आशीष ठाकूर

येणाऱ्या दिवसात निर्देशांकाचा भरभक्कम आधार हा सेन्सेक्सवर ३६,६५० आणि निफ्टीवर १०,८०० असा असेल, असे गेल्या सप्ताहातील लेखात सुचविले गेले होते. याची अचूक प्रचीती सरलेल्या गुरुवारी निर्देशांकांच्या साप्ताहिक बंदने दिली. या स्तराचा आधार घेत निर्देशांकाचे वरच लक्ष्य हे सेन्सेक्सवर ३८,६७० आणि निफ्टीवर ११,४१० असेल. (‘फेबुनासी फॅक्टर’चे .६१८ टक्के). या पार्श्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळू या.

गुरुवारचा बंद भाव :

सेन्सेक्स : ३८,६९७.०५

निफ्टी : ११,४१६.९५

विविध कारणांनी ऑक्टोबर महिना व नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा सर्व बाजारपेठांच्या दृष्टीने महत्त्वाचा वळणबिंदू ठरणार आहे. यातील प्रमुख घटना ही अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक, निवडणूकपूर्व ज्वर आणि प्रत्यक्ष निकाल, त्यापुढे सर्वात महत्त्वाचे करोना काळातील भारतीय कंपन्यांच्या आर्थिक कामगिरीचे अर्धवार्षिक निकालांकडे पाहावे लागेल. यातून बाजारात कोणती घुसळण, कितपत उलथापालथ होऊ शकते त्याचा आज आपण आढावा घेऊया.

अमेरिकेतील मतदानपूर्व चाचण्या व प्रत्यक्ष निकाल हा डोनाल्ड ट्रम्पयांच्या बाजूने लागल्यास आणि कंपन्यांच्या आर्थिक कामगिरीचे अर्धवार्षिक निकाल ठीकठाक लागल्यास सेन्सेक्सवर ४१,०५० ते ४१,८५० आणि निफ्टीवर १२,०५० ते १२,३०० अशा नवीन उच्चांकांकडे निर्देशांक झेपावतील. ही नाण्याची एक बाजू झाली.

आता नाण्याच्या दुसऱ्या बाजूचा विचार करता, सर्व आघाडय़ांवर पदरी दारुण निराशाच आली, तर ती धोक्याची पूर्वसूचना मानली जावी. सेन्सेक्स ३९,३५० आणि निफ्टी ११,६०० च्या वर टिकण्यास सातत्याने अपयशी ठरल्यास, सावध होण्याची गरज आहे. हा स्तर ओलांडण्यास निर्देशांक वारंवार अपयशी ठरल्यास निर्देशांकाचे प्रथम खालचे लक्ष्य हे सेन्सेक्सवर ३६,३०० आणि निफ्टीवर १०,७०० आणि त्यानंतरचे घसरणीचे लक्ष्य हे सेन्सेक्सवर ३५,१५० आणि निफ्टीवर १०,३०० असे असेल.

‘महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर’ संकल्पनेला वाचकांकडून भरीव प्रतिसाद मिळत आहे, तेव्हा आता वाचकांनी विचारणा केलेल्या समभागांच्या विश्लेषणाकडे वळूया.

१) टीसीएस लिमिटेड

* तिमाही वित्तीय निकाल – बुधवार, ७ ऑक्टोबर

* १ ऑक्टोबरचा बंद भाव- २,५२२.७५ रु.

* निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – २,४५० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून २,४५० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य २,५५०, द्वितीय लक्ष्य २,६५०.

ब) निराशादायक निकाल : २,४५० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत २,३०० रुपयांपर्यंत घसरण.

(टीसीएस संदर्भात विचारणा – कमलाकर विसपुते, सुरेश चिंचपुरे यांच्याकडून.)

२) इन्फोसिस लिमिटेड

* तिमाही वित्तीय निकाल – बुधवार, १४ ऑक्टोबर

* १ ऑक्टोबरचा बंद भाव – १,०१७.७० रु.

* निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – ९५० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ९५० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य १,०३०, द्वितीय लक्ष्य १,१३०.

ब) निराशादायक निकाल : ९५० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ८५० रुपयांपर्यंत घसरण.

(इन्फोसिस संदर्भातील विचारणा – गिरीश निपुणगे, प्रशांत जगदाळे यांच्याकडून)

३) बजाज फायनान्स लि.

* तिमाही वित्तीय निकाल – बुधवार, २१ ऑक्टोबर

* १ ऑक्टोबरचा बंद भाव – ३,४४४.०५ रु.

* निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – ३,४०० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ३,४०० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ३,६००, द्वितीय लक्ष्य ३,७५०.

ब) निराशादायक निकाल : ३,४०० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ३,००० रुपयांपर्यंत घसरण.

(या संदर्भातील मेल साहिल जाधव यांच्याकडून)

४) टेक महिंद्र लिमिटेड

* तिमाही वित्तीय निकाल – शुक्रवार, २३ ऑक्टोबर

* १ ऑक्टोबरचा बंद भाव- ८२२.६५ रु.

* निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – ७७० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ७७० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ८५०, द्वितीय लक्ष्य ९१०.

ब) निराशादायक निकाल : ७७० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ६५० रुपयांपर्यंत घसरण

(टेक महिन्द्र संदर्भातील मेल भालचंद्र गोगटे, गणेश दांडगे यांच्याकडून)

लेखक वित्तीय नियोजनकार व अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहेत.

ashishthakur1966@gmail.com