Vastu Tips For Home : घराची नियमित स्वच्छता करणे आवश्यक आहे, कारण घर स्वच्छ असेल तर आजूबाजूचे वातावरण सकारात्मक राहते. असे म्हटले जाते की, घर स्वच्छ असेल तर तिथे देवी लक्ष्मीचा वास असतो. घरात झाडू ठेवण्याविषयी वास्तुशास्त्रात काही नियम आहेत, ज्या नियमांचे पालन करून तुम्ही घरात योग्य दिशेने झाडू ठेवू शकता आणि घरातील नकारात्मकता, आर्थिक अडचणी दूर करू शकता. घरात नेमक्या कोणत्या ठिकाणी झाडू ठेवला पाहिजे याविषयी जाणून घेऊ….
वास्तुशास्त्रात झाडूला देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. हिंदू धर्मात झाडूसंबंधित अनेक कथा आहेत. उदाहरणार्थ, संध्याकाळी घरात देवी लक्ष्मीचं आगमन होतं, त्यामुळे घरामध्ये झाडलोट करणे योग्य नाही, असे मानले जाते. त्याचप्रमाणे झाडू वापरण्याचे आणि ठेवण्याच्या जागेशी संबंधित काही गोष्टी आहेत, ज्या जाणून घेतल्यास आपण आपले वास्तु दोष दूर करू शकता.
आपल्या देशातील अनेक राज्यांमध्ये झाडूबाबत वेगवेगळे समज आहेत. उदाहरणार्थ, जर आपला पाय झाडूवर पडला तर ते वाईट मानले जाते. अनेक ठिकाणी असे मानले जाते की, झाडू अशा ठिकाणी ठेवावा की तो कोणालाही दिसणार नाही.
सूर्यास्तानंतर झाडू मारू नका
वास्तुशास्त्रानुसार, संध्याकाळनंतर कधीही घरात झाडू मारू नये. हा एक अशुभ शगुन मानला जातो आणि असे म्हटले जाते की, जर कोणी असे केले तर देवी लक्ष्मी नाराज होते आणि त्या घरातून ती निघून जाते, त्यामुळे संध्याकाळ होण्यापूर्वी घर झाडून घ्या.
जेवणाच्या ठिकाणी झाडू ठेवू नका
वास्तुशास्त्रानुसार, स्वयंपाकघरात किंवा जेवणाच्या टेबलाखाली किंवा वर कधीही झाडू ठेवू नका. जर तुम्ही जाणूनबुजून किंवा अजाणतेपणे असे करत असाल तर ते ताबडतोब थांबवा. वास्तुशास्त्रानुसार असे केल्याने अशा व्यक्तींच्या घरात आर्थिक समस्या निर्माण होऊ लागतात. त्याचबरोबर अन्नपदार्थांबाबतही समस्या निर्माण होऊ लागतात.
बाल्कनी किंवा टेरेसवर झाडू ठेवू नका
जर तुम्ही तुमच्या घराच्या बाल्कनी आणि छतावर झाडू ठेवत असाल तर यामुळे तुमच्या विनाशाचा मार्ग हळूहळू सुरू होऊ शकतो. या ठिकाणांहून झाडू लवकर काढून टाका. जर तुम्ही असे करत असाल तर देवी लक्ष्मी तुमच्यावर निराश होऊ शकते. अशा परिस्थितीत तुमची आर्थिक स्थिती बिघडू शकते.
झाडू ‘या’ दिशेला ठेवू नका
घराच्या ईशान्य दिशेला चुकूनही कधी झाडू ठेवू नका. जर तुम्ही असे केले तर आर्थिक अडचण येऊ शकते.
झाडू ठेवण्याची योग्य दिशा कोणती?
झाडू नेहमी तुमच्या घराच्या नैऋत्य दिशेला ठेवा. झाडू नेहमी खाली ठेवण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही तो उभा ठेवला तर लक्षात ठेवा की, तुम्ही ज्या बाजूने धरता ती बाजू नेहमी वरच्या दिशेने असावी. जर तुम्ही झाडू अगदी उलटा ठेवला तर नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात लगेच प्रवेश करते असे मानले जाते.
(या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक आहे असा आमचा दावा नाही. तपशीलवार आणि अधिक माहितीसाठी, कृपया संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)