29 September 2020

News Flash

वाजपेयींची घडण..

वाजपेयी आणि अडवाणी यांचा एकमेकांशी खऱ्या अर्थाने किंवा सखोल परिचय १९५७ मध्ये झाला.

माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांच्याविषयीच्या या पुस्तकानंतर लेखक विनय सितापती हे सध्या नरेंद्र मोदी-पूर्व भाजपविषयी पुस्तक लिहीत आहेत.

पी. व्ही. नरसिंह राव यांच्याविषयी ‘हाफ लायन’ हे पुस्तक लिहून, राव यांच्या भारतकेंद्री विचारांचा नेमका वेध घेणारे लेखक विनय सीतापती यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्यावरही तितकेच अभ्यासूपणे आणि तितक्याच संवेदनशीलतेने पुस्तक लिहिले तर ते कसे असेल? याचा वानवळा देणारे हे टिपण. एका आगामी पुस्तकाची चाहूल देणारे..

अटलबिहारी वाजपेयी यांच्याविषयी लिहिल्या गेलेल्या आदरांजलीपर लेखांनी त्यांच्या महत्तेचे पैलू उलगडून दाखवले. कुणी त्यांच्या वक्तृत्वावर, कुणी त्यांच्या नेतृत्वशैलीवर, तर कुणी त्यांच्या सत्त्वशील समन्वयवादी व्यक्तिमत्त्वावर भर दिला. आपण वाजपेयींचे साजिरेपण पाहात असताना त्याची कारणे शोधावीशी वाटतात आणि वाजपेयींच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देणाऱ्या तीन घटकांपर्यंत आपण येतो : लालकृष्ण अडवाणी, राजकुमारी कौल आणि भारतीय संसद!

वाजपेयी आणि अडवाणी यांचा एकमेकांशी खऱ्या अर्थाने किंवा सखोल परिचय १९५७ मध्ये झाला. दीनदयाळ उपाध्याय यांनी सहजगत्या वाजपेयींचे वक्तृत्वगुण हेरले होते, तसेच अडवाणींचे संघटनकौशल्यही दीनदयाळजींनी हेरले आणि तोवर राजस्थानात ‘राष्ट्रनिर्माणा’चे कार्य करणाऱ्या अडवाणींना दिल्लीत बोलावून, जनसंघाचे नवे खासदार अटलबिहारी वाजपेयी यांचे सचिव म्हणून जबाबदारी सोपविली. अडवाणींची निष्ठा अशी की, नेतृत्वाचा हा क्रम – ही उतरंड – त्यांनी नेहमीच इतिहासदत्त मानून कधीही अतिक्रम केला नाही. वाजपेयींनी अडवाणींच्या कारकीर्दीला सुरुवातीच्या काळात हात दिला. सन १९७३ मध्ये अडवाणीच जनसंघाचे अध्यक्ष व्हावेत यासाठी वाजपेयींनी ज्येष्ठ नेत्यांच्या आग्रहांचे आणि त्यामागील धोरणांचेही दडपण झुगारले. अडवाणींचा उत्कर्षकाळ तेथून सुरू झाला. जनसंघाच्या आणि पुढे भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदावर पुढली २५ वर्षे वाजपेयी आणि अडवाणी यांचाच प्रभाव राहिला, तोही एकमेकांच्या साथीने!

अडवाणींनी १९९५ मध्ये जणू एक परतफेड केली. तोवर वाजपेयींचे पक्षातील स्थान हे परिघावर गेलेले होते. नावालाच आदर पण अधिकार काहीच नाहीत, असे. वाजपेयींचे पाप काय, तर जनता पार्टीनंतरच्या काळात भाजपची उभारणी करताना त्यांनी सर्वधर्मसमभावी, समाजवादी वारसा कायम ठेवला होता; त्यापायी अयोध्या चळवळीतील पक्षाच्या सहभागाला विरोधही केला होता. संघाला १९९६ मधील निवडणुकीत पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून अडवाणीच हवे होते. पण १९९५ च्या नोव्हेंबरात, मुंबईतील महाअधिवेशनात अडवाणींनीच भावी पंतप्रधान म्हणून वाजपेयींच्या नावाची घोषणा केली. तेव्हा त्या व्यासपीठाला आश्चर्याचा झटका बसला; तर संघाच्या शीर्षस्थांमध्ये नापसंतीची आठी उमटली. त्यानंतर वाजपेयींना जणू एक अढळपद मिळाले – १९९६, १९९८ आणि १९९९ या तीनही संधींच्या वेळी पंतप्रधानपद वाजपेयींकडेच आले आणि अडवाणी दुसऱ्या स्थानावर राहिले.

वाजपेयींचे व्यक्तित्व फुलवणारा, त्याला आकार देणारा दुसरा घटक म्हणजे- राजकुमारी कौल! त्यांच्याशी वाजपेयींची पहिली भेट १९४१ साली झाली. दोघेही ग्वाल्हेरच्याच महाविद्यालयात शिकत होते. दोघांत एकमेकांविषयी कोमल प्रेमभावनाही होती असा कयास ठीक असला, तरी त्या दृष्टीने पुढे काहीही झाले नाही एवढे नक्की. त्यांची पुन्हा भेट झाली ती १९५७ साली, ती निराळ्या शहरात आणि निराळ्या परिस्थितीत. वाजपेयी आता खासदार होते. संसदेचे तरुण, आश्वासक सदस्य. तर कौल आता विवाहित होत्या. त्यांचे पती तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते, वाढत्या मुलाबाळांसह सुखी संसार होता. राजकुमारी कौल, त्यांचे पती आणि मुले यांच्या या सुखी कुटुंबाचे वाजपेयी हे जणू आणखी एक घटकच झाले.

