20 January 2021

News Flash

सीमेलगतच्या भागांतील म्हणी आणि शब्दांचा कोश

केवळ शब्द नाही तर या भागातील म्हणींनादेखील एक वेगळाच बाज आहे.

सुहास सरदेशमुख, लोकसत्ता

औरंगाबाद : कर्नाटक सीमेलगत असणाऱ्या भाषेतील म्हणी आणि शब्दांचा कोश तयार करण्याची किमया एका अवलियाने साधली असून, त्यांच्या या संशोधनाला स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने मान्यता दिली आहे.

सीमालगत कानडी प्रांताला लागून असणाऱ्या भाषेतील शब्दांचा कोश आणि अभ्यास कवी-लेखक बालाजी इंगळे यांनी अलीकडेच पूर्ण केला. केवळ शब्द नाही तर या भागातील म्हणींनादेखील एक वेगळाच बाज आहे. ‘लयं काकलूत करुलालता त्यानं’ अर्थ काय तर फार विनवणी करत होता. ‘लई खळीला येऊ नको’ ही अशीच म्हण. अंगचटी येऊन किंवा लाळघोटेपणा करून काम साध्य करून घेणाऱ्यांसाठी असे शब्द वापरणारा मोठा प्रांत कर्नाटकाशी जोडलेला आहे. भाषेचा हा लेहजा उमरगा, उदगीर, अहमदपूर या भागात अधिक दिसतो. सीमेलगत असणाऱ्या या भाषेचा शब्दकोश आणि त्याचा भाषिक अभ्यास करण्यात बालाजी इंगळे यांना यश मिळाले असून त्यांनी केलेला हा अभ्यास स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात सादर केल्यानंतर त्याला मान्यता देण्यात आली आहे.

महाराष्ट्र आणि कर्नाटक भागातील मराठीत झालेले बदल अभ्यासताना कोणते बदल जाणवले याबाबत विचारले असता बालाजी इंगळे म्हणाले, ‘कामाचा कुच्चर आणि गिळायला हजर’, अशी म्हण सहजपणे या भागात वापरली जाते. तसेच अनेक शब्दांचा स्वरलोप होतो. भाषचे हे सुलभीकरण वेगळ्याच प्रकारचे. ‘करत-असतील’ हे दोन शब्द पण या भागात ‘करतालसतील’ असा केला जातो. अनेकदा व्यंजनलोपही होतो. मराठीतील ‘व’ या वर्णाक्षराऐवजी ‘य’ असा शब्द वापरला जातो. वेळ असा शब्द म्हणताना येळ असा उच्चार होतो. विचारला सहजपणे इचार म्हणून जातो या भागातील माणूस. वेळेशी जोडलेला आणखी एक शब्द म्हणजे वाडुळ. लई वाडुळ झालो वाट बघत हातो, हा वाडुळ शब्द फक्त याच भागातला.

भाषेतील अशा गमतीचा प्रयोग बालाजी इंगळे यांनी ‘झिम्म पोरी झिम्म’ या कादंबरीत केला आहे. सर्वसाधारणपणे क्रियापदांना लाव आणि लय प्रत्ययही लावला जातो. उदा. जातो या शब्दला जातावं किंवा जाऊलालाव, असे म्हटले जाते. ‘व्हगाडी’ म्हणजे येडपट अशा अर्थाने वापरले जाणारे विशेषण. इपीत्तर हा शब्द खोडसाळ व्यक्तीसाठी वापरला जातो. गुपचूप केल्या जाणाऱ्या गोष्टींना खबळींग म्हटले जाते अशा अनेक शब्दांचा कोश केल्यानंतर त्याचा भाषाअभ्यास बालाजी इंगळे यांनी नुकताच पूर्ण केला आहे.

दस्तावेज.. : या नव्या अभ्यासामुळे सीमालगत भागातील शब्दांचा अभ्यास होईल तसेच या भागातील सांस्कृतिक जीवनाचा दस्तावेज म्हणून त्याचा उपयोग होऊ शकतो. भाषेच्या विविध पैलूंचा असा अभ्यास करणे ही गरज असल्याचे सांगण्यात येते पण सीमाभागातील शब्दसंपत्तीचा भाषाशास्त्राच्या अंगाने झालेला अलीकडच्या काळातील पहिलाच अभ्यास असल्याचे भाषातज्ज्ञांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 28, 2020 3:37 am

Web Title: dictionary of phrases and word use by people living in karnataka border area zws 70
Next Stories
1 ब्रिटनहून दाखल महिलेचा करोना अहवाल सकारात्मक
2 टाळेबंदीतील रिकाम्या वेळात पतंग निर्मितीची कला उपयोगात
3 औरंगाबाद की संभाजीनगर?
Just Now!
X