Laxmi Pujan 2025 Date Time and Puja Muhurat: देशभरात दिवाळीचा सण मोठ्या उत्साह आणि जल्लोषात साजरा केला जातो. दिवाळी हा हिंदू धर्मातील सर्वांत मोठा सण आहे. पाच दिवसांची ही दिवाळी प्रत्येकाच्या घरी सुख, समृद्धी आणते. या पाच दिवसांमध्ये लक्ष्मीपूजनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मीची पूजा केली जाते. पण, यंदा लक्ष्मीपूजन कोणत्या दिवशी आहे आणि लक्ष्मीपूजन कोणत्या मुहूर्तावर करावे हे या बातमीच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ
लक्ष्मीपूजन कधी करावे?
आश्विन अमावास्येला लक्ष्मीपूजन केले जाते. लक्ष्मीपूजनाचा काळ म्हणजेच प्रदोष काळ (सूर्यास्तानंतरचा काळ) हा जवळपास दोन तासांचा कालावधी असतो. त्या काळामध्ये अमावास्या असणे आवश्यक असते आणि त्या काळात लक्ष्मीपूजन करावे.
लक्ष्मीपूजन तारीख, तिथी
२० ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजून ४४ मिनिटांनी अमावास्या तिथी सुरू होणार असून, २१ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री संध्याकाळी ५ वाजून ५४ मिनिटांनी अमावास्या तिथी समाप्त होणार आहे.
उदय तिथीनुसार, लक्ष्मीपूजन २१ ऑक्टोबरच्या संध्याकाळी केले जाईल.
लक्ष्मीपूजन शुभ मुहूर्त
२१ ऑक्टोबर २०२५ रोजी संध्याकाळी ६ वाजून १० मिनिटांपासून ते रात्री ८ वाजून ४० मिनिटांपर्यंत लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त असेल.
दिवाळीत लक्ष्मीपूजन का करतात?
आश्विन वद्य अमावास्येला लक्ष्मीपूजन करण्याची परंपरा आहे. या दिवशी बलीच्या बंदिवासातून लक्ष्मीची सुटका झाली होती आणि त्याच आनंदात लक्ष्मीपूजन केले जाते, अशी एक आख्यायिका आहे. लक्ष्मीचे वास्तव्य आपल्या घरात नेहमी राहावे यासाठी मनोभावे लक्ष्मीपूजन केले जाते. त्याच कारणामुळे व्यापारी लोकही या दिवशी त्यांच्या कामाच्या ठिकाणी लक्ष्मीपूजन करतात. दिवाळीत लक्ष्मीपूजन का केले जाते याबाबत अनेक आख्यायिका प्रचलित आहेत.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)