वऱ्हाडी मंत्र्यांच्या सरबराईत शासकीय लगबग

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या मुलाच्या विवाहानिमित्त औरंगाबादमध्ये दाखल झालेल्या मंत्रिमंडळातील बहुतांश सदस्यांनी शासकीय बैठकांचा जोर लावला होता. सकाळच्या सत्रात सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी रस्त्यांच्या प्रश्नावर बैठक घेतली. सहकारमंत्री सुभाष देशमुख, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी वेगवेगळ्या ठिकाणी बैठका घेतल्या. तसे बैठकांचे सत्र बुधवारपासूनच सुरू झाले होते. वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्पापूर्वीची वार्षिक आराखडय़ाची विभागीय बैठक घेतली. त्यामुळे वऱ्हाडी मंत्र्यांच्या आढाव्यात शासकीय यंत्रणेची लगबग सुरू होती.

शहरातील जबिंदा लॉन्सवर प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा मुलगा आमदार संतोष दानवे यांच्या विवाहासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील आले होते. त्यांनीही एका जाहीर कार्यक्रमाला हजेरी लावली. प्रशासकीय मंजुरी मिळाल्यानंतर ज्या इमारतीच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे आणि ज्याचे बांधकाम १५ टक्के पूर्ण झाल्याचा अहवाल सरकारी यंत्रणेकडे आहे, त्याचे व पोलीस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांच्या इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले. यासाठी पोलीस महासंचालकांसह दोन गृहराज्यमंत्र्यांची उपस्थिती होती. नंतर ही सगळी मंडळी विवाहस्थळी गेली.

महसूल आयुक्तालयाने ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांचा दौरा शासकीय केला. बचत गटांच्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री असा कार्यक्रम जिल्हा परिषदेच्या मैदानावर होता. राजकुमार बडोले यांनी सामाजिक न्याय भवनातील बैठक रद्द करून ती देवगिरी महाविद्यालय परिसरात घेतली. काही मंत्री कालपासून मुक्कामी होती. काही जणांनी विशेष बैठका लावल्या. त्यामुळे मराठवाडय़ातील प्रश्नांची सोडवणूक करणाऱ्या या जोर बैठका दिवसभर सुरू होत्या.

मंत्री येणार म्हणून काही विभागात पुष्पगुच्छांची रेलचेल होती. रूम फ्रेशनर मारले जात होते. कार्यालय देखील तुलनेने चकाचक होती. दुसरीकडे जिंबंदा लॉन्सकडे जाणारे रस्ते पोलिसांनी अडवले होते. सर्वसामान्यांसाठीची वाहतूक वळविण्याचा आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी बुधवारी रात्री काढला होता. राज्यातील मंत्र्यांनी बैठकांचा जोर लावला होता. केंद्रातील मंत्र्यांनीही विवाहस्थळी हजेरी लावली.