सुहास सरदेशमुख

करोना काळात मृत्यूच्या सावटाखाली असणाऱ्यांची भीती दररोज वाढते आहे. स्मशानशांततेत साधा हुंदका ऐकू येत नसल्याने स्मशानजोगीही घाबरले आहेत. त्यांची भीती वाढते आहे, कारण दररोज मृत्यूचा आकडा वाढतो आहे. तर दुसरीकडे करोना भीतीला आरोग्य विभागातील कर्मचारी सरावले आहेत. औरंगाबाद शहरातील करोना मृत्यू झालेल्या व्यक्तींचा आकडा आता ३६२ एवढा झाला आहे.

पावसाळ्याच्या दिवसात चितेवरील लाकडांनी पेट घेण्यासाठी डिझेलचे डब्बे भरून ठेवलेले. चितेसाठी लागणारी लाकडे एका बाजूला. किती वजनाच्या मृत व्यक्तीला किती लाकडे, याची सारे गणित पाठ असणारे लक्ष्मण गायकवाड तीन मुलांसह स्मशानभूमीत गेली अनेक वर्षे राहतात. त्यांचा संसारही येथेच फुलला. ढणढणत पेटणारी चिता पाहिली की एखादा अस्फुट हुंदका, श्रद्धांजलीपोटी केली जाणारी भाषणे, असे सारे काही ऐकण्याचा त्यांना सराव होता. पण गेली चार महिने नीरव शांततेत स्मशानात साधा हुंदकाही ऐकायला मिळत नाही. कारण मृत व्यक्तीशी संबंधित एखादाच व्यक्ती अंत्यसंस्काराच्या वेळी हजर असतो.

करोनामुळे मृत्यू झालेला एकदा मृतदेह आला की, त्याची प्रवेशद्वारासमोर नोंदणी गायकवाड किंवा त्यांचा मुलगा करतो. स्वसंरक्षणार्थ प्लास्टिक कपडे(पीपीई) घालणारी माणसे येतात, चिता पेटवतात. तुलनेने या चार महिन्यांत दिवसाला चार-पाच चिता पेटताना बघणारे गायकवाड सांगतात, ‘पूर्वी भीती तशी कधी वाटली नाही. मृतदेह बघून ती सरावली होती. पण आता ती वाटते. मृतदेह जळाली की महापालिकेची गाडी लगेच यावी आणि फवारणी व्हावी असे वाटते.’ भय इथले संपत नाही, अशी सारी स्थिती. ज्यांच्या घरी मृत्यू झाला आहे, त्यांनाही विषाणूचे भय मोठेच.

एका बाजूला मृत्यूबरोबर राहणाऱ्याचे भय वाढते आहे, तर दुसरीकडे अनेक जणांची भीती सरावते आहे. औरंगाबाद शहरात चाचण्यांचा वेग वाढला आणि दररोज ३५० पर्यंत रुग्णसंख्या वाढली. चार महिन्यांच्या कालावधीमध्ये मृत्यूचा आकडाही ३६२ पर्यंत गेला. पण रोज करोना रुग्णांवर उपचार करणाऱ्यांच्या मनातील भय मात्र हळूहळू कमी होत जात आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉ. प्रदीप कुलकर्णी सांगत होते, ‘आता करोना रुग्णांचा आकडा वाढल्याचे फारसे भय वाटत नाही. कोणत्या प्रकारच्या रुग्णास कसे उपचार करायचे हे ठरले आहे. हात स्वच्छ धुण्याची पूर्वीची सवय अधिक सतर्कतेने करू लागलो आहोत. आता जो जगण्याचा एक भाग बनला आहे. परिणामी पूर्वीची भीती जराशी सरावल्यासारखी झाली आहे. काळजी कशी घ्यायची याचे भान ज्यांना आले त्यांना करोना लागण होत नाही, हे कळाले आहे परिणामी या रोगाची पूर्वी जेवढी भीती वाटत होती ती कमी झाली आहे.’

दररोज मृत्यूसमवेत राहूनही प्रतापनगर स्मशानजोगी म्हणून काम करणारे गायकवाड सांगत होते, ‘मृत्यू दारात येणार हे माहीत आहे. स्मशानातच राहतो आम्ही. पण रुग्णवाहिकेतून मृतदेह पाहिला की घाबरायला होते.’ स्मशानातच आयुष्य गेले लक्ष्मणचे. वडीलही अंत्यसंस्काराच्या कामातच होते. त्यांचे मूळ गाव नांदेड जिल्ह्य़ातील. औरंगाबादमध्ये वडील आले. कैलाशनगर स्मशानभूमीमध्ये राहिले. एखाद्यावर अंत्यसंकार केल्यानंतर झालेल्या मदतीवर संसार चालायचा त्यांचा. लक्ष्मणही आता तेच काम करतात. मृतदेह आला की लाकूडफाटा विकतात. महापालिकेने कंत्राटी पद्धतीने त्यांना नऊ हजार रुपये वेतन द्यायचे ठरविले आहे. दोन-तीन महिन्यांतून ती रक्कम मिळते. त्यातून चरितार्थ चालविणारे लक्ष्मण गायकवाड सांगत होते, ‘पूर्वी लाकूडफाटा विक्री केल्यावर पैसे मिळायचे. आता एकच नातेवाईक येतो. त्याच्याकडून सरणाचे पैसे मागायचे म्हणजेही भीतीच. एवढे घारबणे आयुष्यात कधी नव्हते. पण जगालाच भीती आहे या रोगाची, आम्हालाच जास्तच असणार.’ दररोज सरणावरचा माणूस संपला की जबाबदारी संपली असे वाटायचे, पण आता राखेचेही भीती वाटते.

दर ४८ तासांनी सोडिअम हायपोक्लोराइडच्या द्राव्याने निर्जंतुकीकरण केले जाते. पण स्मशानातील जगणे आता अधिक जोखमीचे झाले आहे. मुलाबाळांसह राहणाऱ्या या कुटुंबानेही घराबाहेर पडायचे नाही, असे ठरविले आहे. जेथे थेट मृत्यूचा संबंध असतो तिथे भीती दिसून येते. बाकी सर्वत्र भीतीचा भाग सरावल्यासारखी स्थिती आहे.

स्मशानजोगी समाजाच्या अडचणी दूर व्हाव्यात

महापालिकेकडून मोफत अंत्यसंस्कार व्हावेत म्हणून प्रयत्न करताना या समाजाकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे लक्षात आणून दिले होते. कोविड काळात ते जिवावर उदार होऊन राहतात. प्रत्यक्ष कोविड रुग्णाच्या अंत्यसंस्कारात त्यांचा सहभाग नसला तरी शहरातील स्मशानभूमीच्या रक्षणासाठी आणि तेथील एकूण स्वच्छतेसाठी काम करणाऱ्या अनेक जण स्मशानभूमीमध्ये राहतात. यांच्या आरोग्याकडेही महापालिकेने लक्ष द्यायला हवे, असे मत संजय जोशी यांनी व्यक्त केले. उपमहापौर असताना त्यांनी या क्षेत्रातील व्यक्तींसाठी विशेष काम उभे केले होते. या समाजातील विवाहसोहळ्यासही ते हजेरी लावतात. कोविड काळात निर्जंतुकीकरणासाठी काही वेळा उशीर होत आहे. तसे होऊ नये अशी अपेक्षा महापालिका प्रशासनाकडून आहे.