10 July 2020

News Flash

तीन पिढय़ा आणि दोन मार्ग

पुस्तकात उद्धव आणि राज यांच्या राजकीय प्रवेशाबद्दलच्या घडामोडीही विस्तारानं आल्या आहेत.

प्रसाद हावळे prasad.havale@expressindia.com

प्रबोधनकार ठाकरेंच्या प्रेरणेतून उभे राहिलेल्या प्रादेशिकतावादी बहुजनकेंद्री हिंदुत्वाच्या राजकारणाचा अवलंब करायचा की त्याच्या अल्याड-पल्याडच राहायचे, याचा निर्णय घ्यावाच लागेल अशा स्थितीला पोहोचलेल्या तिसऱ्या पिढीचा मागोवा..

शिवसेना -आणि मुख्य म्हणजे तिचं धुरीण घराणं – यांबद्दलचं औत्सुक्य सुरुवातीपासूनचंच. ते जसं मराठीजनांत आहे, तसंच अमराठी भारतीयांमध्येही आहे. तेवढंच, किंबहुना त्याहून अधिक भारतीय राजकारणाचा अभ्यास करणाऱ्या अकादमिक वर्तुळातही आहे. शिवसेनेचा उदय आणि तिच्या उत्स्फूर्त समाजकारणानं मुंबई महानगरावर घेतलेली पकड, सुरुवातीच्या काळातला कडवा कम्युनिस्ट विरोध, मराठी अस्मितेचं राजकारण, पुढे कट्टर हिंदुत्ववाद अंगिकारणं आणि या साऱ्याच्या वरताण बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाचा करिश्मा.. या साऱ्यानं ही संघटना सत्तेच्या राजकारणात आपले पाय घट्ट रोवून उभी राहिली. कुठलीही ठोस विचारसरणी वा आर्थिक कार्यक्रम नसताना ही संघटना इतकं बळ आपल्या बाहुत निर्माण तरी कसं करू शकली, हा जसा तिच्या राजकीय विरोधकांना/ स्पर्धकांना पडणारा प्रश्न आहे, तसाच तो राजकीय अभ्यासकांसमोरचाही प्रश्न आहे. सत्तरच्या दशकातच शिवसेनेविषयीच्या चर्चेला अकादमिक वर्तुळात वाट मोकळी करून देणाऱ्या मेरी कॅट्झेन्स्टाइन असोत वा दिपंकर गुप्ता, गेरार्ड ह्य़ुज, ज्युलिया एकर्ट, जयंत लेले ते सुधा गोगटे, चित्रा देशपांडे, सुजाता आनंदन, वैभव पुरंदरे (किंवा मराठीत प्रकाश अकोलकर, मनोहर जोशी, विजय ढवळे, योगेंद्र ठाकूर आदी अनेक); यातल्या प्रत्येक अभ्यासकानं शिवसेनेच्या उदयाचा आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वशैलीचा मागोवा घेतला आहे. काहीसं वर्तमानपत्री, काही अकादमीक शिस्तीतलं, तर काही पूर्णत: गंभीर सैद्धान्तिक असं हे लेखन शिवसेनेबद्दल जाणून घेण्यासाठी आजवर संदर्भसाधन ठरलं.

त्यात गतवर्षी आणखी एका पुस्तकाची भर पडली. ‘द कझिन्स ठाकरे : उद्धव, राज अ‍ॅण्ड द श्ॉडो ऑफ देअर सेनाज्’ हे ते पुस्तक. गतवर्षी प्रसिद्ध झालेलं आणि राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतरच्या सत्तानाटय़ादरम्यान अधिक चर्चिलं गेलेलं हे पुस्तक शिवसेनेविषयीचं औत्सुक्य शमविण्याचा प्रयत्न करतं, हे त्याचं बलस्थान आहेच. परंतु तेच आणि तेवढंच त्याचं प्रयोजन नाही. मौखिक-लिखित साधनांतून लावलेला घडत्या इतिहासाचा अन्वयार्थ असं त्याचं वर्णन करणं अधिक उचित ठरेल. हा अन्वयार्थ लावताना लेखकानं ठाकरे घराण्याच्या तीन पिढय़ांची वाटचाल शब्दबद्ध केली आहे.