कौल दाम्पत्याची भेट होण्यापूर्वीचे वाजपेयी हे ओतप्रोत हिंदू राष्ट्रवादी होते : इंग्रजी आणि पाश्चात्त्य जीवनशैलीविषयी मनात किंतू असलेले, सुखवस्तू नसलेल्या मध्यमवर्गातील पुरुषांसारखे. हा काहीसा कर्मठपणा कमी झाला तो राजकुमारींमुळे. त्या नेहरूवादी, आधुनिक-भारतीय उदारमतवाद जोपासणाऱ्या होत्या. विद्यापीठीय वर्तुळांत त्यांचा वावर होता. पुढे बाबरी मशिदीबद्दलही राजकुमारी कौल आणि वाजपेयी यांचा एकदा दीर्घ संवाद घडला होता, हे या कुटुंबाशी चांगला परिचय असलेल्या एका अन्य भाजप नेत्याने सांगितले. आणखी एका भाजप नेत्याचे म्हणणे असे की, ‘वाजपेयींचा नूर ठीक नसेल, त्यांना काही पटत नसेल, तर रुजुवात घालण्याचे काम श्रीमती कौल सहज करीत. जणू वाजपेयींचे त्यांच्याविना चालत नसे.’ हे मात्र खरेच की, हिंदू राष्ट्रवादाच्या चौकटीतील जो उदारमतवाद वाजपेयींनी नेहमीच जोपासला, त्याबद्दल भारताने राजकुमारी कौल यांचे आभार मानण्यास हरकत नाही.

अवघ्या ३४ वर्षांचे वाजपेयी १९५७ मध्ये लोकसभेचे सदस्य झाले, तेव्हा संसदेतील त्यांच्या पक्षाचे (जनसंघ) नेतेपदही त्यांच्याचकडे सोपविण्यात आले होते. जनसंघ व पुढे भाजपचे हे संसदीय पक्षनेतेपद त्यांनी १९५७ पासून २००४ पर्यंत सांभाळले; मग ते लोकसभेत असोत वा राज्यसभेत. लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपद १९९१ ते १९९३ या काळात त्यांना नाकारले गेले, तेव्हा ‘स्वरयंत्रात खंजिराचे पाते खुपसल्यासारखे मला भासते आहे’ अशी तगमग विश्वासू सहकाऱ्यांपुढे त्यांनी मुखर केली होती. अन्य कुणाही श्रोतृवर्गाची नसेल, इतकी काळजी त्यांना संसदेत आणि तेथील सदस्यांमध्ये आपले विचार किती ऐकले जातात याविषयी होती. संसदेचे मध्यवर्ती सभागृह हाच जणू आपला देश, अशी वाजपेयींची सार्थ धारणा होती.

पक्षनेतृत्व आणि संसदपटुत्व यांचा समतोल सांभाळू लागल्यानंतरही वाजपेयींना अस्वस्थ करणारे काही प्रसंग घडत. अशावेळी त्यांच्या वैचारिक गतिशीलतेचा एक क्रम ठरलेला असे : कोणत्याही अस्वस्थकारी घटनेवर, विचारावर वा प्रस्तावावर त्यांची पहिली प्रतिक्रिया ‘उदारमतवादी’ म्हणावी, अशीच दिसून येई. परंतु पक्षांतर्गत घडामोड फारच हाताबाहेर जाणारी आहे असे दिसू लागले, की उजव्या वैचारिकतेचा आधार घेऊन ते परिस्थिती ताळ्यावर आणत. अयोध्येच्या चळवळीत विश्व हिंदू परिषद आणि रा. स्व. संघ यांनीही उतरण्यास १९८४ साली वाजपेयींचा विरोध होता. ‘संसदेत साधू वगैरे नकोत आपल्याला’ असे ते एका मित्रास म्हणाले होते. पण हीच चळवळ संघ परिवाराच्या सहभागाने वाढल्यामुळे भाजपचे भाग्य निवडणुकीत उजळणार आणि संसदेत आपल्यासारख्याचे महत्त्व कमी केले जाणार, हे उमगल्यानंतरचे वाजपेयी निराळे होते. बाबरी उद्ध्वस्तीकरणाच्या पूर्वसंध्येला लखनऊ येथील सभेत, अयोध्येतील वादग्रस्त जागेवरचे ‘नुकीले पत्थर’ त्यांना दिसू लागले होते आणि ‘जमीन को समतल करना पडम्ेगा’ हेही त्यांनी स्वीकारले होते.

वाजपेयी हे एक सहिष्णु- समन्वयवादी, दिलदार आणि काव्यशास्त्रविनोदाची जाण असणारे नेते म्हणून नेहमीच स्मरणात राहतील. भारताविषयी नेहरूंच्या उदारमतवादी संकल्पनेचा समतोल येथील हिंदू राष्ट्रवादाशी राखणारा नेता, म्हणूनही वाजपेयींचीच आठवण येईल. ते हा समतोल राखू शकले, कारण त्यांच्या व्यक्तिमत्त्वात तो जणू अंगभूतपणे भिनला होता, रुजला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 18, 2018 4:31 am

Web Title: how would it be if vinay sitapati wrote book on atul bihari vajpayee
Next Stories
1 ऑर्वेलची प्रकाशवाणी : साम्राज्यवादाने झाकोळलेली प्रतिभा
2 निर्णायक भूमिका, अनिर्णीत वाद..
3 इयन फ्लेमिंगच्या ग्रंथसंग्रहाची कथा
Just Now!
X