करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचं समोर आल्यानंतर आता औरंगाबादबरोबरच आता जालना जिल्ह्यातही शाळा-महाविद्यालयांसह आठवडी बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भातील आदेश काढले असून, ३१ मार्चपर्यंत शैक्षणिक संस्था बंद राहणार आहेत.

राज्यातील अनेक शहरांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. पुणे, मुंबई, सातारासह विदर्भातील अनेक जिल्ह्यात करोनानं डोकं वर काढलं आहे. मराठवाड्यातही करोनाचा उद्रेक होण्याची चिन्हं दिसत आहे. औरंगाबाद शहरात गेल्या काही दिवसांपासून रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. तर जालना जिल्ह्यातही रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे.

करोनाच्या प्रसार नियंत्रित करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी शाळा-महाविद्यालयांसह बाजारपेठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक देशमुख यांनी याबाबत माहिती दिली. करोनामुळे निर्माण परिस्थितीमुळे जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालये, कोचिंग क्लासेस आणि आठवडी बाजार ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत. त्याचबरोबर फळे व भाजीपाला विक्रेते, न्यूजपेपर वेंडर्स यांच्या वेगाने अॅंटीजेन चाचण्या करण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत, अशी माहिती देशमुख यांनी दिली.

औरंगाबाद शहरात १४ मार्चपर्यंत नाईट कर्फ्यू..

औरंगाबाद शहरातही करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचं आकडेवारीतून समोर आल्यानंतर शहरात नाईट कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू असणार आहे. १४ मार्चपर्यंत शहरात नाईट कर्फ्यू असणार आहे. या काळात जीवनावश्यक वस्तू, उद्योग व कर्मचारी यांना बाहेर पडण्यास मूभा देण्यात आलेली आहे.