लक्ष्य असेल. ३० रुपयांवरच येस बँकेचे नष्टचर्य संपेल.
(समभागासंदर्भातील विचारणा – जयंत सावंत, गजानन भंपलवार, सोनार यांच्याकडून)
टाटा मोटर्स लिमिटेड
* तिमाही वित्तीय निकाल – मंगळवार, २७ ऑक्टोबर
* १६ ऑक्टोबरचा बंद भाव- १२७.७० रु.
* निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – १२५ रु.
अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून १२५ रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य १३५, द्वितीय लक्ष्य १५०.
ब) निराशादायक निकाल : १२५ रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत, ११० रुपयांपर्यंत घसरण.
या व पुढील सर्व तिमाही निकालानंतर टाटा मोटर्स १५० रुपयांवर सतत महिनाभर टिकणे नितांत गरजेचे आहे, तरच समभागात शाश्वत, टिकणारी तेजी शक्य आहे.)
(टाटा मोटर्ससंदर्भातील विचारणा- सचिन मुळे, विशाल लोंढे, राजेंद्रनाथ गडकरी यांच्याकडून)
ashishthakur1966 @gmail.com
लेखक भांडवली बाजार विश्लेषक