Astrological Predictions For Bihar Election 2025 : बिहार विधानसभा निवडणुकीचे पहिल्या टप्प्यातील मतदान ६ नोव्हेंबर पार पडले तर आता ११ नोव्हेंबर रोजी दुसऱ्या टप्प्यांतील मतदान होईल आणि १४ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होऊन या निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. त्यादरम्यान कोणाचं पारडं जड, तर कोणत्या पक्षाकडे सामान्य जनता पाठ फिरवणार याबद्दलची ग्रहस्थिती तपासून केलेला हा अभ्यास…

बिहारच्या निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा पक्ष जनता दल युनायटेड (जेडीयू) , प्रशांत किशोरयांचा नवा जन सुराज पक्ष आणि राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) हे महत्त्वाचे पक्ष आहेत. बाकीचे पक्षसुद्धा निवडणूक लढवणार असले तरीही त्यांच्या अस्तित्वाबाबतची स्थिती फारशी चांगली आहे, असे अद्याप तरी दिसून आलेले नाही. परंतु, अपवाद फक्त लोक जनशक्ती पार्टीचे चिराग पासवान (राम विलास पासवान यांचा पक्ष) आणि जन सुराज पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर या निवडणुकीत चमकदार कामगिरी करू शकतात. पण, एकूणच ही निवडणूक चार पक्षांमध्ये होणार असल्यामुळे याचा कल हा अस्थिरतेकडेच राहणार आहे.

बिहारच्या निवडणुकीत सातत्याने एक वेगळी लाट निर्माण करावी लागते. म्हणजेच जो या निवडणुकीत वेगळी लाट निर्माण करतो, तो या निवडणुकीत यशस्वी ठरतो. तर यंदा निवडणुकीत राम विलास पासवान यांच्या मुलाचा पक्ष लोक जनशक्ती पार्टी आणि प्रशांत किशोर यांचा जनसुराज पक्ष अशी लाट निर्माण करून थोड्याफार प्रमाणात चमकताना दिसतील. पण, त्यांना मोठी लाट निर्माण करण्यात आतापर्यंत अपयशसुद्धा आलेलं आहे, हेही विसरून चालणार नाही.

निवडणुकीबद्दल सांगायचे झाल्यास २३८ जागांसाठी दोन टप्प्यांत होणारे मतदान शांततेत होणार नसले तरीही खूप मोठा हिंसाचारही या निवडणुकीत होणार नाही. बिहारच्या निवडणुकीतील मतदानाचा टक्का हा सामान्य स्तरावर म्हणजेच ५० टक्क्यांच्या आत-बाहेर राहील. त्यामुळे किरकोळ हिंसाचारामुळे काही ठिकाणी फेरमतदानही घ्यावे लागेल. मात्र, काँग्रेसला या निवडणुकीत सपाटून पराभवाला सामोरे जावे लागेल, असे दिसते आहे. निवडणुकीनंतर घोडेबाजार चांगलाच वधारेल आणि त्रिशंकू अवस्था बदलण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न केले जातील आणि त्यामध्ये नितीश कुमार यांचे पारडे वरचढ राहील.

या संपूर्ण निवडणुकीत चिराग पासवान यांची चांगली छाप पडणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत चिराग पासवान हे निश्चितपणे असतील. परंतु, नवीन विधानसभा त्रिशंकू होण्याची दाट शक्यता असल्यामुळे कोणालाही स्पष्ट बहुमत मिळणार नाही. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या पक्षाची निवडणुकीतील कामगिरी यथातथा राहणार आहे. त्यांना खूप भरघोस यश मिळणार नाही; पण भारतीय जनता पार्टी आणि चिराग पासवान यांना मात्र या निवडणुकीत चांगले यश मिळाले, तर बऱ्याच ठिकाणी ते वजनदार अवस्थेत असतील.

या निवडणुकीत मुख्यतः १८ पगडजाती आणि त्यांची बिहारमध्ये असणारी भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) अशा वेगवेगळ्या पक्षांची घोडेबाजारात चांगली चांदी होईल. त्यांना अनपेक्षितरीत्या प्रचंड भाव येईल. मात्र, या निवडणुकीचा विचार केला, तर भारतीय जनता पार्टी निश्चितपणे वरचढ ठरू शकते. भारतीय जनता पार्टी हा सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष असू शकतो. मात्र, लोक जनशक्ती पार्टी नितीश कुमारांच्या पक्षापेक्षा सरस असेल असेही वाटते.

