Numerology 11:11: कधी तुम्ही लक्ष दिलं आहे का की, काही विशिष्ट संख्या सतत दिसत राहतात? उदाहरणार्थ- घड्याळात ११ : ११ दिसणं. अनेक जण याला केवळ संयोग समजतात, तर काही लोक हा एक विशेष संकेत मानतात. ज्योतिषी व वास्तू सल्लागार पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांच्या मते, ही वेळ केवळ घड्याळातील क्षण नाही, तर ती एक प्रकारची सांकेतिक ऊर्जा आहे, जी आपल्याला काही महत्त्वाचं सांगते.

११ : ११ या वेळेचं गूढ काय?

अंकज्योतिषशास्त्रात ११:११ हा मास्टर नंबर मानला जातो. तो व्यक्तीच्या विचारशक्ती, आत्मिक उन्नती व मनोबल यांच्याशी संबंधित आहे. जेव्हा हा अंक दोनदा पुन्हा दिसतो म्हणजे ११:११, तर त्याचा प्रभाव दुपटीने वाढतो, असे अनेक ज्योतिषी सांगतात. काही तज्ज्ञ याला ‘सिंक्रोनिसिटी’देखील म्हणतात. म्हणजे असा संकेत की, आपण योग्य मार्गावर आहोत आणि आपल्यासोबत काही अदृश्य शक्ती कार्यरत आहेत.

या वेळेस मनोकामना का मांडतात लोक?

ज्योतिषानुसार, रात्रीच्या या विशिष्ट वेळेत सर्व ग्रह एका विशेष स्थितीत असतात, ज्यामुळे त्यांच्या ऊर्जेचा जास्त प्रभावी परिणाम होतो. त्यामुळे लोकांच्या मनातील इच्छेला त्या क्षणी अधिक ताकद मिळते, असे मानले जाते. हेदेखील सांगितले जाते की, ब्रह्मांड आपले विचार त्या क्षणी तीव्रतेने ऐकते. जर मन स्वच्छ आणि इच्छाशक्ती प्रामाणिक असेल, तर त्या क्षणातील विचार आपल्याला भावनात्मक आणि मानसिक शांतता देतो.

याची खरी ताकद मनाच्या श्रद्धा आणि विश्वासावर अवलंबून असते. अनेक लोक सांगतात की, जेव्हा त्यांनी या क्षणी मनातून इच्छा व्यक्त केली, तेव्हा वेळेच्या ओघात त्या गोष्टीत काही प्रमाणात सकारात्मक बदल दिसले. वैज्ञानिक दृष्टिकोनातून याला ठोस आधार नाही; परंतु मनोविज्ञान सांगते की, जेव्हा आपण एखाद्या गोष्टीवर पूर्ण लक्ष देतो आणि त्यावर विश्वास ठेवतो, तर आपली मानसिक ऊर्जा आपल्याला त्या गोष्टीकडे आकर्षित करते.

का खास आहे ही वेळ?

११: ११ ही वेळ विशेष संकेत म्हणून ओळखली जाते, जी आपल्याला आपल्या अंतर्मनाशी संपर्क साधायला मदत करते. हा फक्त वेळ पाहण्याचा क्षण नसून, मनाची शक्ती जागृत करण्याचा एक मार्ग मानला जातो. अनेक लोक या वेळेला आपली गुप्त इच्छा सांगतात आणि मन शांत ठेवतात.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. त्याच्या तथ्यांबद्दल लोकसत्ता कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोराही देत नाही.)