पुस्तकाचं पहिलं प्रकरण आहे ते ठाकरे घराण्याच्या इतिहासाविषयी. या प्रकरणात प्रबोधनकार ठाकरे यांच्याविषयी विस्तारानं वाचायला मिळतं. प्रबोधनकारांच्या बंडखोर स्वभावाचे आणि बहुप्रतिभाशाली व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू उलगडत लेखक या प्रकरणात महाराष्ट्रातील जातीय ताणेबाणे, ब्राह्मणेतर चळवळ आदींचे संदर्भ देत जातात. ‘देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे’ ही पुस्तिका लिहिणारे प्रबोधनकार कर्मकांड आणि मूर्तीपूजेच्या विरोधात होते. पण गणेशोत्सवातील ब्राह्मणांच्या वर्चस्वाविरोधात बंडखोरी म्हणून सार्वजनिक नवरात्रोत्सव साजरा करण्याची कल्पना निघाली तेव्हा याच प्रबोधनकारांनी पुढाकार घेतला. यात त्यांना साथ मिळाली होती ती रावबहादुर सी. के. बोले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची. या मंडळींनी ‘लोकहितवादी संघ’ स्थापन करून हा उत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला देवीची जी प्रतिमा पूजली गेली, तिचं रेखाटन खुद्द प्रबोधनकारांनीच केलं होतं. त्या प्रतिमेत झेप घेणारा एक वाघही त्यांनी चितारला होता, जो पुढे शिवसेनेचं बोधचिन्ह झाला! ख्रिश्चन आणि मुस्लीम धर्मप्रसारकांना प्रतिकार म्हणून प्रबोधनकारांनी त्यांचे एक सहकारी गजाननराव वैद्य यांना घेऊन ‘हिंदूू मिशनरी सोसायटी’ स्थापन केली होती. लोकमान्य टिळकांच्या एका जाहीर सभेत लोकमान्यांच्या ब्राह्मणवादी भूमिकेचा निषेध म्हणून प्रबोधनकारांनी त्यांच्या दिशेने अंडी भिरकावली होती, अशी आठवण शाहीर साबळे यांनी सांगितली आहे. माथेफिरू नथुराम गोडसेच्या ‘अग्रणी’मध्येही प्रबोधनकारांनी काही लेख लिहिले, मात्र स्वत:च्या अटींवर! महात्मा गांधींच्या खुनानंतर दादरमधील ब्राह्मणांवर हल्ला करू पाहणाऱ्या क्षुब्ध जमावाला प्रबोधनकारांनीच सामोरं जाऊन शांत केलं होतं. असे काही प्रसंग या प्रकरणात विखुरलेले आहेत. ते वाचून, प्रबोधनकारांच्या भूमिकेत काहींना अंतर्विरोध वाटू शकतो. त्यात काहीसं तथ्य असलं, तरी ‘बहुजनकेंद्री हिंदुत्वा’ची संकल्पना समजून घेतली की याचा उलगडा होतो. बहुजनांना प्रतिष्ठा आणि समानता देणारी हिंदू संस्कृती आणि तिचा प्रादेशिक आविष्कार असं काहीसं या बहुजनकेंद्री हिंदुत्वाचं स्वरूप आहे.

त्याचं प्रतिबिंब प्रबोधनकारांच्या ‘प्रबोधन’मध्ये पडलेलं दिसतं. पुस्तकात याबद्दलची दोन उदाहरणं येतात. एक म्हणजे ‘प्रबोधन’मधून हुंडा प्रथेविरुद्ध उठवलेला आवाज. आणि दुसरं म्हणजे, मुंबईत कमी पगारात काम करणाऱ्या दाक्षिणात्य तरुणांमुळे स्थानिकांच्या पगाराची रक्कम घसरल्याबद्दल प्रबोधनकारांनी लेखांतून व्यक्त केलेली अस्वस्थता. प्रबोधनकारांच्या या अशा विचारांतच शिवसेनेच्या आग्रही भूमिकांची बिजे आहेत, असं लेखक दाखवून देतो. याशिवाय, वक्तृत्वकलेविषयीचं मराठीतलं पहिलं पुस्तक लिहिणारे प्रबोधनकार सोप्या, जनसामान्यांना समजेल अशा भाषावापराबद्दल आग्रही होते, हेही पुस्तकात अधोरेखित केलं आहे. ‘ठाकरी’ भाषा म्हणून जिचा उल्लेख केला जातो, तिची घडण त्यातूनच झाली असावी! तिचे बाळकडू प्रबोधनकारांनी आपले पुत्र बाळ आणि श्रीकांत यांना दिलं.

