येते दोन दिवस सत्ताधारी मंडळीसाठी धामधुमीचे असतील. कारण मराठवाडय़ातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून शिवसेना व भाजपच्या वतीने सामूहिक विवाह सोहळ्यांचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेनेकडून २४४, तर भाजपच्या वतीने ५०० जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
शिवसेनेच्या वतीने उद्या (शनिवारी) २४४ जोडप्यांच्या सामुदायिक विवाहसोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. १२ वाजून ४५ मिनिटांनी होणाऱ्या या कार्यक्रमास राज्यपाल विद्यासागर राव व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची उपस्थिती असेल. रेल्वे स्टेशन रस्त्यावरील अयोध्यानगरी मदानावर हा सोहळा होणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेकडून सामुदायिक विवाहसोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे. पालकमंत्री रामदास कदम या उपक्रमाचे मार्गदर्शक व खासदार चंद्रकांत खैरे संयोजक आहेत. केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते, परिवहनमंत्री दिवाकर रावते, खासदार रामकुमार धुत, संपर्क नेते विनोद घोसाळकर, महापौर त्र्यंबक तुपे यांची या वेळी उपस्थिती असणार आहे. ४२ बौद्ध, ८ मुस्लिम व १९५ िहदू जोडप्यांच्या विवाहसोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. नवरदेवाला सफारी, नवरीसाठी नाचऱ्या मोराची पठणीपासून ते संसारोपयोगी साहित्यही नवविवाहित जोडप्यास दिले जाणार आहे. घरातील लग्न असल्यासारखे वातावरण असून शिवसेनेकडून मराठवाडय़ातील हा दुसरा विवाहसोहळा शनिवारी होणार आहे.
भाजपनेही जालन्यात सामुदायिक विवाहसोहळ्याची तयारी काही दिवसांपासून सुरू केली होती. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे व पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी ५०० जोडप्यांचा विवाहसोहळा आयोजित करण्याची जबाबदारी घेतली. रविवारी (दि. १७) होणाऱ्या या सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे येत्या दोन दिवसांत मराठवाडय़ात सामूहिक विवाहसोहळ्याची लगबग असणार आहे. राज्यपाल आणि मुख्यमंत्री लागोपाठ दोन दिवस मराठवाडय़ाच्या दौऱ्यावर असल्याने प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे.