निवडणुकीच्या हंगामात सर्वसामान्यांना हैराण करणारे अनेक प्रसंग घडत असतात. उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज झाल्याने पक्ष सोडणाऱ्यांच्या बातम्या देशातील कानाकोपऱ्यातून येताना दिसत आहेत. मात्र, पक्षाने तिकीट न दिल्याने पक्ष कार्यालयातील खुर्च्याच घेऊन जाण्याचा प्रकार औरंगाबादमध्ये पाहायला मिळाला आहे. काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांनी मंगळवारी पक्ष कार्यालयातील ३०० खुर्च्या नेल्या. माझ्या मालकीच्या खुर्च्या होत्या, आता मला त्याची गरज आहे, म्हणून मी त्या नेल्या अशी प्रतिक्रिया सत्तार यांनी माध्यमांना दिली. आता काँग्रेसच्या कार्यालयात बसण्यासाठी खुर्च्याच उपलब्ध नाहीत. सत्तार यांच्या या कृतीमुळे काँग्रेसच्या नेत्यांना डोक्यावर हात मारुन घेण्याची वेळ आली आहे.

तिकीट न मिळाल्यामुळे अब्दुल सत्तार यांनी पक्षाचा राजीनामाच दिला आहे. विशेष म्हणजे काँग्रेसवर दबाव आणण्यासाठी चक्क मध्यरात्री सत्तार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचेच पक्षश्रेष्ठ ऐकून घेत नसतील तर आमच्यासारख्यांचे काय, असे म्हणत त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला होता.

काँग्रेसने औरंगाबामध्ये ‘गांधी भवन’ या आपल्या कार्यालयात राष्ट्रवादीबरोबर आघाडीची बैठक बोलावली होती. बैठकीच्या काही वेळ आधी सत्तार हे आपल्या समर्थकांसह तिथे आले आणि त्यांनी कार्यालयातील सर्व खुर्च्या ताब्यात घेतल्या. खुर्च्या नसल्याने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची बैठकी राष्ट्रवादीच्या कार्यालयात झाली.

सत्तार हे औरंगाबाद जिल्ह्यातील प्रभावशाली नेते आहेत. त्यांना औरंगाबाद मतदारसंघातून उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती. पण पक्षाने या मतदारसंघातून विधान परिषद सदस्य सुभाष झांबड यांना तिकीट देण्यात आले. यामुळे सत्तार नाराज झाले.

हो खुर्च्या माझ्या होत्या. काँग्रेसच्या बैठकांसाठी मी त्या दिल्या होत्या. आता मी पक्ष सोडला आहे आणि त्यामुळे येथील खुर्च्याही परत घेतल्या आहेत. ज्यांना उमदेवारी मिळाली. त्यांनी याची व्यवस्था करावी, असे सत्तार यांनी माध्यमांना सांगितले.

उमेदवार झांबड यांनी हे किरकोळ प्रकरण असल्याचे म्हटले आहे. सत्तार यांना आवश्यकता असल्याने त्यांनी खुर्च्या नेल्या आहेत. त्यामुळे आम्ही नाराज नाहीत. सत्तार अजून काँग्रेसमध्येच आहेत. त्यांचा राजीनामा स्वीकारलेला नाही, असे झांबड यांनी म्हटले आहे.