Astro tips: दिवाळीमध्ये सर्वजण देवी लक्ष्मीच्या स्वागतासाठी कार्तिक अमावस्येच्या प्रदोष काळात पूजा करतात. या दिवसात सगळ्यांनाच लक्ष्मीचा वास त्यांच्या घरी हवाहवासा असतो. पण तुम्हाला लक्ष्मीच्या मोठ्या बहिणीविषयी माहीत आहे का? हिंदू धर्मानुसार, लक्ष्मी ही सुख-समृद्धी आणि धनसंपत्तीची देवी आहे. लक्ष्मीची मनोभावे पूजा केल्याने घरी कायम संपत्तीचा वास राहतो. मात्र, लक्ष्मीचीच मोठी बहीण अलक्ष्मी ही अगदी याच्या उलट आहे. अलक्ष्मी दारिद्र्य, दु:ख, दुर्भाग्य, चरित्रहीनता, रोग अशा नकारात्मकतेची देवी आहे असे मानले जाते.

कशी प्रकटली अलक्ष्मी?

लक्ष्मीचा जन्म समुद्र मंथनातून झाला, तर अलक्ष्मीसुद्धा समुद्र मंथनातूनच प्रकट झाली आहे. दिवाळीमध्ये सर्वजण लक्ष्मीला बोलावतात आणि अलक्ष्मीला बाहेर काढतात. लक्ष्मी आणि अलक्ष्मी कधीही एकत्र निवास करू शकत नाही. लक्ष्मी आणि अलक्ष्मी दोघींबद्दल पुराणात काही वर्णन आहे. पद्मपुराणात सांगितल्याप्रमाणे, अलक्ष्मी कशी प्रकट झाली आणि ती कोणत्या लोकांकडे वास करते याबाबत सविस्तर जाणून घेऊ…

पद्मपुराणात सांगितल्याप्रमाणे, समुद्र मंथनाच्या दरम्यानच अलक्ष्मी प्रकट झाली होती. लक्ष्मीच्या आधी तिची मोठी बहीण अलक्ष्मी दारिद्र्य देवी प्रकट झाली होती. ती लाल वस्त्र परिधान केलेली होती. प्रकट झाल्यावर अलक्ष्मीने सर्व देवतांना विचारले की, माझं आगमन कोणत्या कारणासाठी झालं आणि मला कुठे निवास करायचा आहे. त्यावर देवतांनी तिला सांगितले की, ज्यांच्या घरी रोज वाद-विवाद, भांडणं होतात तिथेच तुला राहण्यासाठी स्थान देत आहे. देवतांनी अलक्ष्मीला कलहप्रिय दारिद्र्याची देवी असं म्हटलं. तू अशा कलहप्रिय लोकांच्या घरी वास कर आणि अमंगल कर. त्या घरात वास कर जिथे कठोर भाषण केलं जातं, जिथे लोक खोटं बोलतात, जिथे स्त्रियांचा अपमान होतो, जिथे अशुद्ध अंत:करणाचे लोक संध्याकाळच्या वेळी झोपतात; अशा लोकांच्या घरात दु:ख आणि दारिद्र्य प्रदान करत तिथेच निवास कर. अशाप्रकारे अलक्ष्मी अवतरली.

घरात अलक्ष्मी प्रवेश नकोच

काहीवेळा अथक प्रयत्नानंतरही आर्थिक परिस्थिती सुधारत नाही किंवा दुर्भाग्य पाठ सोडत नाही. आयुष्यात ऐश्वर्य, मान-सन्मान, प्रतिष्ठा समाप्त होऊ लागतात. अशी परिस्थिती तेव्हाच येते जेव्हा लक्ष्मी तुमच्याकडे पाठ फिरवते आणि अलक्ष्मी घरात प्रवेश करते. त्यामुळे अशा कुठल्याही गोष्टी करू नका ज्यामुळे तुमच्या घरात अलक्ष्मी शिरकाव करेल.

देवी अलक्ष्मीला तिखट आणि आंबट पदार्थ प्रिय आहेत. अशावेळी जर घराच्या बाहेर किंवा दुकानाच्या बाहेर लिंबूमिरची लावली तर अलक्ष्मी बाहेरूनच तिचे मन तृप्त करून परतून जाते.

घराच्या मुख्य दरवाजावर कचरा किंवा घाण ठेवू नये, नाहीतर अलक्ष्मी शिरकाव करून शकते आणि लक्ष्मी पाठ फिरवेल.

घरात विनाकारण सामान किंवा अडगळ ठेवू नये. घरातील भंगार वेळोवेळी बाहेर काढा.

घरातील कुंड्यांची सफाई करत जा आणि सुकलेली पानं काढत रहा.

घरातील एखाद्या खोलीत दक्षिण-पश्चिम भिंतीलगत तिजोरी असेल तर घरात सुख-समृद्धी आणि शांती टिकून राहते.

लक्ष्मीच्या मनोभावी पूजेनंतरही आर्थिक परिस्थिती सुधारत नसेल, तर याचा अर्थ घरात अलक्ष्मीचा प्रभाव खूप जास्त आहे. अशावेळी अलक्ष्मीची प्रार्थना करून तिला जाण्याची विनंती करा.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)