Things to Remove Before Diwali: दिवाळी हिंदू धर्मातील सर्वात मोठा, आनंद आणि समृद्धीचा उत्सव. प्रत्येक वर्षी कार्तिक अमावस्येला येणाऱ्या या पवित्र सणाची आतुरतेने वाट पाहिली जाते. या दिवशी लक्ष्मीमातेची आणि गणपती बाप्पाची विधिवत पूजा केली जाते. श्रद्धेने पूजन केल्यास घरात धन, सौख्य, समाधान आणि समृद्धीचा वास होतो असे शास्त्र सांगते. आता दिवाळी अगदी दारात आली आहे आणि सर्व जण घरांची साफसफाई करण्यात मग्न आहेत. पण, तुम्हाला ठाऊक आहे का घरातील काही वस्तू अशा असतात ज्या लक्ष्मीमातेला अजिबात आवडत नाहीत. या वस्तू जर घरात ठेवल्या तर देवीचा आशीर्वाद तर लांबच, उलट नकारात्मकता घरभर पसरते; म्हणूनच दिवाळीपूर्वी या ५ वस्तू घरातून लगेच बाहेर काढा, नाहीतर श्रीमंतीऐवजी दारिद्र्य तुमचं दार ठोठावेल!

घरात ‘या’ ५ वस्तू ठेवू नका

१. फुटलेला आरसा

वास्तुशास्त्रानुसार घरात फुटलेला आरसा ठेवणे अत्यंत अशुभ मानले जाते. आरशातील प्रतिबिंब म्हणजे सकारात्मक ऊर्जा आणि तोच आरसा फुटला तर ती ऊर्जा नष्ट होते. फुटलेला आरसा घरात ठेवला तर वाद, तणाव आणि अपयश वाढते. लक्ष्मीमातेचा आशीर्वाद दूर राहतो, त्यामुळे दिवाळीपूर्वी घरातील सर्व फुटलेले आरसे लगेच बाहेर फेकून द्या.

२. बंद घड्याळ

घरात बंद पडलेले घड्याळ म्हणजे थांबलेला काळ. वास्तुशास्त्र सांगते की, घरातील बंद घड्याळ जीवनातील प्रगती थांबवते. अशा घड्याळामुळे घरात स्थैर्याचा अभाव येतो, त्यामुळे दिवाळीपूर्वी सर्व बंद घड्याळे चालू करून घ्या किंवा न चालणारी बाहेर काढा. लक्ष्मीला वेळेचे महत्त्व कधीच विसरायला आवडत नाही.

३. जुने किंवा तुटके फर्निचर

घरातील तुटके-फुटके फर्निचर म्हणजे स्थिरतेचा अभाव. अशा वस्तूंनी घरात अडकलेली ऊर्जा तयार होते, जी नकारात्मकतेचं कारण बनते. लक्ष्मी जिथे नकारात्मक ऊर्जा असते तिथे कधीच वास करत नाही, म्हणूनच जुने, मोडकळीस आलेले फर्निचर दिवाळीपूर्वी घरातून काढून टाका.

४. खंडित मूर्ती

देव-देवतांच्या खंडित मूर्ती घरात ठेवणे अत्यंत अपशकुन मानले जाते. अशा मूर्तींमुळे देवतांचा आशीर्वाद कमी होतो आणि अडचणी वाढतात. लक्ष्मीमातेची कृपा मिळवायची असेल तर घरातील तुटलेल्या मूर्तींना नमस्कार करून मंदिरात विसर्जित करा.

५. तुटलेले किंवा गंजलेले लोखंडी सामान

घरात तुटलेले किंवा गंजलेले लोखंडी सामान ठेवणे म्हणजे शनी आणि राहूच्या नकारात्मक प्रभावाला आमंत्रण. अशा वस्तूंमुळे आर्थिक नुकसान, आरोग्याच्या समस्या आणि तणाव वाढू शकतो. दिवाळीपूर्वी अशा वस्तूंची सफाई करून सकारात्मक ऊर्जा आणा.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. त्याच्या तथ्यांबद्दल लोकसत्ता कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोराही देत नाही.)