गुरुवारच्या व्यवहारात तब्बल ६५ टक्क्यांपर्यंत घसरताना फायनान्शियल टेक्नॉलॉजीज इं. लि. (एफटीआयएल) या ‘बीएसई २००’ सूचीतील समभागाने सत्यम कॉम्प्युटरनंतर (७७%) दिवसातील सर्वात मोठय़ा समभाग मूल्य घसरणीच्या हृदयाला पीळ देणाऱ्या वेदना भागधारकांना दिल्या. परत दुसऱ्या दिवशी शुक्रवारी ही घसरण आणखी २१ टक्क्यांनी विस्तारली. सलग दोन दिवसांच्या आपटीने एफटीआयएलचे बाजारमूल्य १,७९९ रुपयांवरून ६९६ कोटी रुपयांवर, तर त्याच समूहातील ‘एमसीएक्स’चे बाजारमूल्य २,०८९ कोटी रुपयांवरून १,१७४ कोटी रुपयांवर आले आहे. हा कोणता नवीन शेअर घोटाळा आहे काय? त्याचा यथावकाश नियंत्रकांकडून सोक्षमोक्ष लावला जाईल. पण ही घसरण कथा या केवळ दोन समभागांपुरती सीमित नाही. गेल्या महिन्या-दीड महिन्यात आयव्हीआरसीएल, अॅमटेक ऑटो, येस बँक, वॉखार्ट, रिलायन्स इन्फ्र, भेल, गीतांजली जेम्स वगैरे विक्रीचा जबर तडाखा बसलेल्या तगडय़ा समभागांची यादी लांबत चालली आहे. शेकडो मिड आणि स्मॉल कॅप्सच्या पालापाचोळा झालाच आहे, पण सेन्सेक्समधील ३० कंपन्यांपैकी हिंडाल्को, कोल-इंडिया, स्टरलाइट, टाटा स्टील आणि आश्चर्य म्हणजे हिंदुस्तान युनिलीव्हरचा भावही ‘सेन्सेक्स’च्या घसरणीच्या अष्टकात जवळपास १५ टक्क्यांनी रोडावला आहे.
कितीही आडपडदा केला, मुखवटे चढविले तरी एक गोष्ट स्वच्छच आहे की आपण एका अरिष्टाच्या उंबरठय़ावर उभे आहोत. देशाचे धोरणकर्ते, बाजार नियंत्रक काही म्हणत असोत एकंदर बाजारभावना मात्र प्रचंड नकारार्थी बनल्या आहेत.
अर्थव्यवस्थेत चढ-उतार येतच असतात, त्याबाबत सर्वाधिक संवेदनशील असणाऱ्या शेअर बाजाराने त्या संदर्भात बऱ्या-वाईट प्रतिक्रिया देणे स्वाभाविकच! अलीकडच्या काळात विशेषत: २००८-०९ नंतरच्या जागतिक वित्तीय अरिष्टाच्या स्थितीत, जागतिक घडामोडीच्या पडसादाने बाजाराला हादरे बसताना दिसले आहेत. परंतु जागतिक स्तरावर अनेक भांडवली बाजार नव्या उच्चांकांच्या दिशेने अग्रेसर असताना, आपल्या शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना निरंतर घसरण कळा अनुभवाव्या लागाव्यात, हे निश्चितच आश्चर्यकारक आहे. म्हणूनच घसरणीच्या ताजा प्रवाहाच्या मूळाशी देशांतर्गतच कारणे आहेत, हे निश्चितच! निवारणाशिवाय उत्तरोत्तर चालढकल होत आलेल्या आणि महाभयानक रूप धारण केलेल्या देशांतर्गत अर्थचिंता यामागे आहेत. रुपयाची डॉलर-पौंड या प्रमुख जागतिक व्यवहार-चलनांच्या तुलनेत विक्रमी घसरण; रुपया आणि पर्यायाने चलनफुगवटय़ाला सावरण्यासाठी मध्यवर्ती बँकेची व्याजदरांविषयक कठोरता; या परिणामी अर्थविकासाचा दिला जात असलेला बळी; केंद्रातील सरकारचा यासंबंधाने एकूणच नाकर्तेपणा; तोंडावर आलेल्या निवडणुका आणि त्यांच्या संभाव्य कौलाच्या खोलात दडलेली अनिश्चितता आणि या सर्व अनागोंदीवर नजर ठेऊन असलेल्या जागतिक पतमानांकन संस्थांच्या ‘पतझडी’ची टांगती तलवार.. अशी एकात एक गुंतलेली संकटांची मालिकाच आ वासून उभी आहे.
