News Flash

ग्रंथ-बंधांची बांधणी..

बऱ्याच यातायातीनंतर ते गॅब्रिअल वेल्स या अमेरिकी माणसाला लिलावात केवळ ४०५ पौंडांना मिळाले.

‘द मास्टर अँड मार्गारीटा’चे मुखपृष्ठ:  गूढता/स्पष्टतेचा खेळ

रवीन्द्र कुलकर्णी

वाचनप्रेमी व्यक्ती ही ग्रंथप्रेमीही असावी अशी अपेक्षा चुकीची नसते. पण वाचनालयातून पुस्तके आणायची आणि काम झाले की कोरडेपणाने परत करणारे वाची लोकही बरेच असतात. वाचनसंस्कृती आणि ग्रंथसंस्कृती यांतल्या सीमारेषा अत्यंत पुसट आहेत.

दगडावर कोरणे, मातीच्या स्लेटवर लिहिणे, लाकडाच्या पाटीवर कोरणे वा भूर्जपत्रावर लिहिणे, रेशमी कापडावर काजळीने लिहिणे.. असे पुस्तकाचे स्वरूप बदलत आले आहे. कातडय़ावर बायबल लिहिले जायचे तेव्हा तर हजार पानांच्या बायबलला २५० मेंढय़ा लागायच्या! आता तर कागदाचीही साथ पुस्तके सोडू पाहताहेत.

कागदांत शब्द जसे रमले तसे ते अन्य कोणाबरोबर क्वचितच! ग्रंथातले शब्द हा ग्रंथाचा केवळ एक भाग आहे, ग्रंथात जिथे शब्द छापलेले असतात त्याला ‘टेक्स्ट ब्लॉक’ म्हणतात- जो आपण वाचत असतो. १६ च्या पटीतल्या कागदांचा एक गठ्ठा बांधला जातो, त्याला ‘सिग्नेचर’ असे म्हणतात. हे सारे सिग्नेचर्स एकत्र बांधले जातात. पुस्तक उघडल्यावर ते किती उघडले जाते त्यावरून बाइंडिंगच्या प्रकाराचा जाणकार माणसाला अंदाज येतो.

बुक बाइंडिंगच्या विश्वातली एक रंजक कथा ‘ग्रेट ओमार’ची आहे. १९०१ साली स्थापन झालेल्या ‘सँगोरस्की अ‍ॅण्ड सट्क्लिफ’ या लंडनमधल्या बुक-बाइंडिंग फर्मची ‘बुक बाइंडिंगमधील रोल्स राइस’ अशी ख्याती होती. श्रीमंत लोक त्यांना आवडलेल्या पुस्तकाचे रीबाइंडिंग त्यांच्याकडून करून घेत. त्यांनी बाइंडिंग केलेल्या पुस्तकांना आज खूप किंमत आहे. एडवर्ड फिट्जेराल्डने भाषांतर केलेल्या उमर खय्यामच्या ‘द रुबायात’ लिलावात विकण्यासाठी ‘सँगोरस्की अ‍ॅण्ड सट्क्लिफ’ने तिचे चामडय़ात बाइंडिंग केले. त्यावर सोन्याच्या नक्षीत एक हजारपेक्षा जास्त हिरे, माणके आणि पाचू जडवले होते. या बाइंडिंगला दोन वर्षे लागली होती. त्याच्या डिझाइनचे पेटंटही त्यांनी घेतले. त्याचे नाव त्यांनी ‘ग्रेट ओमार’ असे ठेवले होते. बऱ्याच यातायातीनंतर ते गॅब्रिअल वेल्स या अमेरिकी माणसाला लिलावात केवळ ४०५ पौंडांना मिळाले. अमेरिकेत ते पाठवताना त्यांनी व्यवस्थित काळजी घेऊन जहाजाने पाठवले. जहाजाचे नाव होते- ‘टायटॅनिक’! आज ते पुस्तक अटलांटिक महासागराच्या तळाशी कोठेतरी आहे आणि जगातले सर्वाना हवे असणारे पुस्तक आहे.

वाचनअधाशी असणारा माणूस कधीच पहिले पान उघडत नाही. पुस्तक मध्येच उघडतो आणि त्याचे लक्ष उजवीकडच्या पानाकडे जाते, ज्याला ‘रेक्टो’ असे म्हणतात. बहुधा तिथून मागे मागे वाचत त्याच्या विरुद्ध पानावर तो येतो, त्याला ‘व्हसरे’ असे म्हणतात. पुस्तक जुने असेल तर त्याच्या वयाचा अंदाज घेतो. शंकित मनाने ‘फ्लाय पेज’ उलटून ‘हाफ टायटल पेज’कडे तो जातो. मग त्याच्या डावीकडील- ‘व्हसरे पेज’- पानावर असलेल्या प्रकाशनाच्या माहितीकडे तो वळतो. पुढे अनुक्रमणिकेकडे नजर टाकत या पुस्तकाचे आणि आपले जमले की नाही याचा अंदाज घेऊ लागतो. पण अखेर तो अंदाजच! अनोळखी प्रदेशात शिरण्याची भीती कुणाला नसते?

