10th May Akshaya Tritiya Horoscope Marathi: अत्यंत शुभ मानल्या जाणाऱ्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या अक्षय्य तृतीयेची तिथी आज आहे. १० मे २०२४ हा दिवस पंचांगानुसार अत्यंत शुभ आहे. आज वैशाख शुक्ल तृतीयेला अनेक राजयोग जुळून आले आहेत. तृतीया तिथी ही शुक्रवारी रात्री २ वाजून ५१ मिनिटांपर्यंत कायम असणार आहे. आजच्या दिवशी शकलो १० वाजून ४८ मिनिटांपासून ते उद्या ११ मे ला सकाळी ७ वाजून ३ मिनिटांपर्यंत रवी योग कायम असणार आहे. शुक्रवारी सकाळी १० वाजून ४८ मिनिटांपर्यंत रोहिणी नक्षत्र जागृत असेल व त्यानंतर मृगशिरा नक्षत्र जागृत होणार आहे. आज अक्षय्य तृतीयेसह परशुराम जयंती सुद्धा साजरी केली जाणार आहे. आजच्या या शुभ दिनाचे राशीफळ सुद्धा पाहूया..
१० मे पंचांग: अक्षय्य तृतीया विशेष राशी भविष्य
मेष:-क्षुल्लक गोष्टी नजरेआड कराव्यात. आपल्याला आवडत्या गोष्टी करण्यावर अधिक लक्ष द्यावे. दिवस मनाप्रमाणे घालवावा. जबाबदारी व्यवस्थित पार पाडाल. गोड बोलून कामे साध्य करावीत.
वृषभ:-मनाची चंचलता जाणवेल. प्रगल्भ विचार मांडाल. सारासार विचार करण्यावर अधिक भर द्याल. उगाच चिडचिड करू नका. काम आणि वेळ यांची सांगड घालण्याचा प्रयत्न करावा.
मिथुन:-स्वत:ची आब राखून वागावे. फसवणुकीपासून सावध राहावे. घराबाहेर वावरतांना मौल्यवान वस्तु सांभाळाव्यात. व्यापारी वर्गाला चांगला धनलाभ होईल. मनातील इच्छा पूर्ण होईल.
कर्क:-घाईघाईने कामे करणे टाळा. शांतपणे विचार करून पाऊल उचला. मनातील निराशा झटकून टाकावी. कामे यथायोग्य पार पडतील. कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक केले जाईल.
सिंह:-इतरांना आनंदाने मदत कराल. पारमार्थिक कामात सहभागी व्हाल. जोडीदाराचा तुमच्यावर प्रभाव राहील. कामातील किरकोळ अडचणी दूर करता येतील. भागीदाराशी सामंजस्य ठेवावे.
कन्या:-अपचनाचा त्रास जाणवेल. हलका आहार घ्यावा. वरिष्ठांची मर्जी राखावी. कामात हयगय करू नका. वडीलधार्यांचा सल्ला विचारात घ्यावा.
तूळ:-उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. संपर्कातील लोक वेळेवर भेटतील. क्षुल्लक कारणाने चिडू नका. अचानक धनलाभ संभवतो. योग्य वेळेचा लाभ उठवावा.
वृश्चिक:-कौटुंबिक स्वास्थ्य जपावे. चर्चेने काही प्रश्न हाताळावेत. सबुरी व संयम दोन्ही जपावा लागेल. कामात मन रमवावे लागेल. जवळचे नातेवाईक भेटतील.
धनू:-आवडते खेळ खेळाल. मित्रांशी पैज लावाल. करमणुकीत अधिक वेळ घालवाल. जवळच्या मित्रांचा गोतावळा जमवाल. काहीसे हट्टीपणे वागणे ठेवाल.
मकर:-संपूर्ण विचारांती शब्द द्यावा. बोलण्याच्या भरात जबाबदारी उचलू नका. उगाचच नसते विचार करत बसू नका. काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करावा. विचारांची दिशा बदलून पहावी.
कुंभ:-नको तिथे उत्साह दाखवायला जाऊ नका. कृती करण्याआधी संपूर्ण विचार करावा. मनातील गैरसमज काढून टाकावेत. किरकोळ दुखापतींकडे दुर्लक्ष करू नका. मानापमानाचे प्रसंग फार मनावर घेऊ नका.
हे ही वाचा<< अक्षय्य तृतीयेपासून ९ दिवस ‘या’ ३ राशींवर माता लक्ष्मी करणार धन वर्षाव; तुम्हीही १९ मे पर्यंत सोन्यासम आयुष्य जगाल
मीन:-आवडीचे पदार्थ खाल. कौटुंबिक सौख्यात रमून जाल. हस्त कलेला अधिक प्रोत्साहन मिळेल. सामुदायिक गोष्टीत फार लक्ष घालू नका. कामानिमित्त प्रवास करावा लागेल.
– ज्योतिषी विद्याधर करंदीकर