त्यामुळे निराशेसह दाटलेली अनिश्चितता म्हणा किंवा अनिश्चिततेपायी बाजारावर असलेले नकारात्मकतेचे सावट म्हणा, अशा स्थितीत गुंतवणूकदाराची बाजारातील भूमिका काय असावी? सध्याच्या पडत्या बाजारात त्याने बिनदिक्कत खरेदी करावी काय? शेअर गुंतवणुकीविषयी आस्था असणाऱ्या मंडळींसाठी हा निश्चित लाखमोलाचा प्रश्न आहे.
बहुतांश विश्लेषक, अर्थ-सल्लागारांचा कानोसा घेतल्यास या प्रश्नाचे उत्तर निश्चितच ‘होय’ असेच पुढे येताना दिसते. एकंदर बाजार चालकांमध्ये पळापळ सुरू आहे; पट्टीचे ट्रेडर्स, दिग्गज गुंतवणूकदारही त्यांचे भागभांडार रिते करताना दिसत आहेत; अशा अफरातफरीच्या स्थितीत खरेदीचे धाडस करणे अर्थात सर्वानाच जमेलच असे नाही. जितकी जोखीम अधिक तितका परतावाही जास्तच, असे गुंतवणुकीचे ‘कॉपी-बुक’ शहाणपण शेअर बाजारात बऱ्यापैकी रूळलेल्यांना आजवर चांगलेच अवगतही असेल. बाजारातील ताजी स्थिती पाहिल्यास २००९ सालच्या पडझडीत खालच्या भावात खरेदी केलेले समभाग सध्या त्यापेक्षाही खाली रोडावले आहेत. म्हणूनच या होकाराला काही अटी-शर्ती आणि दक्षतेचे बांधही आहेत. २००८-०९ मध्ये आंधळेपणाने नव्हे तर वादळ-वावटळीतही तग धरून राहतील असा मजबूत बुंधा असलेल्या समभागांची अभ्यासपूर्ण निवड आजच्या नैराश्यातही चांगली फलदायी ठरलेली दिसून येत आहे. असे बहुप्रसवा (मल्टिबॅगर्स) समभाग एकीकडे आणि तर दुसरीकडे बहुवार्षिक नीचांकाला पोहचलेले समभाग अशी कडेकोट द्विध्रुवीय वाटचाल यापूर्वी बाजाराने खचितच अनुभवली असेल, हेही तितकेच खरे. म्हणूनच काहींसाठी गलेलठ्ठ परताव्याचा आत्मानंद देणारा तर काहींच्या बाबतीत आत्मघातकी पश्चातापदग्धता असा संमिश्र-भाव बाजारासाठी न भूतोच ठरणार आहे.
उत्तम व्यवस्थापन, मजबूत ताळेबंद व भविष्यात अर्थवृद्धीबाबत सुस्पष्टता असलेल्या समभागांची अभ्यासू निवड, निवडीबाबत संयम आणि सबुरी, विविधता (डायव्हर्सिफिकेशन), दीर्घावधी (टाइम-होरायझन), त्याचप्रमाणे सर्व महत्त्वाचे म्हणजे विविध मालमत्ता वर्गात गुंतवणुकीचे विभाजन (अॅसेट अॅलोकेशन्स) तसेच आपत्कालीन प्रसंगी कामी येईल अशी रोख बाळगून असणे, हे कोणत्याही गुंतवणूक नियोजनाचे मूलभूत नियम सध्यस्थितीलाही लागू पडतात. दीघरेद्देशी गुंतवणूकदारांनी या गोष्टींचा विसर पडू देऊ नये. भागभांडार अर्थात पोर्टफोलियोसाठी काय निवडावे, काय वगळावे याचे दिशादर्शन ‘अर्थ वृत्तान्त’ करीतच असते.
संग्रहित लेख, दिनांक 5th Aug 2013 रोजी प्रकाशित
असह्य घसरणकळा!
गुरुवारच्या व्यवहारात तब्बल ६५ टक्क्यांपर्यंत घसरताना फायनान्शियल टेक्नॉलॉजीज इं. लि. (एफटीआयएल) या ‘बीएसई २००’ सूचीतील समभागाने सत्यम कॉम्प्युटरनंतर (७७%) दिवसातील सर्वात मोठय़ा समभाग मूल्य घसरणीच्या हृदयाला पीळ देणाऱ्या वेदना भागधारकांना दिल्या. परत दुसऱ्या दिवशी शुक्रवारी ही घसरण आणखी २१ टक्क्यांनी विस्तारली. सलग दोन दिवसांच्या आपटीने
First published on: 05-08-2013 at 09:09 IST
मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Unbearable falling in sensex