मग ‘फ्रंट फ्लॅप’वरला मजकूर त्याचे लक्ष वेधतो. एकदा बराचसा विल डय़ुरांट वाचल्यावर ‘विल अ‍ॅण्ड एरियल डय़ुरांट : अ डय़ुअल ऑटोबायोग्राफी’ हे पुस्तक हातात आले. फ्रंट फ्लॅपवर लिहिले होते : ‘१९१२ साली ते एकमेकांच्या प्रेमात पडले आणि तो त्या वेळी कल्पनांच्या प्रेमात असणारा व स्वातंत्र्याच्या शोधात असणारा अनार्किस्ट स्कूलमधला शिक्षक होता आणि ती केवळ १४ वर्षांची होती. इतकी लहान, की ती रोलर स्केटिंग करत लग्नाच्या ठिकाणी आली.’ या पुस्तकाभोवतीचे सारे बंध फ्रंट फ्लॅपवर एरियलच्या ‘रोलर स्केटिंग’ने येण्याने गळून पडले! ज्याला इंग्रजीत ‘ब्रेकिंग’ म्हणतात, तसे वाक्य वा कल्पना पहिल्याच पाहण्यात दिसली नाही तरी पट्टीचा वाचक आशा सोडत नाही. तो त्या पुस्तकाला शेल्फवरच्या वाचलेल्या आणि न वाचलेल्या पुस्तकांच्या रांगेत उभे करतो.

दुकानाच्या शोकेसमधले पुस्तक आपल्याला बोलवते. त्याचे मुखपृष्ठ दिसत असते. ‘डोण्ट जज् बुक्स बाय कव्हर्स’- असा सल्ला दिला जातो; पण इतर अनेक सल्ल्यांप्रमाणे तो सर्रास दुर्लक्षिला जातो. ‘शुअरली यू आर जोकिंग मी. फेनमन!’ या अत्यंत मजेशीर पुस्तकात फेनमन या विख्यात वैज्ञानिकाने तर ‘जजिंग बुक्स बाय देअर कव्हर्स’ असे प्रकरणच लिहिले आहे. त्यात शालेय पुस्तक निवड समितीतल्या लोकांनी केवळ मुखपृष्ठ आणि आत पूर्ण कोरी पाने असलेल्या पुस्तकाला रेटिंग दिल्याचा किस्सा आहे. तो उद्वेगजनक असला तरी तितकाच पुस्तकाच्या रचनेच्या संदर्भात उद्बोधकही आहे.

मुखपृष्ठाने पुस्तकाच्या दर्जाचा अंदाज येतो का? ढिगातल्या मुखपृष्ठ फाटून गेलेल्या पुस्तकाकडे आपले लक्ष जाणे अवघड आहे. ‘लुक बॅक विथ मी’ हे शीलवती केतकरांच्या आठवणींचे पुस्तक आहे. शीलवतीबाई मूळच्या इडिथ कोहन. लंडनमध्ये जन्मलेल्या. ज्ञानकोशकार श्री. व्यं. केतकरांशी विवाह करून भारतात आल्या. केतकरांच्या नंतर त्या अनेक वर्षे होत्या. त्या अवघड दिवसांचे वर्णन त्यांच्या पुस्तकात आहे. त्या आठवणी चटका लावणाऱ्या असल्या तरी प्रस्तुत विषय तो नाही. त्याचे मुखपृष्ठ हातमागावर विणलेल्या साडीचे आहे. त्यावर जेथे ‘ब्लाइंड एम्बॉसिंग’ असते त्या ठिकाणी जरीची बुट्टी आहे आणि कडेला जरीचा काठ आहे. मुखपृष्ठाचे नाते थेट शीलवतीबाईंच्या भारतीयत्वाशी जोडले गेले आहे.

