कर चुकविण्याच्या नादात आपण स्वत:चेच नुकसान करून घेणार नाही याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. गुंतवणूक ही फक्त कर वाचविण्यासाठी करणे धोक्याचे आहे. कर वाचविण्याच्या घाईत बऱ्याचदा चुकीचे गुंतवणूक पर्याय निवडले जाण्याचा धोका आहे..
कर नियोजनच्या विश्लेषणामुळे अर्थिक नियोजन अधिक अनुकू ल करता येते. कर नियोजनामध्ये त्या आर्थिक वर्षांत करदात्याला उपलब्ध कर सुटीचा (ax exemptions) तसेच करकपातींचा (Tax deductions) कसा योग्य उपयोग करून घेता येईल याचा अभ्यास केला जातो. जेणेकरून करदात्याचे कर दायित्व (Tax liability) कमी करता येईल. या सर्व गोष्टीचा समावेश एकूण कर नियोजनात करण्यात येतो. अशा प्रकारे हे संपूर्ण कर नियोजन आर्थिक नियोजनात समाविष्ट करता येते. त्यामुळे करकपातीसाठी वेगळ्याने गुंतवणूक करण्याची गरज पडत नाही तर त्या उलट, आर्थिक नियोजनामध्ये समाविष्ट असलेल्या तुमच्या दीर्घकालीन ध्येयासाठी होणाऱ्या गुंतवणुकीतच करनियोजनासाठी लागणारी गुंतवणूक समाविष्ट करता येऊ शकते. करदात्याचे करदायित्व कमी करण्यासाठी कर नियोजन हा कायदेशीर मार्ग जरी असला तरी त्यात ही खबरदारी घेतली जाते की करदात्याने कर भरणे चुकवू नये तसेच योग्य तो कर भरणे टाळूही नये.
कायद्याच्या चौकटीत राहून कर नियोजन करणे केव्हाही योग्यच आहे. कर चुकविण्याचे बेकायदेशीर मार्ग अवलंबणे हे चुकीचे तर आहेच, परंतु त्यामुळे तुम्हीच कायद्याच्या कचाटय़ात सापडून धोक्यात येऊ शकता. कायद्यानेच कर सूट व करकपातीचे काही मार्ग सुचवले आहेत जेणेकरून काही ठरावीक प्रकारच्या गुंतवणुक पर्यायांमध्ये गुंतवणूक केल्यास कर सूट तसेच करकपात करता येऊ शकते. अशा गुंतवणुकीमुळे तुमचे एकूण करदायित्व कमी करण्यास मदत होते. करकपातीसाठी कर कायदा, १९६१ कलम ८०सी अंतर्गत रु. १,५०,०००/- पर्यंत गुंतवणूक करता येते. खाली कोष्टकात दिल्याप्रमाणे काही पर्याय कलम ८०सी अंतर्गत समाविष्ट होतात.
कर कायदा, १९६१ कलम ८०डी अंतर्गत रु. २५,०० ०/- पर्यंतच्या वैद्यकीय विम्याच्या हप्त्यासाठी कर सवलत दिली आहे. हीच सवलत वरिष्ठ नागरिकांसाठी तसेच पालकांसाठी भरलेल्या वैद्यकीय विमा हप्त्यांसाठी रु. ३०,०००/- इतकी आहे.
तसेच कर कायदा, १९६१ कलम ८०यू अंतर्गत काही गंभीर अपंगत्व असल्यास रु. १,२५,०००/- इतकी करकपात उपलब्ध आहे. अशा प्रकारचे कर वाचवण्याचे विविध पर्याय कर कायदा, १९६१ कलम ८०सी ते कलम ८०यू अंतर्गत दिलेले आहेत.
नोकरदार वर्गामध्ये सर्वसाधारणपणे सर्व मिळकत कागदोपत्री दाखविली जाते. त्यामुळे कर दायित्व कमी करण्यासाठी वर दिलेले काही पर्याय गुंतवणुकीसाठी वापरून त्यांना कर सवलत मिळवता येते. त्याकरवी कर सवलत मिळवूनही जो काही उर्वरित कर भरावयाचा असेल तोही ते भरतात.
परंतु, व्यावसायिकांच्या बाबतीत ज्यांच्या त्यांच्या व्यवसायाप्रमाणे काही मिळकत ही कागदोपत्री दाखवली जात नाही, तर काही ठिकाणी खर्च अधिक प्रमाणात दाखवून प्रत्यक्षात मिळकत कमी दाखवून कर चुकविला जातो. अशा गैरप्रकारांमुळे सध्या चालत असलेल्या चलनी नोटा बदल प्रकारांमुळे त्यांना नुकसान सोसावे लागते. रोकड खर्च ज्यादा दाखवून मिळकत कमी दाखवणे हे कायद्याने चुकीचे आहेच. शिवाय आपल्या दीर्घकालीन ध्येयपूर्तीसाठीसुद्धा ते घातक ठरते. त्याचे कारण, रोकड रक्कम बाजूला असली तर ती अनावश्यक खर्च होऊन जाते आणि मिळकतीचा भाग असला तरी ती गुंतवणुकीसाठी वापरता येत नाही. आणखीन अडचण म्हणजे अशी रोकड तुमच्या व्यवसाय विस्तारासाठीही वापरता येत नाही. सांगण्याचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कर चुकविण्याच्या नादात स्वत:चेच नुकसान करून घेत नाही आहात ना, याकडे जरा लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच फक्त कर वाचविण्यासाठी गुंतवणूक करणेही धोक्याचे आहे. कर वाचविण्याच्या घाईत बऱ्याचदा चुकीचे गुंतवणूक पर्याय घाईघाईने आपण निवडतो. परंतु, हे लक्षात घ्या की कुठलीही कर सवलत देणारी गुंतवणूक ही साधारणपणे तीन किंवा अधिक वर्षे बंदिस्त/ ताळेबंद (lock-in) असते. म्हणजेच ती कमीत कमी तीन किंवा अधिक वर्षे आपण काढून घेऊ शकत नाही. तेव्हा कर सवलतीसाठी जरी आपण गुंतवणूक करत असलो तरी ती आपल्या दीर्घकालीन ध्येयांची पूर्तता करण्यासाठी संलग्न असावी. योग्य आर्थिक नियोजकाच्या सल्ल्याने तुमच्यासाठी योग्य असलेला कर सवलतीचा पर्याय निवडणे केव्हाही उत्तम.
१९६१ कलम ८०सी अंतर्गत रु. १,५०,०००/- पर्यंत गुंतवणूक करता येते. खाली दिल्याप्रमाणे काही पर्याय कलम ८०सी अंतर्गत समाविष्ट होतात.
- पीपीएफ / ईपीएफ
- एनएससी
- म्युच्युअल फंड गुंतवणूक (जसे ईएलएसएस व तत्सम कलम ८०सी खाली मंजूर)
- जीवन विमा
- पेन्शन प्लान्स
- एनपीएस
- युलीप (युनिट लिंक्ड प्लान्स)
- सुकन्या समृद्धी योजना
kiranhake@fingenie.co.in
लेखक हे ‘सीएफपी’ पात्रताधारक अर्थ नियोजनकार आणि ‘सेबी’ नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार आहेत.