डॉ. आशीष थत्ते ashishpthatte@gmail.com

उद्योग-व्यवसायातील खरा नफा हा तुम्ही कशा प्रकारे उरलेल्या घटक वस्तूंचा वापर करून पुन्हा काम करता किंवा पुन्हा त्याचा वापर करता यावर असतो. रसायने बनविणाऱ्या कंपन्या किंवा धातूपासून वस्तू तयार करणाऱ्या कंपन्या याचा पुरेपूर फायदा उचलतात. इतर ठिकाणीदेखील म्हणजेच निर्दोष वस्तू बनवण्यामध्ये जिथे उच्च तापमानाचा वापर करून किंवा वस्तू वितळवण्याची प्रक्रिया असते तिथे तर निश्चितपणे उरलेल्या मालाचा पुनर्वापर केला जातो. अ‍ॅल्युमिनिअम, लोखंड, सोने, चांदी, खत, इलेक्ट्रॉनिक वस्तू ही त्याची काही सोपी उदाहरणे आहेत. त्यातूनसुद्धा जे घटक शिल्लक राहतात, त्याला शेवटी भंगार म्हणून बाहेर काढले जाते (याविषयी पुढील लेखात आपण जाणून घेऊ या). कंपन्यादेखील वेगवेगळे प्रयोग करून वाया गेलेल्या वस्तूंचे किंवा मालाचे काय करायचे, याबाबत संशोधन करत असतात. प्रत्येक कंपनी उत्पादन प्रक्रियेमधून किंवा वस्तूंची निर्मिती करताना कोणताही घटक वाया जाऊ नये, याची काळजी घेतली जाते. पण कधी कधी ते अपरिहार्य असते. अर्थात यात गुणवत्तेला पर्याय नाही किंवा आपण आधी बघितल्याप्रमाणे ‘बिल्स ऑफ मटेरिअल्स’ला दुर्लक्ष करून हे शक्य नसते. 

चला आता प्रत्यक्ष घरातील उदाहरण बघू या. कुठलीही गृहिणी स्वयंपाक करताना काही उरेल किंवा वाया जाईल अशा दृष्टीने बनवतच नाही. पण कधी कधी आपणच बाहेरून खाऊन येतो आणि अंदाज चुकतो. मग उरलेल्या पदार्थाचे काय करायचे हा प्रश्न असतो. त्या वेळी पुनर्वापर करण्याचा निर्णय घेण्यात येतो. फोडणी ही प्रक्रिया ज्यांनी शोधली ते धन्य आहेत. आता आठवा किती पदार्थाना आपण फोडणी देऊन दुसऱ्या दिवशी खातो. मासे किंवा चिकनदेखील उरले तर दुसऱ्या दिवशी तव्यावर तेलात तळून खातो. भात, पोळी, ब्रेड वगैरे तर अगदी सामान्य आहेत. ज्याप्रमाणे कंपन्या उरलेल्या मालाचा वापर करतात त्याप्रमाणे गृहिणीदेखील अन्न वाया जाऊ नये म्हणून आटोकाट प्रयत्न करतात. कारण त्यातच घरातील नफा व उत्कर्ष असतो. वरण उरले तर त्याची आमटी आणि आमटी उरली तर त्याचे पराठेसुद्धा करतात. बटाटा किंवा कोबीची उरलेली भाजी म्हणजे दुसऱ्या दिवशी ब्रेड घालून त्याचे छान कटलेट तयार केले जातात. भाताची भाकरी, भाज्यांचे सूप, पोळीचा लाडू आणि इतरही अनेक पदार्थ तयार केले जातात. स्वयंपाकघरात गरम करून पुन्हा खायला मायक्रोवेव्ह तर थंड ठेवायला फ्रिज नावाचे यंत्र आणले आहे. अन्न वाया घालवू नये असे लहानपणापासून सांगितले जाते. उद्योगातदेखील पुनर्वापरचे खूप महत्त्व आहे. कळत-नकळत घर आणि उद्योग अशा संकल्पनांची देवाणघेवाण करत असतात.    लेखक कॉस्ट अँड मॅनेजमेण्ट अकाउंटंट म्हणून कार्यरत /