डॉ. आशीष थत्ते ashishpthatte@gmail. com

कच्च्या व पक्क्या मालाच्या विविध पातळय़ा आपण याआधी बघितल्या होत्या. म्हणजेच किमान पातळीवर आल्यावर पुन्हा स्तर पुनर्रक्रमित करणे. पण हे करणे तितकेसे सोपे नसते विशेषत: जेव्हा कच्चा माल महत्त्वाचा असेल. जपानी लोकांनी यावर संशोधन करून दोन डब्यांची पद्धत शोधून काढली आणि त्याला नाव दिले कानबान पद्धत. म्हणजे अधिक व्यवस्थापन न करता ते आपोआप होईल याची काळजी घेणे. ज्या मालाचा वापर आहे किंवा जो कच्चा माल सतत वापरला जातो, तो दोन डब्यांमध्ये भरून ठेवायचा आणि १ व २ असे त्यांना नाव द्यायचे. हे दोन डब्बे एकतर एकमेकांवर किंवा एकापुढे एक ठेवायचे. जेव्हा एका डब्यातील माल वापरला जाईल तेव्हा दुसरा वापरायला घ्यायचा आणि मग आधीचा डब्बा भरून ठेवायचा आणि डब्बा भरायचा असल्यास एक वेगळे कार्ड व भरलेला असल्यास दुसरे कार्ड त्याच्या दर्शनी भागात लावायचे. यात माल कमी पडण्याचा किंवा अधिक साठवून ठेवायचा प्रश्न येत नाही. मोठय़ा मोठय़ा अभियांत्रिकी कंपन्या, सुटे भाग एकत्र करून पूर्ण भाग बनवणाऱ्या कंपन्या किंवा वाहने बनवणाऱ्या कंपन्यांमध्ये हमखास ही पद्धत वापरली जाते. भाषांतर म्हणून डब्बा हा शब्द वापरला असला तरी मराठीमध्ये याला आपण कणगी किंवा कोठी असेदेखील म्हणतो.

हल्लीची घरे छोटी व स्वयंपाकघर तर अजून छोटे असते. कोठी किंवा कणगी म्हणजे त्यातच घर व्यापून जाईल म्हणून डब्बा वापरणे सोईस्कर असते. पूर्वी जेव्हा घरे मोठी होती, तेव्हा साठवणुकीच्या डब्यातून वापराच्या डब्यात वस्तू यायच्या. विशेषत: धान्य, तशी तीदेखील दोन डब्यांची पद्धत होती. दुधाच्या पिशव्यादेखील घरी दोन असतात. काही अतिशय निर्णायक पदार्थ निश्चित दोन डब्याच्या पद्धतीप्रमाणे साठवले असतात. जसे पेपर नॅपकिन, साबण, शाम्पू, भांडी किंवा कपडे धुवायची पावडर वगैरे. बुफे पद्धतीत जेवताना दोन ठिकाणी वाढून ठेवले असते. गर्दी कमी करणे हे उद्दिष्ट असले तरी उपयोग एखादे संपले की दुसरे भरून आणणे असादेखील होतोच.

ही अतिशय सोपी व सुटसुटीत पद्धत असल्यामुळे जर तुम्ही वापरत नसाल तर नक्की त्याचा वापर करा. यामुळे ऐनवेळेला एखादा पदार्थ किंवा वस्तू न मिळण्याचा त्रास कदाचित वाचू शकेल. याकडे एक पद्धत म्हणून न बघता सामान्य नियम किंवा मूलभूत तत्त्व म्हणून बघितले तर त्याचा चांगला वापर करता येऊ शकतो.  लेखक कॉस्ट अँड मॅनेजमेण्ट  अकाउंटंट म्हणून कार्यरत /