निवडणुकीत कोणाला कमी मते मिळतील?

बिहारची निवडणूक ही सगळ्यात वेगळी निवडणूक असल्यामुळे त्याचा त्याच दृष्टीने विचार करायला हवा. कारण- या निवडणुकीत जो पक्ष वरचढ असतो, त्या पक्षाची संभाव्य लाट पुढे काही महिने टिकून राहते, असा एक मोठा संदेश या निवडणुकीद्वारे भारतभर पोहोचणार आहे. विशेषतः तेजस्वी यादव यांच्या पक्षाचा जर विचार केला, तर त्यांना रवी आणि शुक्राचे विशेष बळ लाभलेलं आहे. मात्र, त्यांच्या मूळ कुंडलीमध्येच चंद्र हा बिघडलेला असल्यामुळे या निवडणुकीत त्यांना चंद्रबळ कमी जाणवेल. त्यामुळे त्यांना याही निवडणुकीत कमी मते मिळतील.

एकंदरीत ही निवडणूक अत्यंत चुरशीची होईल आणि या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचाही चांगला कस लागणार आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यापुढे बिहारवर सातत्याने लक्ष देऊन आहेत, याचा फायदा भारतीय जनता पक्षाला होईल.

या निवडणुकीत जेडीयूचे नितेश कुमार यांना मात्र मीन राशीत शनी असल्यामुळे फारसा प्रतिसाद मिळणार नाही. कारण- मूळ कुंडलीतल्या जेडीयूच्या चंद्राला तो चौथा येत असल्यामुळे आणि राहू हा चंद्रापासूनच्या तिसऱ्या घरात (थर्ड हाऊसमध्ये) असल्यामुळे त्यांना एका विशिष्ट समाजाची हवी तितकी मते मिळणार नाहीत. तो समाज पूर्णपणे या निवडणुकीमध्ये दुभंगलेला दिसेल आणि म्हणून कोणा एकाला मुस्लिमबहुल मतदान होणार नाही, असे ठामपणे वाटते.

शनी-मंगल प्रतियुती (अपोझिशन) असल्यामुळे तेजस्वी यादव आणि काँग्रेसची जी आघाडी आहे, या आघाडीला प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये मतदारांनी पुरता हरताळ फासल्याचे दिसून येईल. तेजस्वी यादव काय केले तर आपली सरशी होईल, या विवंचनेत असतील आणि त्यातून ते अपार कष्ट करून त्यांचा पक्ष बऱ्याच अंशी पुढे आणतील, असेही दिसते आहे. मात्र, त्यांना बहुमत मिळणार नाही.

निवडणुकीत त्रिशंकू विधानसभा येण्याची शक्यता…

अनेक प्रादेशिक पक्षांमुळे भारताचं लोकमत प्रचंड द्विधा मनस्थितीत आहे. अशा परिस्थितीमध्ये जो कोणी पैसे देईल किंवा काहीतरी मतदारांना आकर्षित करण्यासाठी नवी शक्कल लढवेल अशा सर्वांना निवडणुकीत चांगलं मतदान होईल. मात्र, अशी कुठलीही एक लाट नसल्यामुळे सर्वच पक्षांना त्याचा फटका बसणार आहे. कारण- बिहारचे हे मतदान लाटेवर आरूढ होणारे मतदान आहे. पण, तशी लाट कुठलाच पक्ष या निवडणुकीत निर्माण करू शकलेला नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे सर्वांचाच हवाला नशिबावर असेल. त्यामुळे एकूणच या निवडणुकीत त्रिशंकू विधानसभा येण्याची दाट शक्यता आहे. नंतरचा घोडेबाजार चांगलाच तेजीत असेल. त्यामुळे शेवटी जे काही निष्पन्न होईल, त्यातून नितीश कुमार, भाजपा आणि चिराग पासवान या त्रिकुटाला यश मिळाल्याचे अंतिमतः चित्र समोर येईल.