एस. नील फुजिता हा ‘द गॉडफादर’ या अत्यंत गाजलेल्या पुस्तकाचे मुखपृष्ठ बनवणारा रचनाकार म्हणतो की, ‘लेखनापेक्षा लेखकाला बाजारात किंमत असते. त्यामुळे लेखकही मुखपृष्ठावर प्रतीत झाला पाहिजे.’ अनेक मोठय़ा लेखकांचे सामान्य लेखनही बाजारात खपताना पाहून या म्हणण्याची सत्यता पटते. ‘द गॉडफादर’ हे पुस्तक आणि त्याच्या मुखपृष्ठावरचा कठपुतळ्या नियंत्रित करणारा हात व दोऱ्या यांची जोडी आणि संगतीला ‘द गॉडफादर’ ही ताकद दर्शविणारी भरीव आणि जाड अक्षरे. खाली त्याला तोलून धरणारी ‘मारिओ पुझो’ ही तेवढय़ाच जाडीची अक्षरे आणि त्या सर्वाचे रंग यांनी आतल्या मजकुराला जणू बुलेटप्रूफ जॅकेट चढवले आहे! गेली ५० वर्षे सातत्याने बाजारात असणाऱ्या ‘द मास्टर अ‍ॅण्ड मार्गारिटा’ या मिखाइल बुल्गाकोव्हच्या कादंबरीचे एक मुखपृष्ठ न विसरता येण्याजोगे होते. गूढता आणि स्पष्टता यांचे मिश्रण मुखपृष्ठावर असावे लागते.

मजकूर तोच ठेवून जॅकेट बदलले तर पुस्तक बदलते काय? या प्रश्नाचे द्यावेसे वाटणारे उत्तर ‘होय’ असे आहे. एकेकाळी वाचलेली पुस्तके त्याच मुखपृष्ठासहित मनात असतात. मुखपृष्ठावरची चित्रे आणि रंग बदलतात. आकारही बदलतात. अनोळखी वाटू लागतात. कधी जास्त आकर्षकही होतात, नव्या ‘बनगरवाडी’सारखी! हे असते छान, पण ते माझे नसते.

अनेक पुस्तकांबरोबर उभे राहिलेले पुस्तक आपला फक्त कणा दाखवत खुणावते, मुखपृष्ठासारखे बोलवत नाही. १८ व्या शतकापर्यंत पुस्तकाच्या कण्यावर काहीही नसे. त्यामुळे ते ओळखताना पुस्तकाची जाडी वा त्याच्या कण्यावर पडलेल्या खुणा यांची मदत होई. पुढील काळात कण्यावर लिहिल्याने पुस्तकांच्या भाऊगर्दीत ते ओळखणे सोपे झाले.

ग्रंथ विषयवार लावावेत का लेखकानुसार? आकाराप्रमाणे असावेत का ज्या कालखंडावर ते लिहिलेले असतात त्यानुसार लावावेत? असे रचनेचे अनेक प्रकार ग्रंथप्रेमींनी शोधले. सियाली रामामृत रंगनाथन यांचे वाचनालयातील ग्रंथरचना या विषयातले योगदान जगन्मान्य आहे.

पुस्तक विकत घेतानाच ते कुठे बसेल (खरे तर उभे राहील), याचा विचार ग्रंथसंग्राहक करत असतो. अखेर संग्रहातल्या पुस्तकांची रचना ही विचारांची रचना असते. अ‍ॅबी वॉरबर्ग या जर्मन कलाचिंतकाने ग्रंथांच्या रचनेला बरेच महत्त्व दिले आहे. एका ग्रंथातली उणीव त्याच्या बाजूचा ग्रंथ भरून काढतो, असे तो म्हणे. एखादे नाहीसे झालेले पुस्तक कण्यांच्या रांगेत प्रथम लक्षात येते. गरज नसताना ते पुस्तक हवेसे वाटू लागते. मोनालिसाचे पेन्टिंग १९११ साली चोरीला गेले ते दोन वर्षांनी मिळाले. मधल्या काळात त्या पेन्टिंगची रिकामी झालेली जागा पाहण्यासाठी जास्त गर्दी होई. तसे आपलेही लक्ष या रिकाम्या झालेल्या जागेकडे सारखे जाते.

मलपृष्ठावर बऱ्याचदा पुस्तकाबद्दल कोणी काय म्हटले आहे ते असते. जाणकार वाचक निसटतीच नजर त्यावर टाकतो. क्वचितच तिथे पुस्तकावर प्रभावी भाषेत भाष्य केलेले असते. वॉल्टर मेहरिंग याच्या ‘द लॉस्ट लायब्ररी’ या पुस्तकाच्या मलपृष्ठावर म्हटले आहे : ‘हे पुस्तक म्हणजे एका संस्कृतीचे आत्मचरित्र आहे.’ हे वाचल्यावर कोणता शहाणा वाचक जवळच लिहिलेल्या किमतीकडे दुर्लक्ष करणार नाही?

kravindrar@gmial.com

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 21, 2018 3:21 am

Web Title: ravindra kulkarni article on occasion of world book day
Next Stories
1 फसवे पुस्तक, फसवा लेख
2 वादावर पडदा!
3 ऑर्वेलची प्रकाशवाणी : कलावंत की प्रचारक?
Just Now!
X