मुक्तिसंग्राम समारोहातील अनुपस्थितीबाबत एमआयएमचे खासदार जलील यांचे स्पष्टीकरण

औरंगाबाद : हैदराबाद संस्थान मुक्त झाले तेव्हा कासीम रझवीनी आमच्या बापजाद्यांना पाकिस्तानात यायचे का, असे विचारले होते. पण आम्ही नाही म्हणालो. भारत हीच आमची भूमी आहे, असे त्यांना सांगितले होते. त्यामुळे त्यांचा वैचारिक वारसा पुढे चालविण्याचे काहीएक कारण नाही. औरंगाबादच्या विकासाच्या कामात व्यस्त होतो. त्यामुळे येता आले नाही. पण पुढच्या वर्षी हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनाच्या मुख्य ध्वजारोहण समारोहास उपस्थित राहू, असे खासदार इम्तियाज जलील यांनी गुरुवारी पत्रकार बैठकीत सांगितले.

माझ्या न येण्याचा नाहक डांगोरा पिटला जातो. जे लोक ध्वजारोहण सोहळ्यात येतात त्यांनी मुक्त झालेल्या मराठवाडय़ाच्या विकासासाठी काय केले? हा देश आमचाही आहे. पण याच ध्वजारोहण सोहळ्यास अनुपस्थित असणाऱ्या खासदार प्रताप पाटील चिखलीकर व पालकमंत्री गुलाबराव पाटील, शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील यांना कोणी त्यांच्या अनुपस्थितीविषयी विचारत नाही. माझ्याकडून ध्वजारोहणाच्या कार्यक्रमास न येण्याची चूक झाली, पण १६ आणि १७ सप्टेंबरला पक्षाच्या बैठका होत्या. आचारसंहिता लागेल अशी शक्यता असल्याने उमेदवारांच्या मुलाखती मुंबईत सुरू होत्या. पण त्याचा बाऊ केला गेला. औरंगाबाद ते शिर्डी या खराब झालेल्या रस्त्यासाठी निधी मंजूर करावा म्हणून विनंती करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रधान सचिवांना भेटलो. पाणचक्कीजवळील दरवाजा दुरुस्त व्हावा म्हणून निधी मिळवला. मात्र, विकासासाठी काही काम न करता केवळ ध्वजारोहणासाठी एक दिवस हजेरी लावून देशभक्ती दाखविणाऱ्यांनी काय केले, असा सवाल जलील यांनी उपस्थित केला. पुढील वर्षी या कार्यक्रमाला हजर राहणार आहे. खरेतर ऑपरेशन पोलोमध्ये मुस्लिमांवर अन्याय झाल्याचे आपल्याला ठाऊक आहे, पण तो इतिहासाचा भाग आहे. त्यात आम्ही पडू इच्छित नाही, या शब्दांत खासदार जलील यांनी पुढील वर्षी ध्वजारोहणास येणार असल्याचे सांगितले.

वंचित बहुजनबाबत आघाडीची आशा कायम

वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याविषयी आदर आहे. त्यांनी आताही एमआयएमचे अध्यक्ष असदोद्दीन ओवेसी यांना दूरध्वनी करून पुन्हा एकदा आघाडीच्या बोलणीविषयी चर्चा करायची आहे, असे म्हटल्यास आम्ही तयार आहोत. ही आघाडी व्हावी अशी अजूनही इच्छा आहे. शेवटपर्यंत या दोन पक्षातील आघाडी तुटली असे मानता येणार नाही. कारण राजकारण शेवटच्या क्षणापर्यंत संपत नाही. अजूनही आघाडी होऊ शकते, असे इम्तियाज जलील म्हणाले. केवळ आठ जागांचा प्रस्ताव मान्य नाही, असे पूर्वी लेखी स्वरूपात कळवताना ओवेसी यांची परवानगी घेतली होती. मात्र, एवढय़ा कमी जागांवर बोलणी होऊ शकणार नाही. असे का घडले याचे विश्लेषण करताना अ‍ॅड. आंबेडकर यांना कोणी जाणीवपूर्वक चुकीची माहिती देत आहे का? आणि त्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित व्यक्ती आहेत का, अशी शंका पूर्वी उपस्थित केली होती. पण आजही आंबेडकरांविषयी आदरच असल्याचे खासदार जलील म्हणाले.

आयुक्त महापौरांच्या हातचे बाहुले 

शहरातील सेंट्रल नाका भागात टाकलेला कचरा येत्या दहा दिवसांत उचलला नाही तर दहाव्या दिवशी येथे कचरा टाकू दिला जाणार नाही, असे सांगत खासदार इम्तियाज जलील यांनी आज महापालिका आयुक्त  डॉ. निपुण विनायक यांच्या कारभारावर टीका केली.

महापालिका आयुक्त  जाणीवपूर्वक माहिती दडवून ठेवतात, कारण ते महापौरांच्या हातचे बाहुले झाले आहेत, असा आरोप करत खासदार इम्तियाज जलील यांनी त्यांच्या विरोधात कारवाई करावी, अशी विनंती नगरविकास सचिवांकडे केली आहे. महापालिकेतील कंत्राटी कामगारांची संख्या, त्यांना मिळणारे वेतन आणि त्याची एजन्सी याबाबत तीन महिन्यांपूर्वी लेखी मागणी केल्यानंतरही माहिती गोळा केल्यानंतर दिली जाईल, असे खासदार जलील यांना कळविण्यात आले. स्मरणपत्र देऊनही कारवाई होत नसल्याने आयुक्त डॉ. निपुण विनायक महापौरांचे बाहुले बनले आहेत, असा आरोप त्यांनी पत्रकार बैठकीत केला.   तीन महिन्यांपूर्वी लेखी पत्र पाठविल्यानंतर माहिती उपलब्ध झाल्यास अवगत करण्यात येईल, असे खासदार जलील यांना कळविण्यात आले. या प्रकरणात मोठा अपहार झाला असल्याचा अंदाज असल्याचे ते म्हणाले. अनेक गरीब कर्मचारी वेतन मिळत नसल्याची तक्रार घेऊन येतात म्हणून या विषयीची माहिती मागितली. त्याचबरोबर नेहरू भवनच्या विस्ताराचा प्रस्तावही आयुक्तांनी पुढे पाठवला नाही. कचऱ्याच्या प्रश्नी ते कमालीचे दुर्लक्ष करत आहे.

महापौर कार्यालयातून पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय कोणतीही कागदपत्रे बाहेर दिली जाऊ नयेत, असे पत्र महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिले असून त्यामुळे महापालिकेतील एमआयएमच्या विरोधी पक्षनेत्यास अधिकारी माहिती देत नाहीत. तरीही महापालिकेतील काही अपहाराची प्रकरणे एमआयएमच्या हाती लागल्याचा दावा खासदार जलील यांनी केला आहे.