प्रबोधनकारांचे थोरले पुत्र बाळ अर्थात बाळासाहेब ठाकरे यांनी ‘फ्री प्रेस’ची नोकरी सोडून १९६० मध्ये ‘मार्मिक’ या व्यंगचित्र साप्ताहिकाची सुरुवात केली. साप्ताहिकाचं हे नाव प्रबोधनकारांनीच सुचवलं होतं. ‘उपजिविकेसाठी पैसे मिळविण्यासाठी सुरू करत आहोत,’ असे नमूद करत सुरू झालेल्या या साप्ताहिकाला बघता बघता चळवळीचं स्वरूप आलं आणि त्यातूनच शिवसेना या संघटनेचा जन्म झाला. हा इतिहास पुस्तकात थोडक्यात येतो. त्याच्या पुढल्या प्रकरणात ठाकरे घराण्याची धाकटी पाती अर्थात श्रीकांत ठाकरे यांच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख लेखक वाचकांना करून देतात. अव्वल दर्जाचे संगीतकार आणि छायाचित्रणकलेची आवड असणारे श्रीकांत ठाकरे शांत स्वभावाचे होते; तसेच सत्तेच्या राजकारणापासून कटाक्षानं अलिप्त राहून त्यांनी स्पष्टवक्तपणा आणि तत्त्वनिष्ठता जपली होती, हे सांगणाऱ्या काही आठवणी पुस्तकात आहेत.

यानंतर पुस्तकभर वर्चस्व आहे ते ठाकरे घराण्याच्या तिसऱ्या पिढीचं, अर्थात उद्धव आणि राज ठाकरे यांचं. हे दोघं सख्खे चुलतभाऊ, तसेच सख्खे मावसभाऊदेखील आहेत. या दोघांच्या बालपणाविषयीच्या त्यांच्या सुहृदांनी सांगितलेल्या आठवणी पुस्तकात वाचायला मिळतात. उद्धव हे शांत, लाजाळू व आज्ञाधारक मूल होते, तर राज हे एकदमच धीट आणि खोडकर, अशी व्यक्तिवैशिष्टय़े या आठवणींतून पुढे येतात. हे दोघंही मुंबईच्या जे. जे. उपयोजित कलासंस्थेत शिकले. पण उद्धव यांनी पदवी शिक्षण पूर्ण केलं, तर राज यांनी पाच वर्षांचा अभ्यासक्रम चौथ्या वर्षी सोडून दिला. दोघांनीही उमेदीच्या काळात जाहिरात संस्था सुरू केल्या. उद्धव यांनी ‘चौरंग’ या नावानं, तर राज यांनी ‘चाणक्य’ या नावानं. त्या अनुभवाच्या आधारे दोघांनी शिवसेनेची निवडणूक प्रचारपद्धत आखण्याचाही प्रयत्न केला. पुस्तकात याविषयीची काही उदाहरणं येतात. उदाहरणार्थ, १९९० च्या विधानसभेच्या निवडणुकीत प्रचारासाठी व्हिडिओ रथ वापरण्याची युगत आली होती. तेव्हा उद्धव यांनी त्यासाठी शिवसेनेची भूमिका मांडणाऱ्या  दृकश्राव्यफिती तयार केल्या होत्या. १९९५ च्या निवडणुकीसाठीही या नव्या माध्यमाचा खुबीनं उपयोग करून घ्यावा, असं बाळासाहेब ठाकरेंना वाटत होतं. उद्धव यांनी या निवडणुकीत ‘आव्हान आणि आवाहन’ या शीर्षकाची एक दृकश्राव्यफित तयार केली होती. त्यात पक्षाची भूमिका आणि विकासाच्या योजनांची माहिती दिली होती. तर राज यांनी ‘शिवसेना टॉप टेन’ या शीर्षकाची एक गीतमाला तयार केली होती. त्यात प्रसिद्ध हिंदी गाण्यांच्या चालीवर बेतलेली राजकीय उपहास करणारी  गाणी होती.

