करोना विषाणूमुळे आजार असणाऱ्या व्यक्तींच्या मृत्यूचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येत असले, तरी मागील १५ दिवसांत कोणत्याही आजाराविना करोनाबाधित झाल्यामुळे निर्माण झालेल्या गुंतागुंतीतून मृत्यू वाढले आहेत. शुक्रवारी अशा तीन व्यक्तींचा मृत्यू औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात नोंदविण्यात आला. दरम्यान, काही खासगी रुग्णालये बाधितांची आर्थिक लूट करत असल्याचे लक्षात आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी लाइफलाइन या रुग्णालयास नोटिस बजावली आहे. जिल्ह्य़ात आज एकूण बळींची संख्या ६१७ एवढी आहे.

मयूरनगर, हर्षनगर आणि चौधरी कॉलनी या औरंगाबाद शहरातील एक महिला आणि दोन पुरुषांचे मृत्यू केवळ करोनामुळे झाला. त्यांना अन्य कोणतेही आजार नव्हते. ४० वर्षांपासून ते ६० वर्षांपर्यंतच्या व्यक्तींचे हे मृत्यू वैद्यकीय अधिकाऱ्यांसमोरही आव्हान बनले आहे. शहरातील चिकलठाणा भागातील ७५ वर्षांच्या महिलेचाही मृत्यू झाला. दरम्यान, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ७४.८० टक्क्य़ांवर गेले आहे, तर औरंगाबाद जिल्ह्य़ाचा मृत्युदर ३.०५ टक्के एवढा झाला आहे. हिंगोली जिल्ह्य़ाचा मृत्युदर सर्वात कमी म्हणजे १.१४ एवढा आहे. परभणी जिल्ह्य़ाचा मृत्युदर सर्वाधिक म्हणजे ४.९७ एवढा आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही परभणीत जिल्ह्य़ात सर्वात कमी म्हणजे ४१.९४ टक्के एवढेच आहे. गेल्या काही दिवसांपासून चाचण्यांचा वेग कमी झाला असल्यामुळेही मृत्यूचे प्रमाण वाढते राहिले आहे. प्रतिजन चाचण्यांमुळे आता तातडीने अहवाल मिळतात. त्यामुळे निदान लवकरच होऊ शकते. पण निदान झाल्यानंतर उपचार करणाऱ्या खासगी रुग्णालयांमधून रुग्णांची आर्थिक पिळवणूक होत असल्याचे निदर्शनास आले आहे. लाइफलाइन रुग्णालयाची देयके तपासणाऱ्या लेखापरीक्षकांनी केलेल्या तपासणीनंतर त्यांना नोटिस देण्यात आली असून त्यांच्याकडून येणाऱ्या खुलाशानंतर काय आणि कोणत्या स्वरूपाची कारवाई करायची याचे निर्णय घेतले जातील, असे अतिरिक्त जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे यांनी सांगितले.

जालना जिल्ह्य़ात करोनाबाधितांची संख्या चार हजारांच्या घरात

शुक्रवारी दुपापर्यंत जालना जिल्ह्य़ातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या ३ हजार ९६१ झाली. जिल्ह्य़ात घेण्यात आलेल्या एकूण २८ हजार ३२५ चाचण्यांमध्ये करोनाबाधित रुग्णांचे प्रमाण १३.९८ टक्के आहे. जिल्ह्य़ात घेण्यात आलेल्या एकूण १६ हजार २४३ आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये तीन हजार २७३ म्हणजे २०.१५ टक्के नमुन्यांचा अहवाल करोनाबाधित आला, तर आतापर्यंत १२ हजार ८२ प्रतिजन चाचण्या घेण्यात आल्या. त्यापैकी ६८८ म्हणजे ५.२८ टक्के  नमुने करोनाबाधित आढळून आले. जिल्ह्य़ात आतापर्यंत करोनामुळे ११३ रुग्ण मृत्युमुखी पडले आहेत. करोनाबाधित रुग्णांच्या सहवास आणि संपर्कातील ४४ हजारांपेक्षा अधिक व्यक्तींचा शोध आतापर्यंत जिल्ह्य़ातील आरोग्य यंत्रणेने घेतला आहे. सध्या संस्थाचालक अलगीकरणात ४००पेक्षा अधिक व्यक्ती आहेत. दोन हजार ५६१ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

मनपा आयुक्त विलगीकरणात

औरंगाबाद महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी पुन्हा एकदा स्वतला विलगीकरणात ठेवले आहे. आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांच्या निवासस्थानात काम करणाऱ्या तीन व्यक्तींचा करोनाचा चाचणी अहवाल सकारात्मक आलेला आहे. यातील एक व्यक्ती हा जेवण तयार करणारा आहे. यापूर्वीही काही जणांना करोना झालेला होता. मनपा आयुक्त हे पत्नी तथा औरंगाबाद ग्रामीण पोलीसच्या अधीक्षक मोक्षदा पाटील यांचे पती असून त्यांच्याच रयत या शासकीय निवासस्थानी मनपा आयुक्त पाण्डेय हे राहतात. मात्र, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्याबाबत विचारणा केली असता त्यांच्याबाबतची माहिती पोलीस मुख्यालयाकडून स्पष्ट करण्यात आली नव्हती. मनपा आयुक्त पाण्डेय यांनी दररोजच्या कामकाजात अनेकवेळा करोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यात येणाऱ्या सेंटरला भेटी दिलेल्या आहेत.

लातूरमध्ये करोनाचे १२४ रुग्ण

लातूर जिल्ह्य़ात गुरुवारी नव्याने १२४ करोनाबाधितांची भर पडली आहे. त्यामुळे एकूण करोनाबाधितांचा आकडा ५ हजार ८७९ वर पोहोचला आहे. आजपर्यंत उपचार घेऊन घरी परतलेल्यांची संख्या ३ हजार ८७३ इतकी असून १९८० जण सध्या विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत. करोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या २०५ इतकी झाली आहे. दरम्यान, औसा विधानसभा मतदार संघाचे भाजपचे आमदार अभिमन्यू पवार व त्यांचा मुलगा परीक्षित पवार या दोघांना करोनाची लागण झाल्यानंतर त्यांनी उपचार घेतले. दोघेही करोनामुक्त झाल्यानंतर त्यांनी प्लाझ्मा दान करणार असलयाचे जाहीर केले होते. त्यानुसार आमदार पवार व त्यांच्या पुत्रांनी शुक्रवारी प्लाझ्मा दान केले.

नांदेडमध्ये सहा जणांचा मृत्यू

नांदेड शहरासह जिल्ह्यात करोनाचा कहर सुरूच असून शुR वारी सहा करोनाबाधितांचा मृत्यू झाला असून १५१ नवे रुग्ण आढळून आले आहेत. बळींची संख्या १६८ झाली असून रुग्णांची संख्या ४ हजार ८२१ झाली आहे. शुR वारी प्राप्त झालेल्या ८६१ अहवालापैकी ६३८ अहवाल निगेटिव्ह आले असून १५१ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. शहरातील कैलासनगर येथील ५८ वर्षीय महिलेचा, शक्तीनगर येथील ६८ वर्षीय रुग्णाचा, बडपुरा येथील ५३ वर्षीय रुग्णाचा, वाजेगाव येथील ४१ वर्षीय महिलेचा, नांदेड तालुक्यातील चिखली (खु) येथील ६६ वर्षीय रुग्णाचा तसेच नवीन मोंढा कंधार येथील ५६ वर्षीय करोनाबाधित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.