२९ वर्षांच्या प्रकाशच्या घरात गेल्याच महीन्यात एक छानसे बाळ जन्माला आले. सर्वत्र आनंदी आनंद झाला. काही दिवसांतच आनंदाची जागा एका सुखद काळजीने घेतली. प्रकाशने बाळाच्या भवितव्याचे नियोजन करायला सुरुवात केली आणि विक्रेत्यांच्या अतिशयोक्तीपूर्ण आश्वासनांना भुलून त्याने युलिप (Unit Linked Insurance Plan) या पॉलिसीची खरेदी केली. गेल्या महिन्यात आयकर वाचवण्यासाठी करायच्या गुंतवणुकीच्या बाबतीत शेवटच्या क्षणापर्यंत चालढकल करणा-या गुंतवणुकदारांपकीही अनेक जणांनी युलिपचा पर्याय निवडला असेल. यांपकी कोणीही त्या पर्यायामध्ये वेगवेगळया प्रकारचे किती खर्च लागू पडतात हयाची दखल घेण्याची तसदी घेतलेली नसेलच.
सप्टेंबर २०१० पूर्वी युलिप हा एक महाभयंकर भस्मासूर होता. (आता त्याची तीव्रता थोडी कमी झाली आहे.) विक्रेत्यांचे कमिशनच २०% ते ३०% होते आणि इतर चार्जेस वेगळे. त्यामुळे विक्रेत्यांनी निरागस गुंतवणुकदारांना मनमानी परताव्यांचे अमिष दाखवून त्यांची विक्री केली. २००८ च्या जानेवारी महिन्यात एका डेव्हलपमेंट ऑफिसरचा फोन आला होता, ‘गेल्या वर्षांत एन.ए.व्ही. १५% वाढला’. त्याला एका गोष्टीची जाणीव करुन दिली तेव्हा त्याने युलिपचे कौतुक थांबवले. त्या काळात सेन्सेक्स ६०%  वाढला होता. या मिस्-सेलिंगनंतर जे काही वादळ उठले त्याचा परिणाम असा झाला की आय.आर.डी.ए.ला (Regulatory & Development Authority) युलिपमधील वेगवेगळया खर्चावर बंधन घालावे लागले.
सप्टेंबर २०१० नंतर विक्रेत्यांना मिळणारे २०% ते ३०% कमिशन ८ % ते १०% पर्यंत खाली आणले गेले असले तरी आज ही युलिप हा पर्याय अतिशय महागडा आहे, हे विमा इच्छुकांच्या लक्षातच येत नाही. युलिपची खरेदी ही मुख्यत तीन गोष्टी साध्य करण्यासाठी केली जाते. उच्च प्रतीचा परतावा हे प्रमुख उद्दीष्ट. त्यानंतरचे प्राधान्य दिले जाते ते ‘आयकरा मधील सवलत’ या गोष्टीला. आणि या दोन महत्त्वाच्या गोष्टी साध्य करताना त्याचबरोबर विमाछत्रही मिळते हा एक साईड बेनिफिट. अनेक तज्ञांच्या मते युलिप हा पर्याय हया तिनही आघाडय़ांवर मार खातो. या उपरही युलिपमध्ये गुंतवणूक करायचीच इच्छा असेल, तर विक्रेत्यांच्या परताव्या संबंधीत भूलथापांना बळी न जाता वेगवेगळया प्रकारच्या खर्चाचा आढावा घ्यावा.
मॉरटॅलिटी चार्ज : युलिपमध्ये जीवन विमा समाविष्ट असतो. त्यामुळे विमाछत्रासाठीची रक्कम प्रिमियममधून कापली जाते. ही रक्कम गुंतवणूकदाराचे वय आणि विमाछत्राची रक्कम किंवा ‘सम अॅट रिस्क’ यावर अवलंबून असते आणि ती मासिक तत्वावर आकारली जाते.
