What should donate on Diwali 2025: दिवाळी हा प्रकाश आणि आनंदाचा सण आहे. हिंदू धर्मानुसार, पूजा आणि प्रार्थनेसोबतच दान करण्यालाही विशेष महत्त्व आहे. दरवर्षी कार्तिक अमावस्येला दिवाळी साजरी केली जाते. या वर्षी दिवाळी २० ऑक्टोबर रोजी साजरी केली जात आहे. धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून दिवाळी हा एक अतिशय खास दिवस मानला जातो. या दिवशी काही विशिष्ट वस्तू दान केल्याने सकारात्मक ऊर्जा आणि आनंद तसंच समृद्धीचा लाभ होतो. याव्यतिरिक्त देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने आर्थिक स्थिरता प्राप्त होते. तेव्हा दिवाळीत नेमक्या कोणत्या वस्तू दान करणे शुभ मानले जाते याबाबत जाणून घेऊ…
अन्नदान
हिंदू धर्मात अन्नदानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हे सर्वात श्रेष्ठ दान मानले जाते. अनेक धर्मस्थळी अन्नदान करता येते. अन्नदान केल्याने देवी लक्ष्मी तसंच देवी अन्नपूर्णा प्रसन्न होते असे मानले जाते. दिवाळीच्या दिवशी गरीब आणि गरजूंना अन्नदान करावे.
कपडे दान करणे
हिंदू धर्मात कपडे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. हातावर पोट असलेल्यांना, योग्य निवारा नसलेल्यांना किंवा अत्यंत हलाखीत दिवस काढणाऱ्यांना अशावेळी कपडे दान करावेत. कपडे दान केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि आर्थिक समस्यांपासून मुक्तता मिळते असे मानले जाते.
शृंगाराचे सामान
दिवाळीच्या दिवसांत विवाहित महिलांना सौंदर्याचे म्हणजेच शृंगाराचे सामान दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. शृंगाराच्या सामानाचे दान केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि त्यांना शाश्वत सौभाग्य मिळते असे मानले जाते.
दिवाळीत कोणत्या गोष्टी दान करू नये?
दिवाळीत चुकूनही साखर दान करू नये. साखर ही ऊसापासून तयार केली जाते. ऊस हा देवी लक्ष्मीला प्रिय आहे. म्हणूनच साखर दान केल्याने देवी लक्ष्मी तुमच्या घरातील निवास सोडू शकते. शिवाय दिवाळीत दूध, दही, सुया आणि मीठ दान करणे देखील टाळले पाहिजे.
दिवाळीच्या दिवसांत या काही विशिष्ट वस्तूंचे दान करणे शुभ तसंच फलदायी मानलं जातं. अशावेळी या वस्तू प्रामुख्याने गरीबांना दान केल्यास अधिक फलदायी आणि पुण्याचे समजले जाते.