औरंगाबादमध्ये भाऊ आणि बहिणीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. मंगळवारी रात्रीच्या सुमारास दोघांची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणाचा औरंगाबाद पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

औरंगाबादमध्ये बहिण आणि भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. किरण खंदाडे (१८) आणि सौरभ खंदाडे अशी मृतांची नावं आहेत. मंगळवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास त्यांचे आई-वडिल परतल्यानंतर ही घटना उघडकीस आली होती. औरंगाबाद शहरातील सातारा परिसरातील एमआयटीसमोरील एका बंगल्यात लालचंद खंदाडे हे कुटुंब भाड्याने राहते. मात्र, काही कामानिमित्त लालचंद आपल्या पत्नी व एका मुलीला घेऊन जालना येथे गेले होते. त्यामुळे घरात त्यांची मोठी मुलगी किरण आणि तिचा भाऊ सौरभ हे दोघेच होते.

ही घटना उघडकीस आल्यानंतर औरंगाबाद शहरात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर तपास सुरू केला होता. अखेर या हत्येचे गुढ उलगडण्यात पोलिसांना यश आलं आहे. चुलत भाऊ सतीश काडूराम खंदाडे (वय २०) आणि त्याचा मेव्हणा अर्जून पूनमचंद राजपूत (वय २५) यांनी ही हत्या केल्याचं समोर आलं आहे. सोनं आणि पैसे चोरण्याच्या उद्देशानं त्यांनी हे कृत्य केल्याचं चौकशीतून समोर आलं आहे.

बाथरूममध्ये सापडले होते दोघांचे मृतदेह

रात्री ८ च्या सुमारास लालचंद हे घरी परतले. वाहनाचा हॉर्न वाजवूनही त्यांना घरातून प्रतिसाद मिळला नाही. त्यामुळे त्यांनी वाहन उभे करून घरात बघितले. घरात शोध घेतल्यानंतर बाथरूममध्ये बहीण-भावाचे मृतदेह त्यांना दिसले. त्यानंतर त्यांनी आरडाओरडा करण्यास सुरूवात केली. आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि घटना उघडकीस आली होती.