प्रवीण देशपांडे

आता शेअर्सचे व्यवहार करणे खूप सोपे झाले आहे. शेअर्स आता ऑनलाइन पद्धतीने सहजरीत्या खरेदी केले किंवा विकले जातात. नवीन पिढीला शेअर्स आणि म्युचुअल फंडामधील गुंतवणूक सोयीस्कर वाटू लागली आहे. जे सेवानिवृत्त आहेत तेसुद्धा वेळ जावा आणि शिवाय पैसेसुद्धा कमवावेत म्हणून शेअर्समध्ये ट्रेडिंग करतात. हे ट्रेडिंग करणे जरी सोपे असले तरी प्राप्तिकर कायद्याच्या तरतुदी थोडय़ा क्लिष्ट आहेत.

शेअर ट्रेडिंगचे व्यवहार हे प्रामुख्याने दोन प्रकारांत विभागले जातात :

१. ज्या शेअर्सची डिलिव्हरी घेतली जाते : शेअर्समध्ये ट्रेडिंग हा व्यवहार ‘गुंतवणुकीतून मिळणारे उत्पन्न म्हणजेच भांडवली नफा’ किंवा ‘धंदा-व्यवसायातील उत्पन्न’ यात दाखवायचा हा संभ्रम करदात्यांच्या मनात नेहमी येतो. या दोन्ही प्रकारच्या उत्पन्नावर कर आकारणी भिन्न आहे. ज्या शेअर्सची खरेदी नफा मिळविण्याच्या उद्देशाने केली आहे असे व्यवहार धंदा-व्यवसायाचे उत्पन्न म्हणून समजले जातात आणि ज्या शेअर्सची खरेदी लाभांश मिळविण्याच्या आणि भांडवली वृद्धी या उद्देशाने केली आहे असे व्यवहार ‘भांडवली नफा’ या उत्पन्नाच्या स्रोतात गणले जातात. करदात्याला आपले उत्पन्न कोणत्या स्रोतात करपात्र आहे हे जाणून घेतले पाहिजे. ‘भांडवली नफ्याच्या’ अंतर्गत करपात्र उत्पन्नासाठीच्या तरतुदी क्लिष्ट नाहीत आणि त्यावर भरावा लागणारा करसुद्धा सवलतीच्या दरात आहे. जर करदाता धंदा-व्यवसाय म्हणून हे व्यवहार करत असेल तर ‘धंदा-व्यवसायाच्या’ उत्पन्नासाठी असणाऱ्या प्राप्तिकर कायद्यातील सर्व तरतुदी अशा व्यवहारासाठी लागू होतात याची जाणीव बऱ्याच करदात्यांना नसते.

२. ज्या शेअर्सची डिलिव्हरी घेतली जात नाही : यात इंट्राडे आणि फ्युचर आणि ऑप्शन्स (एफ अ‍ॅण्ड ओ) या व्यवहारांचा समावेश आहे. या व्यवहारांपासून मिळणारे उत्पन्न ‘धंदा-व्यवसायाचे’ उत्पन्न म्हणूनच गणले जाते. याचे कारण म्हणजे हे व्यवहार फक्त नफा मिळविण्याच्या उद्देशाने केले जातात. यामुळे ‘धंदा-व्यवसायाच्या’ उत्पन्नासाठी असणाऱ्या प्राप्तिकर कायद्याच्या सर्व तरतुदी अशा व्यवहारासाठीसुद्धा लागू होतात.

अ.  इंट्राडे व्यवहार : इंट्राडे व्यवहारात ज्या दिवशी शेअर्स खरेदी केले त्याच दिवशी शेअर्स विकले जातात आणि त्याची डिलिव्हरी घेतली जात नाही. त्यामुळे हे सट्टा उत्पन्न (स्पेक्युलेटिव्ह) म्हणून करपात्र असते. विवरणपत्रात हे उत्पन्न सट्टा उत्पन्न या शीर्षकाखाली दाखवावे लागते. हे सट्टा उत्पन्न नकारात्मक असेल म्हणजेच तोटा असेल तर हा तोटा इतर धंदा-व्यवसायाच्या उत्पन्नातून वजा करता येत नाही. असा वजा न झालेला तोटा पुढील चार वर्षांसाठी कॅरी फॉरवर्ड करता येतो आणि तो फक्त सट्टा उत्पन्नातूनच वजा करता येतो. यासाठी विवरणपत्र मुदतीत दाखल केले असले पाहिजे आणि हा तोटा विवरणपत्रात दाखविला असला पाहिजे.

