Gudi Padwa 2025 Date Tithi and Shubh Muhurat: हिंदू नववर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून होते. विशेषत: महाराष्ट्रात गुढीपाडव्याच्या सणाचा मोठा उत्साह पाहायला मिळतो. गुढी म्हणजे विजय पताका. गुढीपाडव्याच्या दिवशी मांगल्याचे प्रतीक म्हणून घरोघरी गुढी उभारण्याची परंपरा आहे. यासह घराबाहेर रांगोळ्या काढणे आणि घर सजवण्याची परंपरा आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार, गुढीपाडवा हा साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक मानला जातो. यंदा हा सण रविवारी, ३० मार्च रोजी साजरा होणार आहे. हा दिवस मराठी नववर्षाची सुरुवातही मानला जातो, यामुळे गुढीपाडवा हा सण कशाप्रकारे साजरा केला जातो, शुभ मुहूर्त, तिथी आणि महत्त्व जाणून घेऊ…

गुढीपाडव्याची तिथी आणि तारीख (Gudi Padwa 2025 Date)

यंदा चैत्र महिन्यातील प्रतिपदा तिथी २९ मार्च रोजी संध्याकाळी ४ वाजून २७ मिनिटांनी सुरू होणार असून ती ३० मार्च दुपारी १२ वाजून ४९ मिनिटांपर्यंत असेल. अशा परिस्थितीत उदय तिथीनुसार ३० मार्च रोजी गुढीपाडवा हा सण साजरा केला जाईल.

गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त (Gudi Padwa Puja Muhurat)

हिंदी दिनदर्शिकेनुसार, गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त ३० मार्च रोजी सकाळी ४ वाजून ४१ मिनिटांपासून ते सकाळी ५ वाजून २७ मिनिटांपर्यंत आहे.

अभिजात मुहूर्त – दुपारी १२ वाजून १ मिनिटांपासून ते दुपारी १२ वाजून ५० मिनिटांपर्यंत असेल.

विजय मुहूर्त- दुपारी २ वाजून ३० मिनिटांपासून ते दुपारी ३ वाजून १९ मिनिटांपर्यंत असेल.

गोधूलि मुहूर्त – संध्याकाळी ६ वाजून ३७ मिनिटांपासून ते ७ वाजेपर्यंत असेल.

गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी असल्याने या दिवशी जरी शुभ मुहूर्तावर पूजा करता आली नाही, तरी तुम्ही संपूर्ण दिवसात कधीही पूजा करू शकता.

गुढीपाडव्याचे महत्त्व (Gudi Padwa Importance)

महाराष्ट्रात गुढीपाडव्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. लोक या सणानिमित्त पहाटे लवकर उठून स्नान करून मग दारासमोर गुढी उभारतात आणि त्याची पूजा करतात. काठीवर तांब्याचा लोटा उलटा आणि त्याखाली लाल, पिवळे, भगवे रेशमी कापड बांधले जाते. फुलांच्या माळा आणि आंब्याच्या पानांनी सजवले जाते. यासह साखरेचे तोरण आणि कडुलिंबाची टाळ बांधली जाते. यानिमित्ताने घरासमोर फुलांचे तोरण, रांगोळी काढल्या जातात. घराबाहेर बांधलेल्या गुढीमुळे नकारात्मक शक्ती रोखली जाते असे मानले जाते. गुढीपाडवा हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने या दिवशी लोक नवीन घर, गाडी किंवा नव्या कामांची सुरुवात करतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महाराष्ट्रभर ठिकठिकाणी गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रा काढल्या जातात. मुंबई, पुणे, ठाणे यासह अनेक ठिकाणच्या शोभा यात्रा या नेहमी चर्चेचा विषय असतात. अनेक महाराष्ट्रीय तरुण, तरुणी या सणानिमित्ताने पारंपरिक मराठमोळ्या गेटअपमध्ये शोभा यात्रांमध्ये सहभागी होतात. लोक सणानिमित्ताने आपल्या जवळच्या व्यक्तींना भेटतात, पण केवळ महाराष्ट्रातच नाही तर इतर राज्यांमध्येही हा सण साजरा करण्याची परंपरा आहे.