बिपीन देशपांडे

करोनाच्या प्रादुर्भावाने सलग दुसºया वर्षात लग्नगाठ जमवण्यासाठी आयोजित उपवधू-वरांचे मेळावे घेता येण्यासारखी परिस्थिती राहिली नाही. परिणामी लग्नासाठी नोंदणी केलेल्या तरुण-तरुणींची वये तीन-तीन वर्षांनी वाढली. त्यांच्यापैकी अनेकांच्या नोकºया गेलेल्या आहेत, तर कोणाच्या वेतनाची घडी विस्कटली आहे. अनेकांना अर्ध्या पगारावरही काम करावे लागत आहे. त्यामुळे लग्नासाठी  होकार मिळालेले विवाहही मोडण्याच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहेत. उपवर-वधूंसाठी नोंदणी संस्था चालवणारे वधू-वर सूचक मंडळेही अडचणीत सापडल्याने विवाहसंस्थेवर चालणारे अर्थकारणही ठप्प झाले आहे.

राज्यात प्रत्यक्ष भेटी-गाठी घडवून आणणारी पाच हजारांवर वधू-वर सूचक मंडळे काही ज्येष्ठांकडून चालवली जातात. सर्वच जातीतील मंडळांची ही संख्या आहे. शंभर-दोनशेंच्या आकड्यात ऑनलाइन पद्धतीने तरुणांकडून चालवण्यात येणारी मंडळे आहेत. ज्येष्ठांच्या माध्यमातील अथवा ऑनलाइन पद्धतीने चालवण्यात येणाऱ्या प्रत्येक वधू-वर सूचक मंडळाकडे  किमान ५०० ते २ हजारांवर प्रत्येकी मुला-मुलींच्या स्थळांची नोंदणी असते. वधू-वर सूचक मंडळ चालवणाऱ्या संघटनेचे माजी राज्याध्यक्ष तथा औरंगाबाद येथील एका मंडळाचे संचालक शंतनु चौधरी यांनी करोनामुळे आलेल्या संकटाचे परिणाम सांगितले. करोना दाखल होण्यापूर्वी वधू-वर सूचक मेळावा घेण्यात आला होता. अशा मेळाव्यांची उपवर-वधू, त्यांच्या पालकांसाठी आत्यंतिक गरज असते. मेळाव्या निमित्ताने तरुण-तरुणींच्या प्रत्यक्ष भेटी होतात. पालकांनाही मुला-मुलींना पाहता येते. लग्न जुळवून आणण्यासाठी ही महत्त्वाची एक प्रक्रिया आहे. मात्र, करोनामुळे सारे ठप्प झाले आहे. तिशीतील तरुण-तरुणी थेट आता तेहतिसाव्या वर्षांतच पोहोचत आहे. ३२ वर्षांची असताना नोंदणी केलेला तरुण आता पस्तिशीत जाईल. लग्न जुळवण्यासाठी वयाचा फार मोठा अडथळा निर्माण होत असतो. सध्या आपल्याकडे तरुण-तरुणींची मिळून प्रत्येकी दीड हजारांवर स्थळे नोंदणी झालेली असून त्यांच्यापैकी अनेकांच्या नोक ऱ्या गेलेल्या आहेत, तर कोणाचे पॅकेज अर्धे झाल्याने जुळण्याच्या स्थितीतील लग्नेही मोडण्याच्या विचारापर्यंत आली असल्याचे चौधरी यांनी सांगितले. जिथे महिन्याला २५ ते ३० तर वर्षाला २५० ते ३०० लग्न जुळवून येत होती ती संख्या वर्षाला शंभरच्या आसपासच आलेली आहे. मंडळांचेही अर्थकारण गडगडल्याने त्यावर आधारित कर्मचारी वर्गही कमी करावा लागला. इतरही अनेक घटक मंडळांवर आधारित आहेत. त्यांनाही कामं नाहीत. अनेक संचालकांनी मंडळेही बंद केली आहेत, असे चौधरी यांनी सांगितले.

* वाजंत्रीवाल्यांना आता काम उरले नाही. तसेच नवरदेवाची घोड्यावरून मिरवणूक निघत नाही. मंगल कार्यालये आता कोविड काळजी केंद्रात रूपांतरित करण्यात आली आहेत.

* या व्यवसायातील हातावर पोट असणाऱ्या अनेकांनी भाजीचा व्यवसाय निवडला आहे. दुसऱ्या लाटेचा प्रसार विवाह समारंभामुळेच अधिक होतो असे दिसून आल्याने हा व्यवसाय पुन्हा बहरणे नजिकच्या काळात शक्य नाही. त्यामुळे अनेकांनी व्यवसाय बलण्यास सुरुवात केली आहे. ल्लग्रामीण भागात विवाहामधील श्रीमंती दर्शविण्याचे स्तोम कमी झाले आहे. मोठ्या संख्येच्या विवाह समारंभावर खर्च करण्याऐवजी सोने खरेदीवर भर दिला जात आहे. ओळखीच्या सोनाराकडून सोने खरेदीचे व्यवहार होतात. पण लग्न जमविण्याचे प्रमाणच मुळात कमी झाले आहे.