पुस्तकात उद्धव आणि राज यांच्या राजकीय प्रवेशाबद्दलच्या घडामोडीही विस्तारानं आल्या आहेत. त्यावेळचे या दोघांचे सहकारी, पत्रकार आदींनी मांडलेली निरीक्षणं पुस्तकात ओघानं येतात. राज यांना १९८८ साली भारतीय विद्यार्थी सेनेचे प्रमुख करण्यात आले. आधी भाषण करण्यास कचरणाऱ्या राज यांनी नंतर मात्र आपल्या प्रभावी वक्तृत्वानं तरुणांना भुरळ पाडण्यास सुरुवात केली. १९९० साली त्यांनी शिक्षणशुल्क निश्चितीबाबतचा मोर्चा काढला होता. विद्यार्थी संघटनांच्या राजकारणातही त्यांनी भाविसेचा चांगला जम बसवला.  तर त्याच वर्षी उद्धव यांनी मुंबईतील मुलुंडमधल्या झोपडपट्टीमध्ये नळ पाणीपुरवठा योजनेचं उद्घाटन करून आपल्या सार्वजनिक कार्याचा ओनामा केला. या काळातल्या या दोघांच्या वाटचालीबद्दल उद्धृत केलेली मते काहीशी अशी आहेत- ‘नव्वदच्या दशकारंभी उद्धव यांची प्रतिमा लाजाळू आणि राजकीय डावपेचांत रस नसलेलं व्यक्तिमत्त्व अशी होती. ते शांत आणि मृदुभाषी होते, परंतु त्यांना विनोदाची चांगली जाण होती. त्यामुळे ते लोकांच्या नजरेत भरू लागले.’.. ‘राज यांच्या फटकळपणामुळे आणि त्यांच्या वाढत्या प्रभावामुळे पक्षातले जुने नेते अस्वस्थ होऊ लागले. त्यामुळे त्यांनी राज यांना पर्याय म्हणून उद्धव यांना पुढे करायला सुरुवात केली.’

यानंतरच्या काळात शिवसेनेत झालेल्या अनेक उलथापालथी- जसे की, छगन भुजबळ यांचे पक्षांतर, सेना-भाजप युती सत्तेत येणं, मुख्यमंत्री बदल, उद्धव यांची कार्याध्यक्ष म्हणून नेमणूक, नारायण राणेंची हकालपट्टी, राज यांनी शिवसेना सोडणं आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना करणं असा घटनाक्रम पुस्तकात विस्तारानं येतो. या साऱ्या घटनाक्रमाला समांतर आहे ते उद्धव आणि राज या दोघा बंधूंमधील राजकीय द्वंद्व. या दोघांच्या स्वभावांतील ठळक भिन्नतेमुळेच त्यांच्या नेतृत्वशैलीतही फरक आहे; तो कसा, याचे अनेक मासले पुस्तकात मिळतात.

हे पुस्तक प्रसिद्ध झाल्यानंतर, या दोघांच्या राजकीय वाटचालीचा सांधा बदलला आहे. उद्धव यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससह आघाडी करून मुख्यमंत्रीपदाची धुरा स्वीकारली आहे. हिंदुत्ववादी शिवसेनेला पुरोगामी तोंडवळा देण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो. तर राज यांनी अलीकडेच हिंदुत्ववादाचा मार्ग जवळ केला आहे. पण हे दोन्ही मार्ग प्रबोधकारांनी आखून दिलेल्या प्रादेशिकतावादी बहुजनकेंद्री हिंदुत्वाच्या अल्याड-पल्याडचे आहेत, हेच या पुस्तकाच्या वाचनाअंती जाणवतं.

द कझिन्स ठाकरे : उद्धव, राज अ‍ॅण्ड द शॅडो ऑफ देअर सेनाज्

लेखक :  धवल कुलकर्णी

प्रकाशक :  पेंग्विन

पृष्ठे: ३०४, किंमत : ३९९ रुपये

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 22, 2020 2:06 am

Web Title: the cousins thackeray uddhav raj and the shadow of their senas book review zws 70
Next Stories
1 बुकबातमी : उल्लेखाने मारणे!
2 ‘फक्त मोदीच’ कसे काय?
3 एका चळवळीचं चारित्र्य.. 
Just Now!
X