ब.  फ्युचर आणि ऑप्शन्स (एफ अ‍ॅण्ड ओ) : या व्यवहारामध्येसुद्धा शेअर्सची डिलिव्हरी घेतली किंवा दिली जात नसली तरी हे व्यवहार सट्टा उत्पन्न या शीर्षकाखाली गणले जात नाहीत, या व्यवहारातून मिळालेले उत्पन्न सामान्य धंदा-व्यवसायाचे उत्पन्न म्हणूनच गणले जाते. हे उत्पन्न नकारात्मक असेल म्हणजेच तोटा असेल तर हा तोटा इतर धंदा-व्यवसायाच्या उत्पन्नातून किंवा सट्टा उत्पन्नातूनसुद्धा वजा करता येतो. हा तोटा पुढील आठ वर्षांसाठी कॅरी फॉरवर्ड करता येतो आणि तो धंदा व्यवसायातील उत्पन्नातूनच वजा करता येतो. यासाठी विवरणपत्र मुदतीत दाखल केले असले पाहिजे आणि हा तोटा विवरणपत्रात दाखविला असला पाहिजे.

लेखापरीक्षणाच्या तरतुदी :

करदात्याच्या शेअर्सच्या व्यवहाराची उलाढाल आणि नफा, यावर लेखापरीक्षणाच्या तरतुदी अवलंबून आहेत. ज्या करदात्याची उलाढाल दोन कोटी रुपयांपेक्षा जास्त असेल तर त्यांना सनदी लेखापालाकडून (सीए) लेखापरीक्षण करून घेणे आणि त्याचा अहवाल सादर करणे बंधनकारक आहे आणि ज्या करदात्यांच्या व्यवहारांची उलाढाल दोन कोटी रुपयांपेक्षा कमी आहे आणि त्यांनी, नफा हा उलाढालीच्या सहा टक्क्य़ांपेक्षा कमी दाखविल्यास त्या करदात्यांनासुद्धा लेखापरीक्षण करून घेणे बंधनकारक आहे. कारण शेअर्सच्या व्यवहारासाठीसुद्धा ‘कलम ४४ एडी’नुसार अनुमनित कराच्या तरतुदी लागू होतात. शेअर्सची उलाढाल कशी गणावी याची पद्धती वरील व्यवहारांसाठी भिन्न आहेत, त्या खालीलप्रमाणे :

ज्या शेअर्सची डिलिव्हरी घेतली आहे : उलाढाल = शेअर्सची एकूण विक्री किंमत. (उदाहरणादाखल तक्ता १ पाहावा)

करदात्याने हे लक्षात ठेवले पाहिजे की या तरतुदी, शेअर्सचे व्यवहार ‘धंदा-व्यवसायाचे उत्पन्न’ या स्रोताखाली दाखविले तरच लागू होतात. हे व्यवहार ‘गुंतवणूकदार’ म्हणून ‘भांडवली नफा’ या स्रोताखाली दाखविले असतील तर या तरतुदी लागू होत नाहीत.

ज्या शेअर्सची डिलिव्हरी घेतली नाही :

इंट्राडे : उलाढाल = खरेदी आणि विक्रीतील फरक. (उदाहरणादाखल तक्ता २ पाहावा)

करदात्याने हे उत्पन्न मिळविण्यासाठी जो खर्च केला आहे त्या खर्चाची (पोस्टेज, फोन, प्रवास खर्च वगैरे)  वजावटसुद्धा घेता येईल.

एखादा करदाता दोन्ही प्रकारचे व्यवहार करू शकतो. इंट्राडे किंवा फ्यूचर आणि ऑप्शन्स (एफ अ‍ॅण्ड ओ) मधून मिळणारा नफा धंदा-व्यवसायाचे उत्पन्न असते आणि दीर्घ मुदतीच्या गुंतवणूकीतून मिळणारा नफा हा ‘भांडवली नफा’ या स्रोताखाली करपात्र दाखवू शकतो.

ल्ल लेखक सनदी लेखाकार आणि कर सल्लागार आहेत. त्यांच्याशी pravin3966@ rediffmail.com या ई-मेलवर संपर्क साधून करविषयक प्रश्न विचारता येतील.