News Flash

लातूरमध्ये भाजप आणि प्रस्थापित नेत्यांची कसोटी!

संभाजी निलंगेकर-पाटील यांची प्रतिष्ठा पणाला

चार पालिकांसाठी १४ डिसेंबरला मतदान; संभाजी निलंगेकर-पाटील यांची प्रतिष्ठा पणाला

पहिल्या टप्प्यात राज्यात अन्यत्र भाजपला यश मिळाले असले तरी मराठवाडय़ात पक्षाला फटका बसला. या पाश्र्वभूमीवर लातूर जिल्ह्य़ात होणाऱ्या चार नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये भाजप व पालकमंत्री संभाजी निलंगेकर-पाटील यांची कसोटी लागली आहे. दुसरीकडे प्रस्थापित नेते आपापल्या भागांमध्ये वर्चस्व कायम राखण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. घराणेशाहीची किनार लाभलेल्या या चारही पालिकांमध्ये नेते आणि नात्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

नगर परिषदेच्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीत लातूर जिल्हय़ातील औसा, निलंगा, अहमदपूर व उदगीर नगरपालिकांसाठी १४ डिसेंबरला मतदान होणार आहे. चार पालिकांमध्ये नगराध्यक्षपदासाठी ३८ जण तर नगरसेवकांच्या एकूण १०१ जागांसाठी ५०१ जण िरगणात आहेत.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना, एमआयएम यांसह काही ठिकाणी अपक्ष तर काही ठिकाणी स्थानिक आघाडीचे उमेदवार निवडणुकीच्या मदानात आहेत. औसा नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एन. बी. शेख यांनी आपल्या मुलाला पुन्हा नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरवले आहे. पुत्रासाठी पित्याची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. ११ वष्रे औसा पालिकेचे नगराध्यक्षपद भूषविलेल्या अ‍ॅड. मुजिबुद्दीन पटेल यांनी आपल्या मुलीच्या मुलाला नगराध्यक्षपदासाठी उभे केले असून नातवासाठी आजोबाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

निलंगा नगर परिषदेत गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे अशोक पाटील-निलंगेकर (काका) व भाजपचे संभाजी पाटील-निलंगेकर (पुतण्या) असा सामना रंगला होता. त्यात काकावर पुतण्याने मात केली व सध्या राज्याच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून संभाजी यांची वर्णी लागली. नगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसने गोिवद िशगाडे (काका) तर भाजपने पुतण्याला निवडणुकीच्या िरगणात उतरविले आहे. पुन्हा एकदा काका-पुतण्याची लढाई होत असल्यामुळे पुतण्या काकावर विजय मिळविणार की काका पुतण्याला चीतपट करणार याकडे राजकीय क्षेत्रातील मंडळींचे लक्ष लागले आहे.

अहमदपुरात अपक्ष आमदार विनायक पाटील यांनी आपली सत्ता पालिकेत अबाधित राहावी यासाठी प्रयत्न सुरू केला आहे तर माजी आमदार बाबासाहेब पाटील यांनी पालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्याची तयारी सुरू केली आहे. भाजपचे प्रदेश प्रवक्तेगणेश हाके यांनी इतकी वष्रे पालिकेचे सर्वानी वाटोळे केले आहे. आता भाजपला संधी द्या, अशी साद घालीत भाजपला वातावरण अनुकूल करण्याचा प्रयत्न केला आहे. उदगीर नगरपालिकेत सलग आठ वेळा नगराध्यक्ष राहिलेले काँग्रेसचे राजेश्वर निटुरे पुन्हा आपले नशीब अजमावत आहेत. त्यांना माजी आमदार चंद्रशेखर भोसले यांची साथ आहे. त्यांच्या विरोधात भाजपचे सात वेळा नगरसेवक राहिलेले बसवराज बागबंदे पूर्ण ताकदीनिशी िरगणात आहेत. भाजपचे आमदार सुधाकर भालेराव यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे.

शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी सर्वात प्रथम चारही पालिकेत नगराध्यक्षपदाचे उमेदवार घोषित केले. जिल्हय़ात सेनेची शक्ती बेताची असली तरी कार्यकर्त्यांच्या पाठीशी ते उभे आहेत. खासदार संजय राऊत आणि शिवसेनेचे अन्य नेते प्रचाराला येणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसने मुस्लीम मतदारांची संख्या लक्षात घेऊन चारही पालिकांमध्ये नगराध्यक्षपदासाठी मुस्लीम मतदार उभे केले आहेत. नवाब मलिक यांच्या प्रचारसभा पहिल्या टप्प्यात झाल्या. काँग्रेसतर्फे उदगीरात आमदार अमित देशमुख यांनी प्रचाराचा शुभारंभ केला. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या अहमदपूर, औसा व निलंगा येथे प्रचारसभा सभा पार पडल्या. मराठवाडय़ातील जनतेने भाजपला नाकारले आहे. हाच कल लातूर जिल्ह्य़ातही कायम राहील, असा विश्वास व्यक्त केला.

एमआयएमच्या कामगिरीकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. पहिल्या टप्प्यात मराठवाडय़ात एमआयएमने मुस्लीमबहुल भागात बऱ्यापैकी मुसंडी मारली. बीडच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत एमआयएमला मिळालेली मते लक्षणीय आहेत. लातूर जिल्ह्य़ातील चारही पालिकांमध्ये मुस्लीम मतदारांची संख्या लक्षात घेऊन एमआयएमने प्रचाराची राळ उठविली आहे. ओवेसी यांची सभाही झाली. एमआयएमने मुस्लीम मतांवर डल्ला मारल्यास काँग्रेससाठी ते आव्हान असेल.

निलंगेकर सावध

प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर या मराठवाडय़ातील भाजपच्या पहिल्या फळीतील नेत्यांच्या मतदारसंघांमध्ये भाजपला पराभवाचा फटका बसला. यामुळेच स्वत:च्या निलंगासह चारही पालिकांच्या निवडणुकीत पालकमंत्री संभाजी निलंगेकर-पाटील यांनी बारीक लक्ष घातले आहे. मराठवाडय़ाचा कौल विरोधात गेल्याने निलंगेकर सावध झाले आहेत. जिल्हय़ातील एकाही पालिकेत सध्या भाजपची सत्ता नाही. नगरसेवकांची संख्याही मर्यादितच आहे. गतवेळच्या तुलनेत भाजपचे संख्याबळ वाढले व किमान काही पालिकेत नगराध्यक्ष निवडून आले तर संभाजी पाटील यांचे कौतुक होईल अन्यथा त्यांची पुन्हा एकदा कोंडी होणार आहे. सर्व विरोधी पक्ष संभाजी पाटील यांची कोंडी व्हावी अशी व्यूहरचना आखत आहेत तर विरोधकांची व्यूहरचना फोल ठरेल यासाठी भाजपची मंडळी आक्रमकपणे प्रचारात आहेत. भाजपच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उदगीर आणि औसा येथे रविवारी प्रचारसभा होणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 9, 2016 1:41 am

Web Title: devendra fadnavis sambhaji patil nilangekar
Next Stories
1 सोने आयातीवरील बंदीच काळेधन साठेबाजांना धडा ठरेल – प्रा. अजित अभ्यंकर
2 घाटीमध्ये कपडे धुण्याच्या कामावरही ताणच
3 ‘डीएमआयसी’तील भूखंड वाटपास गती
Just Now!
X