पॉलिसी अॅडमिनिस्ट्रेशन चार्ज : पॉलिसीधारकाच्या विमाछत्राचे रेकॉर्ड तयार करण्यासाठी आणि ते मेन्टेन करण्यासाठी लागणारा खर्च. हा खर्चही मासिक तत्वावर आकारला जातो.
प्रिमियम अॅलॉकेशन चार्ज : विमा कंपनीला पॉलिसी तयार करण्यासाठी सुरवातीला जो खर्च येतो (उदा. अंडररायटींग, विक्रीचा खर्च, वैद्यकीय तपासणी वगरे) तो सुरवातीलाच युलिप धारकाच्या प्रिमियम मधून कापला जातो आणि तोही एकदाच.
फंड मॅनेजमेंट चार्ज : प्रिमियमच्या रकमेमधून हा इतर खर्च वजा जाता जी रक्कम बाकी राहते ती युलिपधारकाने ज्या पर्यायामध्ये गुंतवण्याची इच्छा व्यक्त केली आहे त्यामध्ये – म्हणजे शेअर्स, बॉन्ड, जी-सेक, मनी मार्केट वगरेंपकी पर्यायांमध्ये गुंतविली जाते. हे सर्व सांभाळण्यासाठी तज्ञांची गरज असते. त्यासाठीचा खर्च म्हणजे फंड मॅनेजमेंट चार्ज. ही रक्कम गुंतवणुकीच्या पर्यायांनुसार बदलते. शेअर्समधील गुंतवणुकीसाठी सर्वात जास्त रक्कम कापली जाते.
हे सर्व खर्च काळानुसार कमी होत जातात. परंतु गरज पडली तर त्यामध्ये बदल करायचा विमा कंपनीला अधिकार असतो.
युलिपची टर्म संपण्याअगोदर युलिपधारकाला पालिसी सरेंडर करायची असेल तर त्यावेळी त्याच्या खात्यामधील रकमेमधून सरेंडर चार्जेस कापले जाऊन उर्वरित रक्कम त्याला देण्यात येते. सर्वसाधारपणे पहिल्या वर्षांला १५% कापले जातात आणि नंतर ती रक्कम कमी होत जाते.
या सर्व खर्चाची कल्पना येण्यासाठी आणि त्याचा परिणाम जाणून घेण्यासाठी एक उदाहरण पाहूया –
वार्षकि प्रिमियमची रक्कम : ५०,०००/- रु.
इच्छित पर्याय : इक्विटी फंड
एन.ए.व्ही. : १ रु. प्रति युनिट
कपात झ्र्
१) फंड अॅलोकेशन चार्ज : १०%
गुंतवणुकीची रक्कम : ४५,००० रु. (५०,०००-५,०००)
२)एन.ए.व्ही. : १० रु.
जमा युनिट ४,५०० (४५,०००/१०)
३) इतर चार्जेस
अ) पॉलिसी अॅड. चार्ज : १,००० रु. = १०० युनिट
ब) मॉरटॅलिटी चार्ज : २०० रु. = २० युनिट
क) फंड मॅनेजमेंट चार्ज ४५,००० चे  १% = ४५० रु.  = ४५ युनिट
एकुण युनिट = १६५
४) गुंतवणुकदाराच्या खात्यामधील युनिट ४,३३५ (४,५००-१६५)
जर भांडवली बाजार २० टक्के उंचावला तर एनएव्ही १०टक्क्यांनी वाढेल, हे गृहित धरून ५२,०२० रु. (४,३३५ गुणीले १२) गुंतवणुकदाराच्या ५०,००० रु.च्या गुंतवणुकीवरील फायदा २,०२० रु. (परतावा ४.०४%)
तसेच शेअर बाजार १० टक्क्यांनी वाढला व एनएव्ही ८ ते ९ वाढली तर ३९,०१५ रु. (४,३३५ गुणीले ९). म्हणजेच  गुंतवणुकदाराच्या ५०,००० रु.च्या गुंतवणुकीवरील तोटा १०,९८५ रु. (५०,००० – ३९,०१५) म्हणजे २१.९७%.
