बिबटय़ाच्या तीन बछडय़ांच्या मृत्यू प्रकरणात प्राणिसंग्रहालयाचे संचालक तथा मुख्य पशुसंवर्धन अधिकारी बी. एस नाईकवाडे यांना निलंबित करण्याचे आदेश आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी सोमवारी दिले. त्यांचा पदभार अतिरिक्त आयुक्त रमेश पवार यांच्याकडे देण्यात आला आहे. दरम्यान, महापौर त्र्यंबक तुपे यांनी प्राणिसंग्रहालयातील सुविधांमध्ये तातडीने सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना आयुक्तांना पत्रान्वये दिल्या आहेत.
प्राणिसंग्रहालयात सांबरांची अवस्था दयनीय आहे. नीलगायींना त्वचारोग झाला आहे. मगर व बगळे यांना पुरेसे पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी होत्या. याकडे नाईकवाडे यांनी दुर्लक्ष केल्याचा ठपकाही ठेवण्यात आला. हेमलकसा येथून औरंगाबादला आणलेल्या बिबटय़ाच्या जोडीची नीट काळजी घेण्यात आली नाही. परिणामी, रेणू नावाची बिबटय़ाची मादी आजारी पडली. ती गरोदर होती, यावरूनही नाईकवाडे यांनी विसंगत माहिती दिल्याची नोंद घेत त्यांना निलंबित करून त्यांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश बजावण्यात आले. सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी नाईकवाडे यांना निलंबित करण्याची सूचना प्रशासनास केली होती.
दरम्यान, महापौर तुपे यांनी प्राण्यांना दिलेल्या खाद्यान्न पदार्थाची गुणवत्ता राखावी, असे सांगत प्राणिसंग्रहालयाची भिंत दुरुस्ती व िपजऱ्याची दुरुस्ती करण्याबाबत आयुक्तांनी लक्ष घालावे, अशी सूचना केली. प्राणिसंग्रहालयातील मादी हत्तीला जोडीदार नसल्याने ती अनेकदा िहसक होते. त्यामुळे जोडीदार आणावा अन्यथा मादी हत्तीला अन्य प्राणिसंग्रहालयात हलवण्याची कारवाई करावी, असेही महापौरांनी सांगितले आहे.