News Flash

रिक्षाचालकांकडून होणारी लूट थांबणार

तीनपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांवर कडक कारवाई होणार आहे.

(संग्रहित छायाचित्र)

मीटरच्या पहिल्या टप्प्यास १२ रुपये, पुढे प्रतिकिलोमीटर आठ रुपये भाडे

जिल्ह्यातील उस्मानाबाद व तुळजापूर या दोन शहरांमध्ये रिक्षाचालकांकडून मीटर रीडिंगप्रमाणे प्रवासभाडे न घेताच होणारी लूट आता थांबणार आहे. उपप्रादेशिक परिवहन विभागाने रिक्षाचालकांना मीटरनुसार प्रवासभाडे आकारण्याचे आदेश दिले असून, मीटरच्या पहिल्या टप्प्यास १२ रुपये व त्यापुढे प्रतिकिलोमीटर आठ रुपये प्रवासभाडे निश्चित करण्यात आले आहे. तीनपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांवर कडक कारवाई होणार आहे.

उस्मानाबाद शहरातून पाच मार्गावर व तुळजापूर शहरात चार मार्गावर जास्तीतजास्त प्रवासी प्रवास करताना नेहमी दिसतात. त्यामुळे या मार्गावर ‘शेअर ऑटो’ करिता परवानगी देण्यात आली आहे. तसेच १ नोव्हेंबर २०१४ पासूनचे ऑटोरिक्षा परवाने नियम ७५ प्रमाणे शुल्क स्वीकारून नूतनीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ३१ ऑक्टोबर २०१४ रोजी अखेर नूतनीकरण न केलेल्या सर्व ऑॅटोरिक्षाचे परवाने शासन निर्णयानुसार रद्द करून परवान्यातील वाहनाची नोंदणी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशाप्रकारचा जुन्या रिक्षा सार्वजनिक ठिकाणी चालवताना आढळल्यास तो स्कॅ्रप करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी ऑटोरिक्षा मीटर कॅलिबरेशनकरिता पुणे, सोलापूर व लातूर येथे जावे लागत होते. आता शासकीय तंत्रनिकेतन व मेकॅनिकल व इलेक्ट्रॉनिक शाखा असलेली जिल्ह्यातील सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्रे ही मीटर कॅलिबरेशन करणारी संस्था असणार आहे.

जानेवारी २०१६ पासून उस्मानाबाद नगरपरिषदेस ‘अ’ वर्ग दर्जा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश व शासन निर्णयाप्रमाणे शहरातील सर्व रिक्षा महाराष्ट्र मोटार वाहन नियम १९८९च्या नियम १४०नुसार विहित चाचणी पार पाडलेल्या मुंबई परिवहन आयुक्त यांनी मान्यता दिलेल्या उत्पादकांचे डिजिटल इलेक्ट्रॉनिक भाडेमीटर सक्तीचे करण्यात आले आहे. जिल्ह्यात परवानाधारक रिक्षांना भाडेमीटर बसवलेले नसल्यास पहिल्या गुन्ह्याकरिता १५ ते ३० दिवस परवाना निलंबन किंवा तीन हजार सहमत शुल्क, दुसऱ्या गुन्ह्याकरिता ३० ते ४५ दिवसांकरिता परवाना निलंबन किंवा ४ हजार ५०० सहमत शुल्क व तिसऱ्या गुन्ह्याकरिता ६० दिवस निलंबन किंवा परवाना रद्द कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

ऑटोरिक्षा चालकांसाठी सूचना

वाहनांची सर्व कागदपत्रे सोबत ठेवावीत, वाहनांची पीयूसी सोबत ठेवावी, वाहतुकीचे नियम पाळावेत, प्रवाशांशी सौजन्याने वागावे, मर्यादेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक करू नये, वाहनचालकाने विहित गणवेश घालावा, कोणत्याही प्रवाशाचे भाडे नाकारू नये, प्रवाशासाठी टेरिफकार्ड दर्शनी भागावर लावावेत, टेरिफप्रमाणे भाडे आकारणी करावी, रात्री १२ ते सकाळी ५ दिडपट भाडे आकारावे, १४ किलोमीटपर्यंतच्या डागास भाडे आकारू नये, १४ किलोमीटरच्या नंतर प्रत्येक डागास एक रुपयाप्रमाणे, जास्तीतजास्त ४० किलो लगेज परवानगी, चालकाने ओळखपत्र लावणे बंधनकारक आहे.

उस्मानाबादकरिता बसस्टँड ते िशगोली सíकट हाऊस, बसस्टँड ते उमरे चौक, बसस्टँड ते गोरोबाकाका नगर, बसस्टँड ते तेरणा चौक व बसस्टँड ते रेल्वेस्टेशन. तुळजापूरकरिता मार्ग पुढीलप्रमाणे – तुळजाभवानी मंदिर प्रवेश बंदीच्या ठिकाणापर्यंत, बसस्टँड ते नरिमन पॉइंट नळदुर्ग रोड, बसस्टँड ते भारत पेट्रोल पंप लातूर रोड, बसस्टँड ते छत्रपतीनगर व बसस्टँड ते घाटशिळा रोड या प्रमुख रिक्षा मार्गावर भाडेमीटर अनिवार्य असणार आहे.

ग्रामीण भाग ते शहरापर्यंत खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या काळय़ा-पिवळय़ा जीपला सहा प्रवासी वाहतुकीचा परवाना आहे. परंतु आसनक्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक केल्यास पहिल्या गुन्ह्याकरिता ७ ते ३० दिवस परवाना निलंबन. दुसऱ्या गुन्ह्याकरिता ३० ते ६० दिवस परवाना निलंबन. तिसऱ्या गुन्ह्याकरिता ६० दिवस निलंबन किंवा परवाना रद्द व चौथ्या गुन्ह्याकरिता कायमस्वरूपी परवाना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व नागरिकांनी रिक्षामधून प्रवास करताना भाडेमीटर असल्याची खात्री करावी व प्राधिकरणाने ठरवलेल्या भाडेदरापेक्षा जादा भाडे मागणी केल्यास सदर रिक्षा क्रमांक, दिनांक, वेळ व ठिकाण इत्यादीची माहिती आरटीओ कार्यालयास साध्या पोस्टकार्डने कळवावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन विभागाचे उपप्रादेशिक अधिकारी विलास कांबळे यांनी केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 13, 2016 1:16 am

Web Title: auto rickshaw meter issue solved in osmanabad
Next Stories
1 सिद्धार्थ उद्यानातील रेणू बिबटय़ाची दोन्ही पिल्ले दगावली
2 ‘सनातन’ वर बंदी घालण्याची काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची मागणी
3 ‘कोपर्डी’च्या तपासाबाबत ग्रामस्थांचा पोलीसांवर आरोप
Just Now!
X