वरील दोन्ही परिस्थितींमध्ये (४.०४% नफा किंवा २१.९७%तोटा) पुढील वर्षांसाठीचे वार्षकि खर्चही कापले जाणार आहेत. म्हणजे गुंतवणुकदारासाठी ४.०४% नफयात घट किंवा २१.९० % तोटयात वाढ. याला म्हणतात दुष्काळात तेरावा.
आता प्रश्न उभा राहातो -‘गुंतवणुकीचे उद्दीष्ट समोर ठेऊन मी हा पर्याय निवडतो आणि त्यामध्ये माझ्या गुंतवणुकीच्या रकमेचे अनेक प्रकारच्या खर्चाच्या नावाखाली लचके तोडुन उर्वरीत रक्कम ज्या ठिकाणी कायम स्वरुपी तेजी-मंदी चालू असते अशा शेअर बाजारात गुंतवली जाणार असेल तर ते माझ्यासाठी फायदेशिर आहे का?’   शेअर बाजारामधील दीर्घ पल्ल्याची गुंतवणुक नेहमीच लाभदायक असते परंतु ती हया पर्यायामार्फत नक्कीच नाही. त्यापेक्षा वेगळी अशी प्युअर टर्म पॉलिसी घ्यावी आणि युलिपच्या प्रिमियमसाठी लागणा-या रकमेपकी उर्वरीत रक्कम म्युच्युअल फंडाच्या ई.एल.एस.एस. योजनांमध्ये गुंतवावी. सदर रक्कम शेअर बाजारात गुंतवली जाते आणि आयकरामध्ये सुट मिळते. शिवाय लॉक इन् पिरियड असतो फक्त तीन वर्षांचा.
विमा क्षेत्रातील काही बदलांना तत्कालिन आय.आर.डी.ए.च्या अर्थात ईर्डा अध्यक्षांचा विरोध होता. परंतु त्यांच्या विरोधाला भीक घातली नाही. २०१३ च्या जानेवारीमध्ये नवीन अध्यक्षाची नेमणूक करण्यात आली. हे साहेब २०११ मध्ये जेव्हा विमा कंपनीचे अध्यक्ष होते तेव्हा नियमबाहय कामगिरीच्या आरोपाखाली त्यांची पदावनती करुन त्यांना व्यवस्थापकीय संचालक केले होते. काही महिन्यांतच त्यांची पदोन्नती करुन त्यांना पुन्हा अध्यक्षपद बहाल केले. आणि आय्.आर.डी.ए.च्या इतिहासात प्रथमच एका विमा कंपनीच्या अध्यक्षपदाची आय्.आर.डी.ए.चे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली गेली यापूर्वीचे तिनही अध्यक्ष भारतीय नागरी सेवेचे  (Civil Services)  अधिकारी  होते.
सरकारी अधिपत्याखालील कंपन्यांचे शेअर विक्रीला काढलेल्या प्रस्तावांमध्ये इतर वित्तीय संस्थांना रस नव्हता. त्यांच्या मते विक्रीची किंमत जास्त होती. एकंदर प्रस्तावांपकी फार मोठया भागांची खरेदी या विमा कंपनीने केली. आज त्या शेअर्सच्या खरेदीच्या संदर्भातील पुस्तकी तोटा हजारो कोटी रुपयांच्या घरात आहे. (उदा. नोव्हेंबर २०१२ मध्ये १५६.५६ रु.च्या भावाने खरेदी केलेल्या एका कंपनीच्या ८,८०,००,००० शेअर्सचा भाव आज ९७ रु. आहे. सहा महिन्यांमधील कागदी नुकसान सुमारे ५१० कोटी रु.(४० टक्के) द.सा.द.शे.नुकसान ८० टक्के.